महाकवी कालिदासलिखित संस्कृत खंडकाव्य. त्याची श्लोकसंख्या निरनिराळ्या प्रतीत १०० ते १२० दरम्यान आढळते; तथापि अधिकृत प्रतिप्रमाणे ती १११ आहे. दूतकाव्य नावाचा खण्डकाव्याचा उपप्रकार मेघदूतापासून रूढ झाला आणि मेघदूताची अनुसरण करणारी अनेक दूतकाव्ये पुढे संस्कृतात रचली गेली. मेघदूतावर सुमारे तीस टीका लिहिल्या गेल्या आहेत.
कोणा यक्षाला कर्तव्यच्युतीमुळे कुबेराने शाप देऊन एका वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली. रामगिरीवर विरहाचे आठ महिने त्याने कसेबसे काढले. आषाढाच्या प्रथमदिनी वर्षामेघांला पाहून आपल्या पत्नीकडे संदेश पाठविण्याची कल्पना त्याला आली, या भूमिकेवर मेघाला विनंती, प्रवासमार्ग, अलकेतील घराच्या खाणाखुणा आणि विरह व्यथित यक्षपत्नी यांचे वर्णन, तिला धीराचा संदेश, अशी या काव्यकथेची मांडणी आहे. रम्य कल्पनेतून मेघदूत साकारले आहे. मेघासारख्या निसर्गातल्या निर्जीव घटकाला संदेशवाहक बनविण्याची कवी कल्पना भामहाला सदोष वाटली; आधुनिकाला अवास्तव, अतिरंजित वाटेल तद्वतच विरहाला कारण होणारा शाप असंभाव्य वाटेल; पण प्रेमवेड्या माणसाला चेतन-अचेतन असा फरक कुठला हे कसे कळणार? म्हणून कवीने वाचकाला एका वेगळ्याच तरल, काव्यमय विश्वात नेले आहे.
पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे मेघदूताचे दोन भाग आहेत. पूर्वमेघात मध्यभारतातील रामगिरीपासून हिमालयाच्या अंतर्भागात वसलेल्या अलका नगरीपर्यंतचा प्रवासमार्ग यक्षाने वर्णन करून सांगितला आहे. त्या मार्गावरील डोंगर, नद्या, अरण्ये, उपवने, नगरे, मंदिरे आणि मुख्य म्हणजे त्या त्या ठिकाणचे समाजजीवन यांचे हृद्य विहंगमावलोकन कवीने वाचकाला घडविले आहे. यात यक्ष आणि त्याची उद्भूत नगरी, विरहाचे कारण, मेघाचे मानुषीकरणं इत्यादी तपशील काव्यदृष्ट्या साधन आहेत. यात निसर्गाला मानवी भावभावनांचे अंकुर फुटलेले आहेत. विशेषतः नद्या आणि मेघ यांना अनुक्रमे नायिका आणि नायक कल्पून कालिदासाने बहार आणली आहे. वास्तविक मेघाच्या मार्गावर उज्जयिनी नगरी येत नाही; तथापि मेघाला वाकडी वाट करून तिथे जाण्याचा आग्रह करून कालिदासाने उज्जयिनीच्या चित्रणाची हौस भागवून घेतली आहे. उज्जयिनीचे चित्रण वास्तव, तर अलकेचे चित्रण अद्भुत स्वप्ननगरीसारखे आहे.
उत्तरमेघात यक्षाच्या घराचे तपशीलवार चित्रण आहे. कवीने वर्णिलेली यक्षपत्नी रसिक वाचकाच्या मनात घर करणारी आहे. यक्ष पत्नीची मानवी मूर्ती आणि तिची बोलकी विरहव्यथा भावसत्याशी पुन्हा हातमिळवणी करतात. संवेदनशील मानवी हृदयाचे हे भावनिक सत्य हेच मेघदूताचे काव्यरूप सत्य म्हटले पाहिजे. अखेरीस “तुला तुझ्या प्रिय विद्युल्लतेचा विरह कधीही न होवो” अशा शुभेच्छा यक्षाने मेघाला अंतःकरणपूर्वक दिल्या आहेत.
संभोग आणि विप्रलंभ या शृंगाररसाच्या उभय प्रकारांचा मनोहर संगम कवीने साधला आहे. तो विरहित पतीने चिरयौवना पत्नीच्या केलेल्या अहर्निश चिंतनातून उद्भवला आहे. मंदाक्रांता हे वृत्तही काव्याच्या आशयाला साजेसे आहे. उपमा आणि अर्थान्तरन्यास या अलंकारांनी कालिदासाच्या चित्रदर्शी शैलीचे सौंदर्य विशेषच खुलवलेले आहे. प्रतिभा-व्युत्पत्ती-अभ्यास या तिन्ही प्रकारच्या काव्यसामग्रीचे एकजीव, मधुर रसायन म्हणजे मेघदूत. विशेषतः कालिदासाच्या सुसंस्कृत मनाचे मेघदूतात पडलेले प्रतिबिंब विलोभनीय आहे. त्यात कविमनाचा कानोसा आहे, एक चिरंतन अनुभूतीचा काव्यात्म अभिव्यक्ती मेघदूतात प्रकट होते.
मेघदूताचे अनुवाद सर्वच भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्येही झाले आहेत. उदा., एच्. एच्. विल्सनकृत इंग्रजी पद्यानुवाद (१८१३), माक्स म्यूलरचा जर्मन पद्यानुवाद (१८७४),ए. ग्वेरिनॉटचा फ्रेंच अनुवाद (१९०२) तसेच मराठीत विष्णुशास्त्री चिपळूणकर, चिंतामणराव देशमुख, कुसुमाग्रज, बोरकर, शांता शेळके अशा अनेक दिग्गज कवींनी मेघदूताचे सरस पद्यानुवाद केलेले आहेत.
संदर्भ :
- गोखले-माहुलीकर-वैद्य, अभिजात संस्कृत साहित्याचा इतिहास, मुंबई, २००४.
- मंगरुळकर-बापट-हातवळणे, (संपा.) मेघदूत, पुणे, १९५७.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.