जीवसृष्टीमध्ये बुरशीचे सु. ८१ हजार  प्रकार ज्ञात आहेत. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सु. ५१ लाख भिन्न स्वरूपांच्या आणि गुणधर्मांच्या बुरशी अस्तित्वात असून दरवर्षी त्यांत साधारण १५०० नवीन बुरशींची भर पडत असते.

बुरशींचे महत्त्व : बुरशीच्या अभ्यासाला सध्याच्या काळात दोन कारणांमुळे महत्त्व आलेले आहे. बुरशी प्रयोगशाळेत वाढवायला सोपी असते. त्यामुळे जवळजवळ ६०% पेक्षाही जास्त जैवतंत्रांतील क्रियांमध्ये  बुरशीचा वापर केला जातो. दुसरे कारण असे की, नवनवीन बुरशी माणसाला घातक ठरत असल्याने त्यांची वाढ रोखण्यासाठी प्रतिजैविके तयार करणे गरजेचे आहे.

द्विरूपी / बहुरूपी बुरशी : प्रत्येक जीवाच्या बाबतीत जन्म, वाढ आणि मृत्यू या तीन गोष्टी संभवितात. बुरशी मात्र बऱ्याच वेळा घातक परिस्थितीमध्ये तात्पुरते वेगळे रूप धारण करून टिकते. अशा काही बुरशी आहेत, की ज्या परिस्थितीतील बदलाबरोबर आपले  स्वरूप  बदलतात आणि परिस्थिती पूर्ववत झाल्यावर पुन्हा मूळ स्वरूप  धारण करू शकतात. अशा बहुरूपी बुरशींना द्विरूपी (Dimorphic) म्हणतात. उदा.,म्यूकर (Mucor) ही पावावर वाढणारी बुरशी कवकजाल स्वरूपात असते, परंतु वातावरणात प्राणवायू कमी असताना ती गोल कोशिकेच्या रूपात वाढते. अन्नातील साखरेच्या प्रमाणातील बदल अशा प्रकारची बुरशी घडवू शकते. माणसांमध्ये अशा बुरशीच्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.

प्रतिकारशक्ती  कमी  असलेल्या  मनुष्यामध्ये काही बुरशी धोकादायक परिस्थिती निर्माण करतात. या बुरशी श्वासाबरोबर फुफ्फुसावाटे शरीरात प्रवेश करतात आणि रक्तप्रवाहातून शरीरभर पसरतात. हिस्टोप्लाझ्मा (Histoplasma), ब्लास्टोमायसेस (Blastomyces), कोक्सिडीओआडीस (Coccidiodes), या अशा प्रकारच्या द्विरूपी बुरशी आहेत.

कॅन्डिडा (Candida), म्यूकर (Mucor), ॲस्परजिलस (Aspergillus) या अतिशय धोकादायक बुरशी द्विरूपी व बहुरूपी अशा दोन्ही रूपांतही असतात. हिस्टोप्लाझ्मा बुरशी निसर्गामध्ये कवकजाल रूपात असते; ती जेव्हा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा (म्हणजे ३७0 से.तापमानाला) गोल कोशिकेचे रूप धारण करते आणि रक्तप्रवाहातून सहज मार्गक्रमण करते. कॅन्डिडा अल्बिकांस (Candida albicans) नावाची बुरशी मनुष्याच्या शरीरातच असते आणि जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा घातक ठरते. कर्करोगावर उपचार घेणारे रुग्ण, एड्सग्रस्त रुग्ण यांच्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कॅन्डिडायसीस (Candidiasis) नावाचा जीवघेणा रोग होतो. पावावर वाढणारी म्यूकर ही बुरशी एरव्ही निरुपद्रवी असते पण मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ती घातक ठरू शकते. तिच्यामुळे म्यूकर मायकोसिस नावाचा रोग होतो. ॲस्परजिलस प्रजातीतील ॲ. फ्युमिगेटस, ॲ. फ्लावस, ॲ. नायजर या जातींमुळे पशुपक्षी व मनुष्य यांना ॲस्परजिलोसीस  नावाचा रोग होतो.

