आर्डव्हॉर्क (ओरिक्टेरोपस ॲफर)

या प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या ट्युबिलिडेंटाटा (Tubulidentata)गणातील ओरिक्टेरोपोडिडी (Orycteropodidae) या कुलात होतो. या कुलातील आर्डव्हॉर्क ही एकमेव प्रजाती आहे. अपरास्तनी प्राण्यांच्या (Placental mammals) उगमापासून आर्डव्हॉर्कच्या गुणसूत्रामध्ये जनुकीयदृष्ट्या फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे आर्डव्हॉर्कचा समावेश अवशिष्ट प्राणीसमूहात होतो. आर्डव्हॉर्क या डच नावाचा अर्थ भू-सूकर (Earth pig) म्हणजे डुकराच्या कुळातील असा आहे. दात असलेला हा एकमेव मुंगीखाऊ प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव ओरिक्टेरोपस ॲफर (Orycteropus afar) असे असून सॅव्हॉना या आफ्रिकेच्या सहारा प्रदेशाच्या दक्षिणेकडील वाळवंटी आणि फारसे पाणी नसलेल्या कोरड्या (अर्धशुष्क) प्रदेशांत त्याचा अधिवास आहे. तसेच गवताळ प्रदेश, ओसाड प्रदेश यांमध्ये जेथे वाळवी, मुंग्या इत्यादींची उपलब्धता भरपूर प्रमाणात असते त्या ठिकाणीही तो आढळतो.

वैशिष्ट्यपूर्ण जीभेसहित आर्डव्हॉर्क

हा निशाचर व बिळात राहणारा प्राणी आहे. नर व मादी दिसायला सारखेच असतात. शरीर पिवळसर करड्या रंगाचे असून त्यावर तुरळक आखूड व राठ केस असतात. त्याच्या पाठीस बाक असतो. त्याची शेपटीसहित लांबी सु. २.२ मी. तर, खांद्यापासूनची उंची ६०–६५ सेंमी. असते. शरीर मजबूत व राकट असून वजन सु. ६५ किग्रॅ. असते. मुस्कट डुकरासारखे निमुळते  असते. जीभ सु. ३० सेंमी. लांब, पातळ, तोंडाबाहेर येणारी असून जिभेद्वारे त्याला वासाचे ज्ञान होते. नाकामध्ये असलेल्या मांसल संवेदनक्षम अवयवामुळे त्याला जमिनीखालील सूक्ष्म हालचाली लगेच ओळखता येतात. जन्मत:च पिलामध्ये कृंतकदात (Incisors) व सुळे (Canines) असतात, तर प्रौढामध्ये ते नसतात. परंतु प्रौढामध्ये जबड्याच्या पाठीमागील बाजूस दाढा (Molars) असतात. त्यामुळे त्याचे दंतसूत्र ०/०, ०/०, २-३/२, ३/३ = २०–२२ असे आहे. दातावर दंतवल्क (Enamel) नसते. दात पोकळ नलिकेसारखे असून ते दंतिनाने (Dentin) बनलेले असतात.

