शकुंतला : कविकुलगुरु  कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल या अजरामर नाटकाची नायिका आणि महाभारतातील एक स्त्रीपात्र. तिची कथा प्रथम महाभारताच्या आदिपर्वात आलेल्या शकुंतलोपाख्यानात आढळते. विश्वामित्र आणि मेनका यांची ही कन्या. जन्मतःच मातापित्यांनी तिचा अरण्यातच त्याग केला.अरण्यातल्या पक्ष्यांनी तिचे संरक्षण केले म्हणून कण्व ऋषींनी तिला शकुंतला हे नाव दिले (शकुन्तैः लालिता सा शकुंतला), आणि तिचा अपत्यवत् सांभाळ केला. ती लक्ष्मीप्रमाणे रूपवती होती असे व्यासांनी तिचे वर्णन केले आहे. कण्व आश्रमात नसताना शिकारीच्या निमित्ताने आलेला दुःष्यंत तिच्यावर मोहित झाला व त्याने तिला पत्नी होण्याविषयी विचारले, ‘माझ्या मुलाला युवराज करशील तरच तुझ्याशी विवाह करीन’ अशी अट घालून, तिने राजाशी गांधर्वविवाह केला. पुढे हस्तिनापुरला माघारी गेलेल्या राजाने तिला नेण्यासंबंधी काहीच हालचाल केली नाही.

image sources: pinterest

इकडे तिला मुलगा झाला, तो यौवराज्याभिषेकायोग्य वयाचा झाला, तेव्हा कण्वांनी तिची दुःष्यंताकडे पाठवणी केली. दुःष्यंत लोकांच्या भीतीने तिचा धिक्कार करतो. शकुंतला स्वतःला सावरून राजाला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करते. तिने राजाला धर्माचे स्मरण करून दिले, पत्नीची महती सांगितली, पुत्राचे महत्त्वही समजावले. तरीही राजा ऐकत नाही असे पाहिल्यावर संतापाने “तुझ्या डोक्याची शंभर शकले होतील” असे राजाला खडसावून “तू माझ्या मुलाचा स्वीकार केला नाहीस तरीही तो सम्राट होईलच” असा दुर्दम्य आत्मविश्वास ती प्रकट करते.अखेर राजान तिचा व तिच्या मुलाचा स्वीकार करतो. महाभारतातील ही शकुंतला मुक्त, निर्भीड, सुशिक्षित, बुद्धिमान, स्वाभिमानी आणि बाणेदार आहे. शकुंतलेच्या या व्यक्तिरेखेचा स्त्रीवादी, समाजशास्त्रीय अशा वेगवेगळ्या अंगांनी विचार करण्याचा प्रयत्न आधुनिक अभ्यासकांनी केला आहे.

कालिदासाने अभिज्ञानशाकुंतल या नाटकात चित्रित केलेली शकुंतला महाभारतातील कथेवर आधारित असली तरी त्या शकुंतलेपेक्षा अगदी वेगळी आहे.अलौकिक सौंदर्य,सौकुमार्य आणि रसरशीत तारुण्य यांची मूर्ती म्हणजे शकुंतला. निर्व्याज,अकृत्रिम मुग्धता हे तिचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.ती साक्षात निसर्गकन्या आहे.निसर्गासाठी तिच्या मनात सहोदर स्नेह भरून राहिलेला आहे. शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आलेला राजा दुष्यंत कण्वाश्रमात येतो. तेथे त्याला ही कण्वमुनींची मानसकन्या भेटते. परस्परांवर अनुरक्त होऊन ते गांधर्व विधीने विवाहबद्ध होतात. राजा आपले नाव असलेली अंगठी तिला देऊन राजधानीकडे निघून जाणार असतो. त्यानंतर एकदा शकुंतला  दुष्यंताच्या चिंतनात मग्न असता, अतिथी म्हणून आलेल्या दुर्वासमुनींच्या उपस्थितीकडे/अनावधानाने तिचे दुर्लक्ष होते.‘ज्याचे चिंतन तू करीत आहेस, त्याला तुझी विस्मृती होईल’ असा शाप ते संतापून देतात.तेव्हा तिच्या सख्या प्रियवंदा व अनसूया दुर्वासांची क्षमायाचना करतात. ती आल्यानंतर दुर्वास उःशाप देतात की अभिज्ञान किंवा ओळख म्हणून एखादा अलंकार दाखविला असता शापाचा अंत होईल. दुर्वासाच्या शापामुळे राजाला तिचे पूर्ण विस्मरण होते. मात्र शाप आणि उःशाप यांची तिला काहीच माहिती नसते.सासरी जाताना गर्भवती असल्याने आलेला शारीरिक थकवा आणि बेचैनी, हुरहूर, आतुरता यांच्यामुळे आलेला मानसिक ताण यांमुळे बोटातली राजमुद्रा गळून पडल्याचे भानही तिला स्वाभाविकपणे राहत नाही. राजाने केलेल्या अव्हेराचा आघात होतो, राजाला स्मरण करून देण्याचा तिचा प्रयत्न विफल ठरतो आणि शकुंतला विकल होऊन कोलमडून पडते. महाभारतातील स्वतंत्र बाण्याची शकुंतला कालिदासाच्या नाटकात दिसत नाही हे खरे; पण शेवटच्या सातव्या अंकात इंद्राच्या आंमत्रणावरून दुष्यंत असुरांशी लढण्यासाठी स्वर्गलोकी जातो. परत येताना हेमकूट पर्वतावर मारिच ऋषींच्या आश्रमात त्याला शकुंतला व तिला झालेला सर्वदमन हा पुत्र भेटतो. सर्व गोष्टींचा उलगडा होऊन त्यांचे मीलन होते. या अंकात राजाला पश्चाताप होऊन तो अक्षरशः लोटांगण घालून तिची क्षमा मागतो. कालिदासाने तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान करण्याचा प्रयत्न येथे केला आहे. अल्लड प्रणयिनीपासून जीवनाच्या कटु अनुभवांनी अकाली प्रौढ, गंभीर, तपस्वी झालेल्या पुरंध्रीपर्यंत कालिदासाने रंगवलेले शकुंतलेच्या व्यक्तिरेखेचे हे वेगवेगळे पैलू वाचकाच्या हृदयात घर करतात.

संदर्भ :

  • भट, गो. के., संस्कृत नाटके आणि नाटककार, पुणे, १९८०.
  • वाळिंबे, रा. शं.,संपा. अभिज्ञानशाकुन्तल, पुणे, १९५६.