गाहा सत्तसई : (गाथासप्तशती). माहाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल (इ. स. पहिले वा दुसरे शतक) याने केलेले एक संकलन. गाथा सप्तशती  हे याचे संस्कृत रूप. गाहा कोस  हे त्याचे मूळ नाव. राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा निवडल्या असल्याचा उल्लेख गाहा सत्तसईमध्ये त्याने केला आहे. तो या गाथांचा केवळ संग्राहक-संपादकच नाही तर तो काही गाथांचा कर्ताही आहे. भारतीयांना या गाथा-संकलकाची पहिली ओळख आल्ब्रेख्त फिड्रिख वेबर  ह्या थोर जर्मन पंडिताने इ. स. १८८१ मध्ये करून दिली. त्यानेच ह्या गाहा सत्तसईची पहिली संपादित प्रत तयार केली. अनेक विद्वानांच्या मते गाहा सत्तसई  हा प्रथम गाथा कोश असावा आणि पुढे नवव्या शतकापर्यंत त्या कोशामध्ये भर पडत जाऊन सध्या अस्तित्वात असणारा गाहा सत्तसई हा ग्रंथ तयार झाला असावा. या ग्रंथावर सुमारे १८ टीका आहेत. त्यामध्ये कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव यांच्या टीका महत्त्वाच्या असून बहुतेक टीकाकारांनी गाथांचे अर्थ शृंगारिक दृष्टीनेच लावले आहेत. या ग्रंथाचे अनुकरण करून प्राकृतमध्ये वज्जालग्ग, गाथासाहस्त्री,  संस्कृतमध्ये  आर्यासप्तशती आणि हिंदीमध्ये बिहारी सतसई अशा रचना झाल्या आहेत. मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इत्यादी श्रेष्ठ अलंकार शास्त्रज्ञांनी याची स्तुती केली असून शिवाय ह्या संग्रहातील गाथा इतर अलंकारांची उदाहरणे देण्यासाठी अनेकांनी नमूद केल्या आहेत हे याचे वैशिष्ट्य होय.

‘गाणे’ ह्या अर्थी असणाऱ्या ‘गै’ ह्या धातूपासून ‘गाथा’ हा शब्द तयार झाला. गाथा हे वृत्त संस्कृतमधील आर्या ह्या वृत्तासारखेच आहे. गाथावृत्तामुळे ह्या ग्रंथाला गाथा सप्तशती  हे नाव देण्यात आले. प्रत्येक गीताला गाथा असे म्हटले जाते. सप्तशती  म्हणजे  सातशे  श्लोक. म्हणून ह्याला सप्तशती  असेही  म्हणतात.

सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील बारीक सारीक घटनांचे चित्रण ह्या गाथांमध्ये आढळते. त्यामुळे वाचकाला तत्कालीन समाजाची उत्तम ओळख होते. म्हणूनच ऐतिहासिकदृष्ट्याही  हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. गोदावरीचे अनेक उल्लेख गाथांमध्ये आढळतात. वड, पळस, बेल, आंबा, जांभूळ इ. वृक्षांचे; तर कमळ, मालती, माधवी, केतकी वेलींचे उल्लेख गाथांमध्ये दिसतात. रानावनात फिरणाऱ्या, शेती करणाऱ्या लोकांनी ह्या गाथा रचल्या असल्यामुळे झाडे, वेली, फळे, फुले यांचे उल्लेख स्वाभाविकपणे आले आहेत.

