विंटरनिट्‌स, मॉरिझ : (२३ डिसेंबर १८६३ – ९ जानेवारी १९३७). थोर प्राच्यविद्याविशारद. हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर या ग्रंथाचे लेखक म्हणून ते विशेषतः ओळखले जातात. त्यांचा जन्म लोअर ऑस्ट्रियातील होर्न येथे एका किराणामाल व्यापाऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण होर्न येथील शाळेत झाले. व्हिएन्ना येथील विद्यापीठात त्यांनी भाषाभ्यास आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचे अध्ययन केले. तेथे गेओर्ख ब्यूलऱ आणि ऑयगेन हुल्श हे विद्वान त्यांना प्राध्यापक म्हणून लाभले. विशेषतः ब्यूलरच्या प्रभावामुळे ते भारतविद्येकडे आकर्षित झाले.त्यांनी ‘एन्शंट इंडियन मॅरेज रिच्युअल अकॉर्डींग टू आपस्तंब, कंपेअर्ड विथ द मॅरेज कस्टम्स ऑफ द इंडो-यूरोपियन पीपल्स’ हा प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली (१८८६). याच आधारे नंतर आपस्तंबीय गृह्यसूत्राची चिकित्सित आवृत्तीही त्यांनी तयार केली (१८८७). १८८८ ते १८९२ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठात विख्यात प्राच्यविद्याविशारद माक्स म्यूलर ह्यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. सायणभाष्यासह ऋग्वेदाची दुसरी आवृत्ती तयार करण्याच्या कामी माक्स म्यूलरला त्यांनी साहाय्य केले.विंटरनिट्स यांनी कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यासाठी ऑक्सफर्ड येथील मुलींच्या माध्यमिक शाळेत संस्कृत आणि जर्मन हे विषय शिकवले. ऑक्सफर्डमधील इंडियन इन्स्टिट्यूटच्या ग्रंथपालाची जबाबदारीही त्यांनी काही काळ सांभाळली. १८९८ पर्यंत ते ऑक्सफर्डमध्ये होते. १८९९ साली प्राग येथील कार्ल फर्डिनांड जर्मन विद्यापीठात ते इंडोआर्यन भाषाशास्त्र  आणि मानवजातिविज्ञान (Indo-European philology and ethnology) ह्या विषयांचे व्याख्याते म्हणून काम करू लागले. तेथेच १९०२ मध्ये संस्कृत विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९११ मध्ये ते प्राध्यापक झाले.

विंटरनिट्स प्रागला गेले त्याचकाळात विख्यात जर्मन स्विस अमेरिकन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन दीड वर्ष तेथील विद्यापीठात होते.दोघेही धर्माने ज्यू. विंटरनिट्स कुटुंबियांशी आइन्स्टाइन यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. प्रागमध्ये असेपर्यंत आइन्स्टाइन त्यांच्या घरी नियमितपणे जात असत.फनी रेक हिच्याशी १८९२ मध्ये विंटरनिट्स यांचा विवाह झाला. त्यांना चार मुले आणि एक मुलगी होती. १९०५ मध्ये पत्नीचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर  १९०८ साली त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव बेर्टा नागेल असे होते.

१९२१ साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या प्राग भेटीदरम्यान विंटरनिट्स यांची त्यांच्याशी मैत्री झाली. रवींद्रनाथ टागोर यांच्या निमंत्रणावरून १९२२-२३ दरम्यान विश्वभारती संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. नोव्हेंबर १९२२ मध्ये त्यांनी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराला भेट दिली. रवींद्रनाथ टागोर यांच्या  ७५व्या जयंतीनिमित्त १९३६ मध्ये रवींद्रनाथ टागोर : धर्म आणि कवीची विश्वविषयक दृष्टी या नावाची पुस्तिका त्यांनी लिहिली. तसेच महात्मा गांधीं यांच्यावरही त्यांनी लेख लिहिले. या लेखांचे बंगाली भाषांतर १९९४ मध्ये कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) येथून प्रसिद्ध झाले आहे.महाभारताची चिकित्सित आवृत्ती काढण्याची कल्पना सर्वप्रथम विंटरनिट्स यांनी १८९७ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या प्राच्यविद्या अभ्यासकांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेस मध्ये मांडली होती. ते काम ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ द अकॅडेमीज’ ह्या संस्थेने हाती घेतलेही होते; पण पहिल्या महायुद्धाच्या काळात ते थांबले. त्यानंतर ते काम पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने हाती घेतले, तेव्हा विंटरनिट्‌स यांनी त्याच्या संपादक मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाभारतावर  विंटरनिट्स  यांनी अनेक लेख लिहिले. हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर या त्यांच्या ग्रंथात दीडशेहून अधिक पाने केवळ महाभारताची माहिती दिलेली आहे.

