शब्दांची रचना, वाक्यांतर्गत पदांचा क्रम अशा भाषिक गुणधर्मांच्या आधारे भाषांचे वर्गीकरण करण्याची पद्धती. भाषाविज्ञानामध्ये भाषांचे वर्गीकरण हे तीन दृष्टीकोनांतून केले जाते- १.कुलनिष्ठ (genealogical) २. स्थलनिष्ठ (areal) ३. प्रभेदात्मक (typological) भाषाप्रभेदात्मक दृष्टिकोनाचा पाया हा खऱ्या अर्थाने जोसेफ ग्रीनबर्ग यांच्या संशोधनाने घातला गेला. त्यांच्या ‘सम् युनिवर्सल्स ऑफ ग्रामर विथ पर्टिक्युलर रेफरन्स टू द ऑर्डर ऑफ मिनिंगफुल एलेमेंट्स’ (१९६३) या निबंधात त्यांनी सुमारे तीस भाषांचा तौलनिक अभ्यास करून काही निरीक्षणे मांडली. यामध्ये त्यांनी एखाद्या भाषेतील (वाक्यातील) शब्दांचा मूलभूत क्रम (basic word order) आणि त्या भाषेचे गुणधर्म यांचा परस्परसंबंध दाखवून दिला.

उदा. प्राथमिक मूलभूत शब्दक्रम ‘कर्ता-कर्म-क्रियापद’ (Subject-Object-Verb) असलेल्या भाषांमध्ये ‘उत्तरयोगी अव्यये (postpositions)’ आढळतात.

  • मराठी : पुस्तक टेबलावर आहे.

मात्र इंग्रजीसारख्या ‘कर्ता-क्रियापद-कर्म’ (Subject-Verb-Object) असा प्राथमिक मूलभूत शब्दक्रम असणाऱ्या भाषेत ‘पूर्वयोगी अव्यये (prepositions)’ आढळतात.

  • इंग्रजी : The book is on the table.

या उदाहरणावरून लक्षात येते की, पुस्तकाचे टेबल-सापेक्ष स्थान दर्शवणारे ‘-वर’ हे अधोरेखित अव्यय मराठीत उत्तरयोगी आहे म्हणजेच ते वाक्यात ‘टेबल’ नंतर येते. इंग्रजीमध्ये मात्र पुस्तकाचे टेबल-सापेक्ष स्थान दर्शवणारे ‘on’ हे अधोरेखित अव्यय पूर्वयोगी आहे म्हणजेच ते वाक्यात ‘टेबल’ पूर्वी येते.

‘कर्ता-कर्म-क्रियापद’हा प्राथमिक मूलभूत शब्दक्रम असलेल्या मराठीसारख्या भाषांचे आणखी काही गुणधर्म पुढीलप्रमाणे :

उदा. १) अशा भाषांमध्ये विशेषण (अधोरेखित) हे नामाच्या आधी येते.

  • लहान खेडे

उदा. २) अशा भाषांमध्ये रीतिवाचक क्रियाविशेषण (manner adverb) हे क्रियापदापूर्वी येते.

  • तो खूप हळूहळू चालतो.

उदा. ३) अशा भाषांमध्ये संख्यावाचक (numeral) शब्द हे नामाच्या आधी येतात.

  • पाच पुस्तके ऊ) शंभर दुकाने

ग्रीनबर्ग यांनी आपल्या निरीक्षणांद्वारे मांडले की अशाप्रकारचे मुलभूत शब्द्क्रमामधील फरक हे भाषेचे विविध गुणधर्म आणि त्यांचे विविध भाषांत आढळणारे वैविध्य यांना कारणीभूत ठरतात. पुढे मॅथ्यू ड्रायर (१९९७) यांनीही आपल्या ‘ऑन सिक्स-वे वर्ड ऑर्डर टायपोलॉजी’ या निबंधात ग्रीनबर्ग यांनी मूलभूत शब्द क्रमाबाबत केलेल्या कामाची चिकित्सा करून सुधारित वर्गीकरण मांडले. यामधूनच भाषेतील वैश्विक नियम (लँग्वेज युनिवर्सल्स) आणि वैश्विक कल (युनिवर्सल टेन्डन्सीज) यांची संकल्पना पुढे आली. भाषेतील वैश्विक नियम म्हणजे कोणत्याही भाषेला कोणत्याही अपवादाशिवाय लागू पडणारे नियम. उदा. प्रत्येक भाषेमध्ये सर्वनामे आढळतात. ‘वैश्विक कल’देखील बहुतांश भाषांमध्ये आढळतात मात्र त्यांना काही अपवाद आढळतात, उदा. पर्शिअन भाषेचा अपवाद वगळता ‘कर्ता-कर्म-क्रियापद’ (Subject-Object-Verb) असा प्राथमिक मूलभूत शब्दक्रम असलेल्या सर्व भाषांमध्ये ‘उत्तरयोगी अव्यये (postpositions)’ आढळतात.