आर्डव्हॉर्कचे पिलू

डोळे लहान असून दृष्टी कमजोर असते. दिवसा त्याला नीटसे दिसत नाही.  परंतु रात्री त्यांना स्पष्ट दिसते. कान सरळ व सु. २४ सेंमी. लांब असून बिळांमधून प्रवास करीत असताना ते बंद किंवा दुमडलेले असतात. त्यांची ऐकू येण्याची क्षमता तीव्र असते. त्यामुळे त्याचे अजगर, सिंह, चित्ता, तरस अशा भक्षकांपासून रक्षण होण्यास मदत होते. शेपूट ७० सेंमी. लांब,जाड, मांसल व टोकदार असते. तोंड आणि शेपटीचे टोक पांढऱ्या रंगाचे असते. पाय आखूड व मजबूत असतात, परंतु पुढच्या पायांपेक्षा मागचे पाय अधिक लांब असतात. पुढच्या पायांवर चार व मागच्या पायांवर पाच मजबूत, तीक्ष्ण टोकदार नख्या असतात. त्यांचा वापर जमीन उकरून बीळे तयार करण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी होतो. त्याची त्वचा जाड असल्यामुळे कधीकधी तो स्वसंरक्षणासाठी मुंग्यांच्या वारूळात देखील झोपतो. बिळे सु. १३ मी. लांब असून त्यास अनेक खोल्या तसेच प्रवेशद्वारे असतात. अत्यंत कमी वेळात जलद गतीने बीळ तयार करणे हे आर्डव्हॉर्कचे मुख्य वैशिष्ट्य आहे. साधारणत: तो १५ सेकंदामध्ये सु. २ फूट अंतराचे बीळ तयार करतो.

आर्डव्हॉर्क कीटकभक्षी असून वाळवी व मुंग्या हे त्याचे मुख्य अन्न होय. अन्नाच्या शोधात तो रात्रीच्यावेळी १०–३० किमी. अंतराचा प्रवास करतो. वारुळाला भोके पाडून लांब जिभेने तो वाळवी किंवा मुंग्या टिपतो. एका वेळी तो सु. ५०,००० वाळवी किंवा मुंग्या न चावताच गिळतो. वारूळ फोडून वाळवी खाण्याऐवजी जमिनीवरील वाळवीच्या रांगा शोधून वाळवी खाणे तो अधिक पसंत करतो. आर्डव्हॉर्कच्या शरीररचनेमधील निजठर (जठराचा अंतिम भाग; Pyloric stomach) हे दळणयंत्राप्रमाणे कार्य करते. त्यामुळे त्याला अन्न चावून खाण्याची आवश्यकता भासत नाही.

आर्डव्हॉर्क : मादी व पिलू

आर्डव्हॉर्क हे एकएकटे राहतात. केवळ विणीच्या हंगामामध्ये नर-मादी एकत्र येतात. गर्भावधिकाल सात महिन्यांचा असून मादीला पावसाळ्यात एकावेळी एकच किंवा क्वचित दोन पिले होतात. जन्मावेळी त्याचे वजन सु. २ किग्रॅ. असते. जन्मत: पिलाच्या  नख्या विकसित असतात. पिलू गुलाबी रंगाचे असून त्याच्या अंगावर केस नसतात. २ आठवडे पिलू  बिळातच राहते. त्यानंतर ते त्याच्या आईबरोबर बाहेर पडते. पिलू ६ महिन्यांचे झाल्यावर बिळे खोदायला सुरुवात करते. दोन वर्षांनी ते प्रजननक्षम होते. आईस दुसरे पिलू होईपर्यंत मादी पिलू आईबरोबरच राहते. नर पिलू सहा महिन्यांचे असतानाच स्वतंत्र जीवन जगू लागते.

आर्डव्हॉर्कने खोदलेल्या असंख्य बिळांचा वापर पक्षी, सरडे, सस्तन प्राणी इत्यादी करतात. त्यामुळे त्यास पारिस्थितिक संस्थेतील (Ecosystem) महत्त्वाचा घटक मानले जाते. याचे वाळवी हे मुख्य भक्ष्य असल्याने अप्रत्यक्षपणे तो मानवास उपयुक्त ठरतो, तर जमिनीखाली बिळे खोदण्यामुळे तो मानवास त्रासदायकही ठरतो. वाढत्या कीटकनाशकांच्या वापरामुळे कीटकांची (उदा., वाळवी इत्यादींची) संख्या कमी होत आहे. त्यामुळे आर्डव्हॉर्कच्या संख्येत घट होत आहे. आर्डव्हॉर्कचे सरासरी आयुर्मान २४ वर्षे असते.

 

संदर्भ :

समीक्षक – कांचन एरंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा