ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागातील एक गोड्या पाण्याचे सरोवर. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरापासून ईशान्येस ४० किमी. अंतरावर, तसेच ग्रेट डिव्हायडिंग रेंज या पर्वतराजीतील लेक जॉर्ज रेंज या छोट्याशा कटकच्या पूर्वेस हे सरोवर आहे. सरोवराचे आद्य नाव वेरिवा होते. जोसेफ वाइल्ड या यूरोपीयनाने १८२० मध्ये पहिल्यांदा या सरोवराला भेट दिली आणि जॉर्ज चवथा यांच्या नावावरून या सरोवराला जॉर्ज हे नाव देण्यात आले. मध्य मायोसीन युगात (सु. २३ ते ५.३ द. ल. वर्षांपूर्वी) किंवा त्यापूर्वीच्या काहीशा आधीच्या कालखंडात झालेल्या मोठ्या प्रस्तरभंगामुळे या भागात सांरचनिक द्रोणी निर्माण झाली. या द्रोणीक्षेत्रात नदीप्रणालीचे अभिकेंद्री प्ररूप असल्यामुळे मोठ्या नद्यांकडे किंवा महासागराला मिळणारा एकही प्रवाह या सरोवरातून बाहेर पडत नाही. प्लाइस्टोसीन कालखंडाच्या अखेरीस (सु. १०,००० वर्षांपूर्वी) सरोवर बरेच मोठे आणि खोल होते. त्या वेळी पर्जन्यमान, बाष्पीभवन आणि प्रवाहप्रमाण यांमध्ये योग्य रित्या समतोल राहत असे. पूर्वी या सरोवराला यॅस आणि शोलहेवन नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील मर्यादित प्रवाहांकडून पाणीपुरवठा होत असे; परंतु येथील विभंगरेषेला अनुसरून भूकवचात झालेल्या तीव्र हालचालींमुळे सरोवराच्या कडा उंचावत गेल्या. त्या अडथळ्यांमुळे सरोवराला मिळणारे काही प्रवाह बंद झाले.

सरोवर जेव्हा पूर्ण भरलेले असते, तेव्हा त्याची लांबी २५ किमी., रुंदी १० किमी. आणि कमाल खोली ६ ते ८ मी. असते. सरोवर बरेच उथळ असून त्यातील पाण्याची पातळी आणि जलव्याप्त क्षेत्र यांमध्ये नेहमीच चढउतार होत असतात. यातील अवसादाची जाडी २५० मी. पेक्षा अधिक आहे. सर्वांत जुने अवसादाचे थर सुमारे ४ ते ५ द. ल. वर्षांपूर्वीचे असावेत. १८३८-३९, १८४६ – १८५०, १९३० – १९३४, १९३६ – १९४७ आणि १९८२ मध्ये सरोवर पूर्णपणे कोरडे पडले होते. त्यानंतर नोव्हेंबर २००२ मध्येसुद्धा न्यू साउथ वेल्स प्रदेशातील अवर्षण स्थितीमुळे सरोवर पूर्णपणे कोरडे पडले. ती स्थिती फेब्रुवारी २०१० पर्यंत राहिली. १९९६ नंतर पहिल्यांदाच सप्टेंबर २०१६ मध्ये सरोवर सर्वाधिक भरले होते.

सरोवर ज्या वेळी दीर्घकाळ पूर्णपणे कोरडे पडते, त्या वेळी सरोवराच्या गाळयुक्त तळावर समृद्ध गवताळ कुरणे तयार होतात. त्यांवर मेंढ्या व गुरे पाळली जातात. तसेच शेतकरीही त्यावर पिकांची लागवड करतात. सरोवराच्या पश्चिम काठावरील भागात वाइननिर्मितीसाठीची द्राक्षे पिकविली जातात. सरोवराच्या आग्नेय किनाऱ्यावर वीजनिर्मितीसाठी पवनचक्क्या उभारल्या आहेत. सरोवराच्या पश्चिम काठावरून फेडरल महामार्ग जातो. कॅनबरातील काही संस्थांमार्फत तलाव परिसरात अनेक संशोधने केली जात आहेत. तसेच हा तलाव ऑस्ट्रेलियातील सर्वांत अभ्यासित तलाव आहे. सरोवर परिसरात वेरिवा हे स्थानिक आदिवासी लोक राहतात. १९९९ पासून तलाव परिसरात दर दोन वर्षांनी त्यांच्या नावाने वेरिवा महोत्सव साजरा करण्यात येते.

समीक्षक : अविनाश पंडित; ना. स. गाडे