विंटरनिट्स यांनी  लिहिलेले वा संपादिलेले काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ असे :आपस्तंबीय गृह्यसूत्र (इंग्रजी; संपा., चिकित्सित आवृत्ती – १८८७); द मंत्रपाठ (इंग्रजी; संपा., १८९७, पहिल्या भागाचे हरदत्तभाष्यसहित इंग्रजी भाषांतर); Das Altindische Hochzeitrituell (जर्मन; प्राचीन भारतीय विवाहविधी (म.शी.- १८९२); सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट ह्या ग्रंथमालेची विषयांची आणि नावांची सर्वसाधारण सूची (इंग्रजी – १९१०); Die Frau in den indischen Religionen (जर्मन; द वूमन इन ब्रॅह्मॅनिझम इं. शी.,भारतीय धर्मातील स्त्री म. शी. – १९२०) आणि Geschichte der indischen Literatur (जर्मन; हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर इं. शी., भारतीय साहित्याचा इतिहास म. शी. -१९०५-१९२२).

हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर  या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत. पहिला खंड दोन भागांत आहे. त्यांतील पहिला भाग वेदांविषयीचा. तो १९०५ साली प्रसिद्ध झाला. दुसऱ्या भागात (१९०८) आर्ष महाकाव्ये आणि पुराणे ह्यांचा परामर्श घेतला आहे. दुसऱ्या खंडाचेही पुन्हा दोन भाग आहेत. त्यांपैकी पहिला (१९१३) बौद्ध साहित्याला वाहिलेला असून दुसऱ्यात (१९२०) जैनांच्या धार्मिक साहित्याचा इतिहास दिला आहे, तिसऱ्या खंडात (१९२२) काव्य आणि कथासाहित्य, वैज्ञानिक साहित्य, आधुनिक भारतीय साहित्य इत्यादींचा आढावा घेतला आहे. सुभद्रा झा ह्यांनी तिसऱ्या खंडाचा इंग्रजी अनुवाद केला आहे (दोन भाग १९६३, १९६७). संस्कृत साहित्याचा हा सर्वांत वाचनीय असा इतिहासग्रंथ आहे. सुंदर भाषाशैली, आकर्षक विषय-मांडणी व पूर्वग्रहविरहित लेखन ही याची खास वैशिष्ट्ये आहेत. शीलवती केतकर यांनी केलेला पहिल्या दोन खंडांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध आहे. श्रीनिवास शर्मा यांनीही दोन खंडांचा अनुवाद केला आहे.विंटरनिट्‌स  ह्यांनी दिलेली काही व्याख्याने सम प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन लिटरेचर (१९२५) ह्या नावाने कोलकाता विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्यांनी कौटिल्य, भास, तंत्रसाहित्य इत्यादींवर केलेल्या सखोल संशोधनाचा त्यांतून प्रत्यय येतो. विद्वत्ताप्रचुर लेखनाला वाहिलेल्या अनेक भारतीय व यूरोपीय नियतकालिकांतून त्यांचे भारतविद्येशी संबंधित असे अनेक व्यासंगपूर्ण लेख प्रसिद्ध झालेले आहेत. माक्स म्यूलर ह्यांच्या अँथ्रोपॉलॉजिकल रिलिजन (१८९४), सायकॉलॉजिकल रिलिजन (१८९५) ह्या ग्रंथांचा जर्मन अनुवाद विंटरनिट्‌स ह्यांनी केला.त्यांनी लिहिलेले ग्रंथ व विद्वत्तापूर्ण लेख यांची संख्या ४५२ आहे.

विंटरनिट्‌स ह्यांनी अनेक भारतीय अभ्यासकांना भारतीय साहित्याचा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास करण्यास प्रेरणा दिली. चेकोस्लोव्हाकियातील (आताच्या चेक प्रजासत्ताकातील) प्राग येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Chakrabary Debabrata, Savant and Seer, Moriz Winternitz: His World-View and India’s Contribution to it, Unpublished doctoral dissertation, Jadavpur University, Kolkata, 2009.

समीक्षक – ग. उ. थिटे