कट्टाबोली : युवावर्गाच्या भाषाव्यवहारातील भाषारुपासाठीची संज्ञा. समाजभाषाविज्ञानामध्ये सामाजिक घटकांमुळे निर्माण होणारी भाषिक विविधता हे अभ्यासाचे एक महत्वाचे क्षेत्र आहे. कोणत्याही भाषाव्यवहाराचे स्वरूप त्यातील सहभागी व्यक्तींचे परस्परसंबंध, त्यांची सामाजिक स्थाने, संभाषणाचा विषय, उद्देश, संभाषणाचे स्थान यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. ‘कट्टाबोली’ हे नावच संभाषणस्थानावरून आलेले आहे. मुख्यत्वे महाविद्यालयांसारख्या ठिकाणी वर्गाबाहेर कट्ट्यांवर बसून अनौपचारिक गप्पा मारताना तरुणांकडून होणाऱ्या भाषेच्या वापराचे वेगळेपण नोंदवताना हे नाव गेले. आता इतरही लोक आपल्या गटासाठी ‘कट्टा’ हे नाव वापरीत असले तरी भाषाभ्यासाकांच्या दृष्टीने ‘कट्टाबोली’ ही तरुणांच्या गटांचीच असते.

भाषाव्यवहार हे व्यक्तींच्या सामाजिक वर्तनाचेच एक रंग असते. व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये जे विविध टप्पे दिसतात. त्यांचा भाषिक वर्तनाशीही संबंध दिसून येतो. युवकांच्या भाषेवरही त्यांच्या वयोगटाशी संबंधित मनोशारीर आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रियांचे परिणाम दिसून येतात. औचित्याचे समाजमान्य भाषिक संकेत धुडकावून केलेला शब्दांचा वापर, आपल्या मनातला आशय व्यक्त करण्यासाठी घडवलेले नवेच भाषिक संकेत, तत्कालीन ताज्या संदर्भांचा संदेशनासाठी उपयोग, आपल्या गटातल्याच सदस्यांनाच कळणाऱ्या सांकेतिक शब्दांची योजना ही कट्टाबोलीची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. उदाहरणादाखल पाहायचे तर आताच्या मराठी तरुणांच्या तोंडची ‘सही’,’रापचिक’, इ. विशेषणे आणि ‘गंडलाय’, ‘धुतला’ या प्रकारची क्रियापदे . या तरुणांना एकीकडे स्वत:ची ओळख प्रस्थापित करायची असते, दुसरीकडे आधीच्या पिढीविषयीचा दुरावा आणि कमी-अधिक असंतोषही असतो. त्यांच्या त्यांच्या गटाशी त्यांची बांधिलकी घट्ट असते. त्यांनी मित्रत्वापोटी एकमेकांना आणि चिकित्सकपणातून बाहेरच्यांना दिलेली टोपणनावेही अनाकलनीय असतात. याच टप्प्यावर लैंगिक प्रेरणाही प्रबळ असतात. प्रस्थापित सामाजिक चौकटीत त्यांना वाव असतोच असे नाही. त्यामुळे त्यांचाही अविष्कार कधीकधी समाजाच्या दृष्टीने अशिष्ट भाषिक प्रयोगातून होत असते. कट्टाबोली ही प्रामुख्याने गटातल्या अनौपचारिक गप्पांसाठीच वापरली जात असल्यानेही त्यात अनिर्बंधता वाढते.‘वासूनाका’ (भाऊ पाध्ये), ‘कोसला’ (भालचंद्र नेमाडे) या कादंब-यांमधील तरुणांच्या बोलण्यातून त्यांची-त्यांची कट्टाबोलीच प्रकटते आहे.

तरुणांचा हा गट कोणत्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणात वावरतो आहे याचाही परिणाम त्यांच्या बोलीवर दिसतो. भाषेतर संदर्भांचा मोठा वापर या संभाषणामधून होत असल्याने त्याप्रमाणे या बोलींमधील संकेत बदलतात. ‘विकेट उडवणे’, ‘भिडणे’, ‘कडेला घेणे’ असे काही वाक्प्रयोग सारखे दिसले तरी त्यातून सूचित होणारे अर्थ मध्यमवर्गीय तरुणांच्या बाबतीत शाब्दिक स्तरापुरते राहतात, तर शहरी निम्नवर्गीय  गटांमध्ये थेट मारामारीपर्यंत येऊन पोहोचतात.

या परिसराची बहुभाषिककताही युवकांच्या बोलीत प्रतिबिंबित होते. गटातील सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याने भाषिक संकेतांमधेही संमिश्रता येते. भाषाबदल आणि भाषामिश्रण मोठ्या प्रमाणावर दिसते. मराठी तरुणांच्या बोलीमध्ये हिंदी-इंग्रजी शब्दांचे प्रमाण अधिक दिसण्यात हेही एक कारण आहे. त्यामुळे युवावर्गाच्या या बोलींमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसते. तसेच ताज्या घडामोडींचे प्रतिबिंब तिच्यात पडत असल्यामुळे होणारा बदलही त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसतो. कट्टाबोलीचा वापर करणारे युवक त्या गटापुरताच तो करीत असतात. जसे ते कुठल्यातरी क्षेत्रात प्रवेश करून स्थिर होऊ लागतात, तसे त्यांचे सामाजिक वर्तुळ विस्तारते. इतरांशी बोलताना हे युवक प्रचलित भाषिक संकेतांचाच वापर करीत असतात. आपल्यावर येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या निभावताना, प्रचलित व्यवस्थेशी जुळवून घेत असताना त्यांचा कट्टाबोलीचा वापरही मर्यादित होत जातो.

अलीकडे संपर्कमाध्यमांचे बदललेले स्वरूप आणि वाढलेला प्रसार, जागतिकीकरण यांचाही परिणाम युवावर्गाच्या भाषिक व्यवहारावर होतो आहे. भाषासंपर्काची प्रक्रिया, ‘स्व’ची घडण व अविष्कार, अस्मितांचे राजकारण अशा विविध दृष्टिकोणातून कट्टाबोलींचा आंतरविद्याशाखीय अभ्यास त्यामुळे होतो आहे.