पूर्वी वनस्पतींचे वर्गीकरण हे वनस्पतींचा आकार, पानाफुलांचे दृश्यरूप यावर आधारित असे. नैसर्गिक वर्गांच्या प्रयोगसिद्ध अभ्यासान्ती असे निदर्शनास आले की, उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार एका गटातील (Natural Order or Family)  वनस्पतींतील जाती (species) – प्रजाती (Genus) यांमधील संबंध (Phylogeny) प्रस्थापित होऊ शकत नाहीत किंवा जवळपास सारख्या दिसणाऱ्या वनस्पतींचा आपसात संकर होतोच असे नाही.

स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ गोटे व्हिल्हेल्म तुरेसन (Gote Wilhelm Turesson, १९२२) यांनी वनस्पतींच्या जातींची गतिशील संकल्पना (Dynamic Concept of species) मांडली. ग्रेगॉर (Gregor, १९४२) आणि पुढे व्हॅलेन्टीन (Valentin, १९४९) यांनी ही संकल्पना ग्राह्य धरून जातींच्या आनुवंशिक व पर्यावरणीय बाबींचा एकत्रित विचार केला. या विचारांप्रमाणे एकाच जातीचे बाह्य स्वरूप वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये वेगळे आढळते. कारण प्रत्येक जातीची पर्यावरणीय गरज वेगळी असते, तसेच पर्यावरणातील बदल सहन करण्याची क्षमताही वेगळी असते.

तुरेसन यांनी प्लॅन्टॅगो (Plantago) मार्टिना (Martina) या जातीच्या वेगवेगळ्या अधिवासातील सु. २० वनस्पतींवर प्रयोग केले. प्रयोगान्ती त्यांनी पुढील बाबींची नोंद केली.

१. गटांतील दोन जातींच्या बाह्य स्वरूपामध्ये आणि जैविक क्रियांमध्ये फरक असतात.

२. काही फरक पर्यावरणातील बदलामुळे निर्माण होतात आणि काही तात्पुरते, तर काही कायमस्वरूपी असून ते पुढील पिढीत संक्रमित होतात.

तुरेसन यांनी जनुकीय पर्यावरणशास्त्र (Gene ecology) ही नवी कल्पना वर्गीकरणशास्त्रात मांडली. त्याप्रमाणे  वनस्पती जातींचे बाह्य स्वरूप, जैविक क्रिया व अधिवास यांनुसार बदल घडतात. अशा जातींना त्यांनी एकड (ekad), एकोफिन (ecophene) अथवा परिव्यक्त स्वरूप, एकोटाईप (ecotype) किंवा परिरूप एकोस्पेसीज  (ecospecies) आणि सिनोस्पेसीज (Coenospecies) अशी नावे दिली.

एकड किंवा एकोफीन : अधिवासानुरूप स्वरूपे : ही सर्व रूपे वनस्पतीच्या एकाच जातीची, एकाच जनुकीय नमुन्याची असून, फक्त त्यांच्या बाह्य स्वरूपात फरक असतात, हे फरक कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात असतात. त्यांचा आपसात संकर होतो.

    दुधी झुडूप : बागेतील हिरवळीत वाढणारे

एकडपेक्षा एकोफीनमधील फरक जास्त तीव्र असतात. उदा.,गवतात वाढणाऱ्या दुधी (यूफोर्बिया हिरटा; Euphorbia hirta)  जातीची झुडपे पसरट, भरपूर फांद्या असलेली, हिरव्या रंगाची असतात; पण तशीच दुधी खडी-सिमेंटच्या भिंतीवर वाढते तेव्हा लहान पानांची, आक्रसलेली, मांसल, तांबडसर दिसते.

              दुधी झुडूप : दगडी भिंतीवर वाढणारे

ही दोन्ही प्रकारची झुडपे एकाच अधिवासात वाढविली तर त्यातील फरक लोप पावतो.

सौराष्ट्रातील एका सुरक्षित आणि दुसऱ्या मोठ्या प्रमाणावर चरल्या गेलेल्या कुरणातील  गवताच्या दोन प्रजातींमध्ये (डायकँथियम कॅरिकोसम; बोथ्रिओक्लोआ पर्ट्यूसा; Dicanthium caricosum; Bothriochloa pertusa)  वेगवेगळी एकड आढळून आली.

परिरूपे : जैववर्गीकरणाचे हे महत्त्वाचे एकक आहे. ही रूपे उत्परिवर्तन, संकर व वेगळेपणामुळे उत्पन्न होतात. (पाहा : परिरूपे).

एकोस्पेसीज : काही परिरूपांचा एकमेकांशी संकर होऊ शकतो, परंतु त्यापासून पुनरुत्पादनक्षम संतती निर्माण होत नाही, अशा परिरूपांना एकोस्पेसीज म्हणतात. एकोस्पेसीज जर अनेक पिढ्या स्वतंत्रपणे वाढल्या तर त्यांच्यांतील बदल गठित होऊन नवीन जाती निर्माण होतात आणि याच कारणामुळे काही जाती नष्टही होतात.

सिनोस्पेसीज : ज्या वनस्पतींचा एक गट दुसऱ्या गटाशी जनुकीय अदलाबदल करू शकत नाही अशा गटाला सिनोस्पेसीज म्हणतात. बरेच वेळा एकोस्पेसीज व सिनोस्पेसीज या वर्गातील वनस्पती   उपप्रजाती किंवा प्रजाती म्हणून ओळखल्या व मानल्या जातात.

संदर्भ :

  • http://www.biologydiscussion.com/ecology/gene-ecology-ecological genetics-of-population/6758.
  • Epgp.inflibnet.ac.in/epgpdata/—/biosystematics/—/5905_et_21-biosystematics-et.pdf.

भाषांतरकार – शारदा वैद्य

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा