भोसले, शिवाजीराव अनंतराव : (१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०). महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते. त्यांचा जन्म खटाव तालुक्यातील कलेढोण (सातारा जिल्हा) येथे अनसूयाबाई व अनंतराव या दांपत्यापोटी झाला. अनंतराव प्राथमिक शिक्षक होते, तर आई गृहिणी होत्या. वडिलांकडून त्यांना अमोघ वक्तृत्वाची देणगी मिळाली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कलेढोण व विटा येथे झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी साताऱ्यात घेतले. बॅ. पी. जी. पाटील, शंकरराव खरात व डॉ. दत्ताजीराव साळुंखे हे तीन माजी विद्यापीठ कुलगुरू त्यांचे बोर्डिंगमधील सहाध्यायी होते. पुढे त्यांनी पुण्यातील महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. आणि पुढे एलएल.बी. पदव्याही संपादिल्या. विद्यार्थिदशेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील, वेदमहर्षी सातवळेकर, श्री. म. माटे, प्रा. प्र. रा. दामले, प्राचार्य सोनोपंत दांडेकर प्रभृतींचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यातून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

सुरुवातीस त्यांनी काही काळ साताऱ्यात वकिली केली. पुढे त्यांनी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे १९५७ ते १९८८ पर्यंत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. याच महाविद्यालयात १९६३ ते १९८८ असे सलग २५ वर्षे ते प्राचार्य होते. निवृत्तीनंतर १९८८ ते १९९१ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (औरंगाबाद) ते कुलगुरू होते. ते तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र व मानसशास्त्र हे विषय शिकवत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती होती. त्यांनी स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर आदी थोर व्यक्तींच्या चरित्राचा अभ्यास केला, शिवाय महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्‍वर, स्वामी चक्रधरांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंतच्या संतांचाही त्यांचा व्यासंग होता.

स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त (१९६३) महाराष्ट्रभर त्यांनी व्याख्याने दिली. त्या वेळेपासून अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र तसेच गोवा, इंदूर, हैदराबाद (दक्षिण), बंगळूरू इत्यादी ठिकाणी त्यांनी असंख्य व्याख्याने दिली. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत १९६९ ते १९९७ या काळात सतत अठ्ठावीस वर्षे व्याख्याने देण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. आकाशवाणी व महाराष्ट्र राज्य माहिती खाते यांच्या विद्यमाने पु. न. लाड स्मृती व्याख्यानमालेतही दोन वेळा त्यांनी व्याख्याने दिली. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील मराठी साहित्य संमेलन आणि बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या द्वैवार्षिक स्नेहसंमेलनासाठी अनुक्रमे १९९१ व १९९५ साली दोन वेळा अमेरिकेला भेटी दिल्या. त्या वेळी न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, लॉस अँजेल्स, न्यूयॉर्क येथे त्यांनी व्याख्याने झाली. स्वामी समर्थांच्या पादुका नेणाऱ्या समितीसोबत ते १९९८ ला सिंगापूरला गेले. त्या निमित्ताने त्यांनी रामदासांवर तिथेही व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानात थोर पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंश असे, त्यांच्या विचाराचे विश्लेषण असे आणि त्यांच्या कार्याची-प्रबोधनाची मीमांसा असे.

त्यांनी दैनिक सकाळ व दैनिक लोकसत्ता यांमधून दीर्घकाळ सदर लेखन केले. त्यांची दीपस्तंभ, यक्षप्रश्‍न, मुक्तिगाथा महामानवाची, कथा वक्तृत्वाची, जागर : खंड १ व २, हितगोष्टी, प्रेरणा, देशोदेशीचे दार्शनिक, जीवनवेध हे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत.

त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांना आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार मिळाला (१९८२). तसेच सातारा भूषण, फलटण भूषण, विद्याव्यास, रोटरी जीवनगौरव, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार (कोल्हापूर), श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार (फलटण), भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचे मानपत्र, पुणे, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांचे दिक्षांत समारंभांचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.