तत्कालीन कौटुंबिक जीवनामध्ये गृहपती हा कुटुंबप्रमुख आहे. घरातील मोठ्या लोकांसमोर सुनेने मानवर करून बोलण्यास मनाई आहे, असा उल्लेख गाथांमध्ये आहे (अण्णासआइं देंती तह सुरए हरिसविअसिअकवोला । गोसे वि ओणअमुही अह सेत्ति पिआं ण सद्दधिमो ।। गाथा क्र. २३). काही गाथांवरून जरठविवाहाची प्रथा अस्तित्वात होती, असे दिसते (विज्जाविज्जइजलणोगहवइधूआइवित्थअसिहोवि। अणुमरणघणालिंगणपिअअमसुहसिज्जिरंगीए ।। गाथा क्र. ४०७).  गाथांमधील अत्ता, मामी यांच्या उल्लेखांवरून आत्ते-मामे भावंडांमध्ये लग्न होत असावे; त्यावेळी समाजामध्ये बहुपत्नीकत्वाची पद्धत रूढ होती. त्यामुळे सवतींबद्दलची अनेक वर्णने ह्या गाथांमध्ये दिसतात. तसेच दूती, जार यांच्या वर्णनावरून त्या स्वैरिणी असल्या तरी समाजातील सुसंस्कृतपणाही  ह्या गाथांमधून वर्णिलेला दिसतो. स्त्रीची दैनंदिन कामे, तिने पतीला प्रसन्न करणे, पतीला इतर गोष्टींपासून दूर ठेवणे, पतीचा स्वाभिमान जपणे, घरातील इतरांची काळजी घेणे  इत्यादी वर्णने तसेच पति-पत्नीच्या सुखी संसाराची एकत्र कुटुंबपद्धतीची वैशिष्ट्ये गाथांमधून नमूद करण्यात आलेली आहेत. तत्कालीन समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता दिसून येते.

तत्कालीन देव-देवता, पौराणिक कल्पना, सामाजिक चालीरीतीं यांचे वर्णन गाथांमध्ये आढळते. गाहा सत्तसईच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी शंकराला नमन केले आहे. पती-पत्नीच्या सुखी संसारासंदर्भातील वर्णनामध्ये अग्नीचे उल्लेख बऱ्याचदा येतात (रंधणकम्मणिउणिए ! मा जूरसु, रत्तपाडलसुअंधं ।मुहमारुअं पिअंतो धूमाइ सिही, णपज्जलइ ।। गाथा क्र. १४). याशिवाय कृष्णाच्या रासलीला, समुद्र-मंथन, सतीची प्रथा यांबद्दलची वर्णनेही आढळतात.  शुभाशुभ शकुनांवर लोकांचा विश्वास होता. मंगलकलश ठेवणे, डावा डोळा लवणे इ. गोष्टी लोक मानत असत. तत्कालीन समाज अल्पसंतुष्ट, आनंदी, समाधानी, साधाभोळा होता. त्यामुळे या गाथा म्हणजे ह्या ग्रामीण जीवनाची जणू भावगीतेच होता.

गाहा सत्तसईमध्ये सज्जनप्रशंसा, दुर्जननिंदा, प्रेमाचे तत्त्वज्ञान, सुंदर निसर्गचित्रण, जीवनाचे तत्त्वज्ञान शब्दांकित झाले आहे.  शिवाय प्रत्येक गाथेमध्ये  एकनायिका, अष्टनायिका शिवाय मुग्धा, बालिका, तरुणी, प्रौढा, नवोढावधू, नवप्रसूता, बंदिनी, रजस्वला तसेच कुलटा नायिका पण आहेत. या प्रत्येक नायिका स्वतंत्र नसून एकाच स्त्रीची अनेक रूपे आहेत. एकच स्त्री मुग्धा, बालिका, तरुणी, नवप्रसूता असते. त्यामुळे  एकाच गाथेतून अनेक नायिका दिसतात (उण्हाइं णीससंतो किंति मह परम्मुहीए सअणद्धे । हिअअं पलीविअ वि अणुसएण पुट्ठिम पलीवेसी ।। गाथा क्र. ३३).

प्राकृत भाषेचे सौंदर्य-माधुर्य, उत्तम निसर्गचित्रण, लोकव्यवहार, नीतीनियम तसेच प्रणयाचे सात्विक पण बहुरंगी स्वरूप मांडण्याच्या उद्देशाने हाल राजाने या गाथांची निवड केली असावी. अनेक गाथा शृंगारप्रधान असल्या तरी हा केवळ शृंगारिक गाथांचा संग्रह नाही. वास्तव जीवनानुभव मानवी भाव-भावनांचे विविध कंगोरे दाखविणाऱ्या अशा या गाथा आहेत. नैसर्गिक सहजता व प्रासादिक रचनांमुळे या गाथा आपले चित्त वेधून घेतात.

संदर्भ:

  • जैन, जगदीशचंद्र. प्राकृत साहित्य का इतिहास  (आवृ. २ री) चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९८५.
  • जोगळेकर स. आ. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, प्रसाद प्रकाशन,  पुणे, १९५६.
  • मंगरुळकर, अरविंद; हातवळणे, दि. मो. गाहा सत्तसई, (आवृ. १ ली), देशमुख प्रकाशन, पुणे, १९५८.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा