विसाव्या शतकात उदयास आलेले अब्जांश तंत्रज्ञानामध्ये मानवी जीवन आमूलाग्र बदलण्याची क्षमता दिसून येत आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत पदार्थांची रचना, गुणधर्म आणि त्यांत काही प्रमाणात घडवून आणता येणारे बदल यांचा विचार अणू आणि रेणू यांच्या रचनेत फारसा फेरफार करता येणार नाही असे गृहीत धरून केला गेला. अब्जांश तंत्रज्ञानाने मात्र या विचारप्रणालीला धक्का दिला आहे. आता अणूंची रचना हवी तशी बदलता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवर्त सारणीत (Periodic Table) वर्गीकरण  केलेली मूलद्रव्ये वेगवेगळे गुणधर्म दाखवितात.याचे कारण त्यांच्या अणूंची असणारी भिन्न रचना. विश्वाच्या उत्पत्ती प्रक्रियेत या रचना तयार झाल्या. आजपर्यंत अशा रचना  ‘जशा आहेत तशा ’ स्वीकारल्या गेल्या आहेत. अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रचना हव्या तशा बदलता आल्या, तर मानवाला एका मूलद्रव्यापासून दुसऱ्या मूलद्रव्यांची निर्मिती करता येणे शक्य होईल.

अब्जांश कणांचा पाहिजे असा वापर करून निर्माण केलेला धातू आणि प्रचलित धातू यांच्या गुणधर्मांमध्ये पुष्कळ फरक आढळतो . अब्जांश कणांचा वापर करून बनविलेल्या सोन्याचा रंग पिवळा असेलच असे नाही. तो निळाही असू शकतो. त्याचप्रमाणे पदार्थांचे तापमान वाढू न देता पदार्थाची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता कितीतरी पटींनी वाढविता येते. तसेच अब्जांश कणांचा वापर करून पदार्थांचे वजन पेलण्याची क्षमताही शेकडो पटींनी वाढते. याचा अर्थ काही ग्रॅम वजनाचा अब्जांश पदार्थ कित्येक टन वजन सहजपणे पेलू शकतो. सामान्यतः पदार्थांचा कणखरपणा आणि वजन यांचा परस्परांशी संबंध असतो. बंदूक अथवा पिस्तुल यांमधून सुटणाऱ्या गोळीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सैनिक तसेच पोलीस चिलखत वापरतात. चिलखत बोजड आणि वजनाने जास्त असल्याने ते वापरण्यासाठी सोयीस्कर नसते. अब्जांश तंत्रज्ञानाचा वापर करून कणखर, चिवट पण वजनाने हलके असे पदार्थ निर्माण करता येतील. त्यामुळे चिलखतांची जाडी आणि वजन कमी होईलच; परंतु अशी चिलखते अधिक मजबूतही असतील. अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग मजबूत यंत्रे, उपकरणे तयार करण्यासाठी होऊ शकतो.

अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अतिसूक्ष्म आकारमानाची यंत्रे आणि उपकरणे देखील तयार करता येतील. अशा यंत्रांचा आणि उपकरणांचा उपयोग अनेक प्रकारे करता येणे शक्य आहे.  भविष्यात जेव्हा अब्जांश कॅमेरा व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होईल तेव्हा अशा कॅमेऱ्यांचा उपयोग टेहळणीसाठी, घरांच्या संरक्षणासाठी, मानवी शरीरातील पेशींच्या निरीक्षणासाठी होऊ शकेल. तसेच असा कॅमेरा वापरून रेणूंच्या हालचालींचा व त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा वेधही घेता येईल. ही यंत्रे मानवी शरीरात राहून रक्तातील साखरेचे प्रमाण मोजतील तसेच हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच त्याबाबतची सूचना देतील. रक्तवाहिन्यांतील अडथळा दूर करण्यासाठीही या यंत्राचा उपयोग होईल.

कर्करोगावर इलाज करण्यासाठी अब्जांश तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकेल. इलेक्ट्रॉन बाहेर टाकणाऱ्या अब्जांशी पदार्थांचा उपयोग कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी करता येऊ शकतो. शरीराला हानिकारक असलेल्या प्रारणांचा (Radiations) उपयोग त्यामुळे टाळता येईल. अब्जांश तंत्रज्ञानामुळे मिरगी, अल्झायमर, लकवा यांसारख्या शारीरिक व्याधींवर उपाय सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेशींचे बिघडलेले कार्य जर पूर्वपदावर आणता आले तर हे शक्य आहे. अब्जांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्वसनसंस्थेला होणाऱ्या व्याधींची सूचना अगोदरच  मिळेल. मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीराला आवश्यकतेनुसार इन्शुलिनचा पुरवठा करता येईल. तसेच ज्ञानेंद्रिये आणि प्रजोत्पादनाशी संबधित अवयव यांमधील बिघाड दुरुस्त करता येतील. शरीरावरील जखमेतून होणारा रक्तस्राव तात्काळ थांबविता येईल आणि जखमेला जीवाणू बाधा होणार नाही, याची काळजी घेता येईल. जखम लवकर भरून येण्यासाठी उपाय करता येतील. शरीरातील पांढऱ्या पेशी रोगांचा प्रतिकार करतात. मात्र कधी कधी हा प्रतिकार कमी पडतो. अब्जांश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शरीरात समांतर रोगप्रतिकारक यंत्रणा निर्माण करता येईल. या विवेचनावरून अब्जांश तंत्रज्ञान हे विविध रोगांवर उपचार आणि आरोग्याची निगा यांबाबतीत किती प्रभावी ठरू शकते, याची कल्पना करता येते.

मानवी जीवनाशी संबंधित इतरही अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता अब्जांश तंत्रज्ञानात आहे. अन्नाची चव बदलण्याची सोय झाल्यास कारल्याची  कडू चव बदलून त्याच्या गुणकारी घटकांचा फायदा घेता येईल. अन्न अधिक काळ टिकविण्यासाठी बनविलेली सीलबंद पाकिटे अधिक परिणामकारक असतील. ऑक्सिजनचा संपर्क अन्नपदार्थांशी येऊ नये यासाठी सूक्ष्म यंत्रांची योजना करता येईल. ब्रेडचा ताजेपणा टिकविण्यासाठी त्यातील प्रथिनांना अधिक सक्षम बनविता येईल. खनिज तेलांमध्ये असणाऱ्या पाण्याचा अंश बाहेर काढणे अत्यंत अवघड आणि किचकट काम असते. त्याचप्रमाणे त्यात असणारे वायू आणि जड धातूदेखील अलग करावे लागतात. अब्जांश तंत्रज्ञानामुळे हे काम अधिक सुलभ होईल. उपकरणांचे  आकारमान कमी होईल; पण त्याचबरोबर त्यांची उपयुक्तता अनेक पटींनी वाढेल. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी लागणाऱ्या विविध सुविधा एखाद्या छोट्या उपकरणामध्ये सहज बसवता येतील. तसेच न मळणारे, अधिक टिकणारे आणि स्वस्त असे कपडे  उपलब्ध होतील.

हे सगळं जरी खरं असलं तरी अब्जांश तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे. मानवी कल्याणासाठी ते  विकसित करीत असताना त्यापासून येऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्यांचाही गांभीर्याने विचार करावा लागेल. नवनवीन विघातक अस्त्रे बनविण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. ही अस्त्रे एवढी सूक्ष्म असतील की त्यांचा शोध घेणेदेखील अत्यंत कठीण असेल. शत्रूंच्या गोटातील माहिती मिळविण्यासाठी त्यांच्या सैनिकांच्या शरीरातच सूक्ष्म उपकरणाचे रोपण करता येईल. सूक्ष्म आकारमानाचे संगणक विकृत प्रवृत्तीचे लोक अवैध रीत्या ताब्यात घेऊन त्यांचा पाहिजे तसा उपयोग करू शकतील.

समीक्षक : वसंत वाघ