कलांद, व्हिलम : (२७ ऑगस्ट १८५९ – २० मार्च १९३२). जर्मन भारतविद्यावंत, वैदिक साहित्याचे आणि कर्मकांडाचे महान अभ्यासक. त्यांचा जन्म ब्रिएल् येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे अध्ययन लायडन् येथे झाले. अल्पवयातच त्यांना संधिवाताचा रोग झाल्यामुळे हृदयविकारही जडला. मात्र काळजीपूर्वक आणि संयमी जीवनशैलीने त्यांनी सुमारे त्र्याहत्तर वर्षांचे आयुष्य प्राप्त केले. अभिजात वाग्विद्येच्या अध्ययनाला सुरुवात करून रोमन नाणकशास्त्रावर त्यांनी पीएच्.डी प्राप्त केली (१८८३). नंतर केर्न् ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय विद्येच्या अध्ययनाला प्रारंभ केला. १९०३ मध्ये उत्रेक्त विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे त्यांनी संस्कृत, अवेस्ता आणि इंडो-जर्मॅनिक वाग्विद्या ह्या विषयांचे अध्यापन केले. त्यांचे लेखनकार्य मुख्यत्वेकरून वैदिक कर्मकांड आणि त्या विषयाशी संबद्ध ग्रंथांचे संपादन, भाषांतर ह्या स्वरूपाचे आहे. वेद आणि तौलनिक वाग्विद्या ह्या क्षेत्रांत  त्यांनी डच, फ्रेंच, जर्मन आणि इंग्लिश भाषांमधून लेखन केले. Altindischer Ahnenkult (१८९३ ,प्राचीन भारतीय पितृकार्य), Die altindischenTodten – und Bestattungsgebräuche (१८९६, प्राचीन भारतीय अंत्येष्टी विधी), AltindischesZaubennritual  (१९००, प्राचीन भारतीय यात्वात्मक कर्मे), L’Agniṣṭoma (१९०६-०७,अग्निष्टोमयज्ञ -व्हिक्टर हेन्री यांच्या सहकार्याने) , AltindischeZauberei (१९०८, प्राचीन भारतीय काम्येष्टिकर्मे) ह्यांसारखी त्यांची पुस्तके वैदिक कर्मकांडावरील त्यांच्या अध्ययनाचे स्वरूप स्पष्ट करतात. त्यांनी भारतास भेट दिली नव्हती;  पण केवळ ग्रंथ वाचून त्यांनी वैदिक कर्मकांडातील बारकावे इतके उत्तमपणे आणि स्पष्टपणे वर्णिले आहेत की एखाद्या ऋत्विजाला आज जरी एखादे कर्मकांड कसे करावयाचे ह्याविषयी काही शंका आल्यास, त्यांना ह्या ग्रंथांच्या साहाय्याने आपल्या शंकेचे निवारण करून घेता येईल. त्यांनी कर्मकांडातील  पारिभाषा आणि त्याचे अन्वयार्थ स्पष्ट केले. ह्याशिवाय बौधायनश्रौतसूत्र (१९०७), जैमिनीय संहिता (१९०७) ह्यांसारख्या ग्रंथांची चिकित्सापूर्वक संपादने केली असून आपस्तम्बश्रौतसूत्र (१९२१), पञ्चविंशब्राह्मण ह्यांसारख्या कर्मकांडविषयक ग्रंथांचे जर्मन, इंग्लिश भाषेतील अनुवाद हेही त्यांचे कार्य फारच महत्वाचे आहे. शिवाय वैदिक कर्मकांडातील काही प्रश्न, तसेच त्या विषयावरील ग्रंथांच्या संपादनातील आणि अर्थग्रहणातील विविध समस्या हया विषयांवरील असंख्य लेख विविध नियतकालिकांतून त्यांनी प्रकाशित केले होते. अर्थात हे इतके विपुल लेखन त्यांनी आपली अध्यापनादी कार्ये चालू ठेवून, तसेच फारशी अनुकूल नसलेली शरीर-प्रकृती सांभाळून केले. ते व्हायोलिनवादनातही कुशल होते. अठरावी प्राच्यविद्यापरिषद जेव्हा लायडेनमध्ये झाली, तेव्हा त्या परिषदेत भारतीयविद्या ह्या विभागाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला. मृत्यूपूर्वी दहा दिवसच लायडेनमधील सूत्रविषयक अनेक हस्तलिखिते त्यांनी आपल्या उत्रेक्त येथील निवासस्थानी मागवून घेतली होती.

हृदयरोगाने त्यांचे उत्रेक्त येथे निधन झाले.

संदर्भ: Vogel J. Ph. ,(Caland:Obituary), The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland, No. 3 ,July 1932.