शिवाजीरावांचे तत्त्वज्ञान ‘जीवनवादी’ होते. अभ्यास करावा, स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा. त्यातच त्याने गती घ्यावी आणि स्वतःला प्रगट करावे, हे त्यांचे व्यक्तिमत्त्व अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा निश्‍चितच चांगले असते. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. देवदेवतांचे अवडंबर त्यांना मान्य नव्हते. या विश्‍वाचा एक घटक या नात्याने आपले काम आपण प्रामाणिकपणे करावे, हा गीतेचा विचार त्यांना मान्य होता. त्यासाठी माणसाने मूल्यांचा वेध घेतला पाहिजे. एवढेच नव्हे, तर आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार केला पाहिजे. आपले जीवन एक आदर्श जीवन झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात जे विविध विचारप्रवाह, वाद (Ism) उदयाला आले, त्यामध्ये जीवनवाद नावाची आधुनिक काळात उदयाला आलेली एक विचारसरणी. त्यामध्ये रूडॉल्फ ऑयकेन, लिओ टॉलस्टाय, हेन्री डेव्हिड थोरो, ओर्तेगा अशा अनेक विख्यात तत्त्वचिंतकांचा समावेश होतो. जीवनवादी दृष्टीकोनातून जगात दुरित, पाप, नीचता, दुष्टता, विषमता, अन्याय अशा नकारात्मक गोष्टी आहेत, हे सत्य आहे. त्या माणसाला नको असतात. पण त्यांच्याशी सामना तर माणसाला करावाच लागतो. म्हणूनच अशा नकारात्मक गोष्टींचे आव्हान स्वीकारून निराकरण करणे माणसाचे कर्तव्य आहे. शिवाय त्यात त्याचे पौरुषत्व आहे. जगात न्याय, बंधुता, समता, साधुत्व यांसारख्या सद्गुणांची प्रस्थापना करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे कार्य करीत असताना सद्गुणांच्या, नीतिवाद्यांच्या बाजूने ईश्वर उभा राहतो, अशी जीवनवाद्यांची श्रद्धा असते. कांटसारखे बुद्धिवादी तत्त्वचिंतक नीतीची भलावण करताना ईश्वराची गरज व्यक्त करतात. ईश्वर ही मानवी मनाची एक मागणी असते. माझ्या चांगल्या वागण्याचे मला काय फळ मिळणार, तर ईश्वराची कृपा! तो दखल घेईल अशी आशा त्याच्या ठिकाणी असते. या दृष्टीने जीवनवादी तत्त्वचिंतक आपली भूमिका मांडतात. माणसाला आशावादी बनवतात. त्याचबरोबर निश्चिंत जीवनाचे अभय देतात. अशा प्रकारचा जीवनवाद शिवाजीरावांनी सांगितला. ते प्रबोधनकार होते. त्यांचे तत्त्वज्ञान आदर्श, मूल्ये या अनुषंगाने मांडले गेले. मानवी जीवनाला अर्थवत्ता आहे. ते केवळ प्राण्याचे जीवन नाही. प्राण्यामधल्या माणसाचे जीवन आहे. विवेक त्याचे लक्षण आहे. हा विवेक आपल्या जीवनाची दिशा ठरवतो, आपल्याला ‘माणूस’ म्हणून घडवतो, योग्य-अयोग्य ठरवतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या तत्त्वज्ञानात समन्वयाला महत्त्व होते. मतामतांच्या गलबल्यात हरवलेले सत्य शोधून काढणे आणि लोकांपुढे मांडणे हे त्यांचे कार्य होते. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, कांट या तत्त्वचिंतकांप्रमाणेच त्यांनी आपल्या विचारात आणि आचरणात नीतीला केंद्रबिंदू मानले.

भारतीय संतांनी ज्याप्रमाणे आपल्या आचार-विचार आणि उपदेश-उच्चार यांत एकवाक्यता ठेवली, त्याप्रमाणेच शिवाजीरावांनी  आपल्या जीवनात आणि सामाजिक व्यवहारात तसेच लेखन आणि भाषण यांत ठेवली. ‘बोले तैसा चाले’ ही संतांची शिकवण त्यांच्या नीतिमान, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वात आढळते. ती जनसामान्यांना मार्गदीपक ठरली. तत्त्वज्ञानाचे हेच कार्य असते, अशी भारतीय तत्त्वज्ञानाची भूमिका त्यांनाही मान्य होती.

तत्त्वज्ञान ही केवळ बौद्धिक चळवळ नाही किंवा चर्चेचा विषय नाही; तर प्रत्यक्ष जीवन जगताना अडीअडचणींवर मात करण्याचा व जीवनाला-आयुष्याला एक अर्थपूर्ण आयाम देणारा विषय आहे, अशी त्यांची भूमिका होती. माणसाचे आयुष्य सुंदर आणि उदात्त बनविणारी ज्ञानशाखा म्हणून ते तत्त्वज्ञानाकडे पाहत असत. माणूस हा शरीर-मनयुक्त असा प्राणी आहे. त्याच्या जीवनाचा पोत शरीर-मन या द्वंद्वाच्या परिघात घडतो. केवळ शरीर किंवा केवळ मन अशा दोन सीमारेषांवर तो जगू शकत नाही. दोन्हींना बेमालूमपणे एकत्र करूनच तो जगू शकतो. म्हणूनच त्याला विज्ञानाबरोबर आध्यात्माचीही गरज आहे, असे ते ठामपणे सांगताना दिसत. पंढरपूरला वारीतून जाताना वारकर्‍याने शरीराची काळजी म्हणून विज्ञानाचा आधार घ्यावा, तर मनाच्या पोषणासाठी विठ्ठलाचे स्मरण करावे. दोन्हींची माणसाला गरज आहे, असे ते सांगत. अशा तर्‍हेने समन्वयाची भूमिका घेत जीवनवादी-आदर्शवादी तत्त्वज्ञानाची मांडणी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी केलेली दिसते.

शिवाजीरावांच्या गंगौघासारख्या वक्तृत्वशैलीबद्दल डॉ. रघुनाथराव माशेलकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, सेतुमाधवराव पगडी, पु. ल. देशपांडे प्रभृती मान्यवरांनी गौरव उद्गार काढले आहेत. ‘‘त्यांच्यात विद्वत्ता आणि सृजनता यांचा सुंदर संगम झालेला होता. त्यांचे विचार माणसामध्ये उच्च दर्जाची प्रेरणा निर्माण करतात. त्यांची वक्तृत्वशैली गंगा प्रवाहासारखी प्रसन्न व पवित्र भावना जागृत करणारी आहे”. त्यांनी महाराष्ट्राच्या सार्वत्रिक जीवनात स्वत:चे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

त्यांच्या पत्नीचे नाव सुशीला (पूर्वाश्रमीच्या सावंत) असे असून पुत्र संजीव व स्नुषा रंजना प्रकाशन व्यवसायात आहेत. कन्या अंजली (कदम) ह्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत.

संदर्भ :

  • जोशी, मिलिंद, प्राचार्य, पुणे, २०१५.

समीक्षक – एस. जी. निगळ

प्रतिक्रिया व्यक्त करा