मानवी जीवनाला उपकारक आणि अपायकारक अशा दोनही प्रकारच्या बुरशींचे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली वावरत असतात. आपल्या शरीराशी असणाऱ्या सततच्या संपर्काद्वारे ते व्याधी निर्माण करतात. बुरशीजन्य व्याधींमध्ये एक संसर्गजन्य (बुरशीबरोबरच्या प्रत्यक्ष संपर्कामुळे होणाऱ्या व्याधी; मायकोसीस/मायकोसेस; Mycosis/Mycoses), आणि दुसरी विषजन्य (बुरशीची वाढ झालेले पदार्थ खाण्यात आले आणि त्यातील बुरशीने तयार केलेले विषारी पदार्थ (मायकोटॉक्सिन; Mycotoxins) यामुळे होणाऱ्या व्याधी; मायकोटॉक्सिकोसीस/मायकोटॉक्सिकोसेस; Mycotoxicosis/Micotoxicoses) अशा दोन प्रकारच्या व्याधी आहेत.

१) संसर्गजन्य व्याधी : सामान्यपणे मानवी शरीर त्वचेच्या आवरणामुळे संरक्षित असते, परंतु सततच्या संपर्कामुळे काही प्रकारची बुरशी त्वचेवर वाढते. या बुरशीमध्ये असलेल्या केराटीनेज (keratinase) या विकरामुळे त्वचेतील केराटीन हे प्रथिन विघटन पावते. यामुळे होणाऱ्या व्याधी, त्वचेवर झालेल्या जखमामधून बुरशीचे बीजाणू (Spores) शरीरात जाऊन होणाऱ्या व्याधी, त्याचप्रमाणे श्वासावाटे बीजाणू शरीरात जाऊन निर्माण होणाऱ्या व्याधी. या व्याधी संसर्गजन्य असतात.

शरीराच्या कोणत्या भागात ही व्याधी होते, त्यानुसार त्यांना नावे दिली जातात. उदा., बाह्य त्वचेच्या व्याधी (गजकर्ण, नायटा, शिब, वगैरे). यांचा संसर्ग माणूस ते माणूस (Anthropophilic), प्राण्यांपासून (Zoophilic) आणि जमिनीपासून (Geophilic) अशा तीन  प्रकारे होऊ शकतो. या व्याधींमुळे शरीराच्या अवयवांवर पांढरे किंवा लालसर चट्टे उठतात, तेथे अतिशय खाज सुटते. याला टीनिया (Tinea) या नावाने संबोधतात. उदा., पायांवर (Tinea pedis), नखांवर (T. unguium), चेहेऱ्यावर (T.faciei), कपाळ आणि डोक्याच्या भागावर (T. capitis) इत्यादी. या बुरशीच्या केशकवक (ट्रायकोफायटॉन; Trichophyton), अधिचर्मक (एपिडर्मोफायटॉन; Epidermatophyton) आणि लघुबीजाणू (मायक्रोस्पोरियम; Microsporium) अशा तीन जाती आहेत.

अंतस्त्वचा विकार : बाह्य त्वचेला इजा पोहोचल्यास होणाऱ्या जखमेतून बुरशीची बीजाणू शरीरात जाऊन हे विकार निर्माण होतात. पण ही व्याधी अंतस्त्वचापुरतीच मर्यादित असते, पसरत नाही. ही बुरशी एरवी आपल्या भोवती शवोपजीवी मृतोपजीवी (Saprophyte) म्हणून वाढत असते. जखमेद्वारे ती अंतस्त्वचापर्यंत पोहोचून तिथे प्रस्थापित होते. त्या ठिकाणची त्वचा लालसर होऊन गाठीसारखी होते, त्या जागी पू तयार होतो आणि ती जखम वाहू लागते (Sporotrichosis). या विकारात अंतस्त्वचेच्या आत मोहोरीच्या आकाराचे आणि रंगाचे कण (Granules) तयार होतात. या कणांमध्ये ती बुरशी संरक्षित असते. उदा., स्पोरोट्रायकोसीस, मायसेटोमा (Mycetoma) इत्यादि.

अंतर्गत (आंतरप्रवाही) बुरशीजन्य व्याधी (Deep Mycosis, Systemic Mycosis) : बुरशीच्या या जातीसुद्धा सर्वसामान्य शवोपजीवीप्रमाणे निसर्गात वाढत असतात. प्रतिकार क्षमता कमी झालेल्या व्यक्तींमध्ये श्वसन, अन्ननलिका याद्वारे शरीरात प्रवेश करून त्या व्याधी निर्माण करतात. शरीराचे तापमान, प्रतिरोध संस्था यांच्याशी मुकाबला करून या बुरशी स्वतःला प्रस्थापित करतात. दुर्लक्ष केल्यास या व्याधी गंभीर रूप धारण करू शकतात. उदा., फुप्फुसांचा सिक्तकवक रोग/ॲस्पर्जिलस रोग (ॲस्पर्जिलोसीस; Aspergillosis), नाक, कान, सायनस यांचा म्यूकरमायकोसीस किंवा झायगोमायकोसीस.

२) विषजन्य व्याधी : घरातील साठविलेले खाद्य पदार्थ (मुरंबे, लोणची, पापड इ.) किंवा इतरही शिळे पदार्थ (पाव, चपाती इ.) यांवर बुरशीची वाढ होते. ही बुरशी अनेक प्रकारचे विषारी पदार्थ या पदार्थात सोडतात. असे पदार्थ खाल्ल्याने विषबाधा होते. बुरशीचा प्रादुर्भाव झालेली धान्ये, उदा., शेंगदाणे, बाजरी, ज्वारी, मका, इत्यादी पोटात गेल्यामुळेही विषबाधा होते. अनेक वेळा विषारी अळूम्बी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे ऐकायला मिळते. अशा विषांचा अन्नसंस्थेवर आणि मेंदू व मज्जासंस्था यावर प्रामुख्याने परिणाम होतो. एल.एस.डी. सारखी मादकद्रव्ये अशा प्रकारच्या विषापासून तयार केली जातात. हे विष अरगट नावाच्या रोगकारक बुरशीमुळे धान्यात मिसळले जाते. ओट, बाजरी, ज्वारी यासारखी धान्ये, ज्यात अरगट बाधित दाणे (Grains) मिसळले जातात आणि त्यामुळे रोग होतात.

समीक्षक : शरद चाफेकर