प्रतिजैविकांच्या शोधाचा उद्देश : बहुतेक बुरशी आत्मसंरक्षणासाठी आणि जोमाने वाढण्यासाठी आपले रूप बदलतात. कवकजालाचा उपयोग शरीरात प्रवेश करण्यासाठी  आणि गोल कोशिकेचे रूप रक्त प्रवाहातून सर्वत्र पसरण्यासाठी करतात. म्हणजेच बुरशीचे दुसरे रूप जास्त घातक असते. त्यामुळे, निरुपद्रवी रूपातून घातक रूपाकडे होणारा बदल रोखता आला तर रोगाचा प्रादुर्भावच होणार नाही. मनुष्याच्या शरीराचे तापमान हे बुरशीच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे अस्त्र आहे. या गोष्टीचा फायदा प्रतिजैविके शोधण्यासाठी शास्त्रज्ञ करीत आहेत.

बुरशीचा आकार आणि रुपांतर हे मुख्यत्वेकरून भित्तिकेमध्ये असलेल्या कर्बोदकांवर अवलंबून असते. ग्लुकान आणि मानान ही दोन्ही कर्बोदके बुरशीच्या भित्तिकेमध्ये असतात. भित्तिका तयार होताना प्रथम त्यांपासून  कायटीन या कर्बोदकाचा  सांगाडा तयार होतो. बाकीची कर्बोदके, प्रथिने आणि इतर रसायने तो सांगाडा भरून काढतात. जर सांगाडा तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करता आला तर भित्तिका तयार होणार नाही, किंवा तयार झाली तरी त्यात बाहेरच्या वातावरणापासून संरक्षण करण्याची ताकद असणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कायटीन हे कर्बोदक मनुष्याच्या शरीरात तसेच वनस्पतींमध्ये तयार होत नाही. त्यामुळे कायटीन तयार होण्याची प्रक्रिया रोखणारी प्रतिजैविके माणसाला, तसेच पिकांना हानिकारक ठरत नाहीत.

बेन्जामिनिएला कवकजाल

बेन्जमिनिएला बुरशी : बुरशीतील बदल थांबविणे ज्या ज्या पद्धतीने शक्य आहे, त्या त्या गोष्टी तपासून पाहण्यासाठी काही कमी घातक बुरशी प्रतिकृती म्हणून वापरतात. उदा., बेन्जामिनिएला (Benjaminiella) ही बुरशी २८०  से. तापमानाला कवकजाल रूपात असते आणि ३७० तापमानाला गोल कोशिकेच्या रूपात असते. साखरेचे बदलते प्रमाणही तिच्यात बदल घडवू शकते. म्हणून माणसाला घातक नसणारी ही बुरशी अभ्यासासाठी नमुना (Model) म्हणून वापरता येते.

बेन्जामिनिएला कोशिका

मानवास उपयुक्त द्विरूपी / बहुरूपी बुरशी : द्विरूपी किंवा बहुरूपी बुरशी वाईटच असतात असे नाही. ऑरिओबॅसिडियम (Aureobasidium) नावाची बुरशी कवकजाल रूपात सेल्युलोजवर वाढते तर कोशिकेच्या रूपात पुलुलान (Pullulan) नावाचे कर्बोदक तयार करते.फळांच्या संरक्षणासाठी पुलुलान वापरता येते. त्याचप्रमाणे सॅकॅरोमायसीस (Saccharomyces) ही बुरशी स्टार्च वापरताना कवकजाल रूपात असते तर कोशिकेच्या रूपात इथेनॉल तयार करते. यारोविया (Yarrowia) नावाची बुरशी खाऱ्या पाण्यातसुद्धा पेट्रोलियमचे प्रदूषण असलेल्या  ठिकाणी कवकजाल स्वरूपात जगते तर कोशिकेच्या रूपात असताना पेट्रोलियमचे विघटन करते.

प्रतिक्रिया व्यक्त करा