काही वेळा भाषेमधल्या विशिष्ट गुणधर्माच्या अस्तित्वावरून दुसऱ्या गुणधर्माचे अस्तित्व अभिव्यंजित (implied) असते. म्हणजेच, ‘जर एखाद्या भाषेत ‘क्ष’ हा गुणधर्म असेल तर त्या भाषेत ‘ज्ञ’ हा गुणधर्मदेखील असतो,’ अशाप्रकारचे नियम भाषेच्या बाबतीत सांगता येतात. अशा नियमांना ‘अभिव्यंजक (implicational) वैश्विक नियम’ असे म्हणतात. उदा. जर एखाद्या भाषेत ‘लिंग (gender)’ ही व्याकरणिक कोटी (grammatical category) असेल तर त्या भाषेत ‘वचन (person)’ ही कोटीदेखील असते. याउलट, काही नियमांचे अस्तित्व अशा कोणत्याही विशिष्ट गुणधर्मांवर अवलंबून नसते. अशा नियमांना अनभिव्यंजक (non-implicational) वैश्विक नियम असे म्हणतात. उदा. प्रत्येक भाषेत स्वर (vowels) आढळतात.

प्रभेदात्मक दृष्टीकोनामध्ये भाषांचे वर्गीकरण करताना भाषेच्या ध्वनी, पद, वाक्य, अर्थ अशा वेगवेगळ्या स्तरांचा विचार केला जातो. यातील अर्थविचारासंबंधीचा ब्रेंट बर्लिन आणि पॉल के (१९६९) यांनी मांडलेला ‘मूलभूत रंगसंज्ञांचा श्रेणीसोपान (hierarchy of basic colour terms)’ हे एक अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे. भाषेमध्ये जर एखाद्या रंगासाठीची संज्ञा त्या भाषेच्या ‘पायाभूत शब्दनिधी (basic vocabulary)’ मध्ये नसेल तर त्यासाठी एखादी व्युत्पन्न (derived) संज्ञा वापरली जाते. व्युत्पन्न रंगसंज्ञा या भाषेतील उपलब्ध शब्दांपासून बनतात. जर एखाद्या भाषेत ‘क्ष’ या रंगासाठी मूलभूत संज्ञा असेल, तर त्या भाषेत या श्रेणीसोपानामध्ये ‘क्ष’ च्या डावीकडे येणाऱ्या प्रत्येक रंगासाठी मूलभूत संज्ञा असते. उदा. मराठीत निळ्या (blue) रंगासाठीची संज्ञा ही मूलभूत आहे याचाच अर्थ त्याच्या डावीकडे आढळणारे लाल, हिरवा, पिवळा, काळा आणि पांढरा या रंगांसाठीच्या संज्ञादेखील मूलभूत संज्ञा आहेत. याउलट, नारिंगी किंवा जांभळ्या रंगांसाठीच्या संज्ञा ह्या निसर्गात आढळणाऱ्या त्या रंगांच्या वस्तूंवरून तयार केलेल्या (derived) आहेत.

बर्लिन आणि के (१९६९) यांचा मूलभूत रंगसंज्ञांचा श्रेणीसोपान:

 

काळा

पांढरा   <

 

 

लाल    <

 

हिरवा

पिवळा   <

 

 

निळा    <

 

 

तपकिरी   <

जांभळा

गुलाबी

नारिंगी

राखाडी

 

वैश्विक नियम वा कल यांचे अस्तित्व एकाच भाषाकुलात किंवा एकाच भौगोलिक प्रदेशात नसणाऱ्या भाषांमध्येही आढळणारे साधर्म्य दर्शविते. याचा अभ्यास करणारे ग्रीनबर्ग आणि इतर भाषावैज्ञानिक वैश्विक नियमांच्या आकलनासाठी अनेक भाषांचा आणि भाषिक नमुन्यांचा तौलनिक अभ्यास करणे इष्ट मानतात. नोम चॉम्स्की आणि त्यांच्या अनुयायांच्या मते मात्र वैश्विक नियमांचा शोध घेताना केवळ एकाच भाषेचा सखोल अभ्यास पुरेसा आहे. याचे कारण चॉम्स्की मानवाला जन्मतःच लाभलेल्या भाषिक क्षमतेच्या (innateness) आधारे देतात. प्रभेदात्मक दृष्टीकोनातून केलेल्या अभ्यासातून एकाच वेळी भाषिक वैविध्याशी आपला परिचय होतो तसेच वैश्विक नियमांच्या रूपाने या भाषांमधील साम्यस्थळे आणि पर्यायाने या वैविध्याला असणारी मर्यादा यांचाही उलगडा होतो. किंबहुना, भाषिक वैविध्याच्या परिपूर्ण अभ्यासासाठीच भाषाप्रभेदात्मक दृष्टीकोन भाषेची साम्यस्थळे व वैश्विक नियम यांचा अभ्यास करतो.

संदर्भ :