अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण करताना निरुपयोगिता म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे “एखादा भाग किंवा घटक, ज्या कार्यासाठी तयार झाला आहे, ते कार्य समाधानकारक रीत्या, करण्यास असमर्थ झाला असेल तर तो निरुपयोगी झाला असे म्हणता येईल”.जर एखादा पंखा ठरावीक क्षेत्रफळात विशिष्ट वेगाने वारा देण्यासाठी बनविला असेल, आणि तो पंखा फिरत असूनदेखील अपेक्षित क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळात वारा देत असेल किंवा अपेक्षित वेगापेक्षा कमी वेगाने वारा देत असेल, तर तो निरुपयोगी झाला असे म्हणता येईल. त्यासाठी पंख्याचे फिरणे पूर्णतः बंद होणे आवश्यक नाही.त्यामुळे एखादा भाग निरुपयोगी होण्यासाठी त्याचा भंग होणे आवश्यक नाही. त्या भागाच्या मापात झालेला बदल – उष्णतेमुळे तात्पुरता / झीजेमुळे कायमचा – किंवा त्याच्या आकारात झालेला बदल – दाबामुळे तात्पुरता / वाकण्यामुळे कायमचादेखील – त्याला निरुपयोगी करू शकतात.

वाकल्यामुळे वजन पेलण्यास असमर्थ झालेला ॲल्युमिनियमचा भाग.

असे असले तरीदेखील भंग होणे, हे सर्वात गंभीर निरुपयोगिता समजले जाते. एखाद्या भार सहन घटकांचे अचानक आणि अनपेक्षित भंग होणे हे सगळ्यात जास्त नुकसानकारक ठरते.त्यामुळे झालेल्या भंगातून अधिकाधिक माहिती मिळवून भविष्यात असे भंग कसे टाळता येतील हे उद्दिष्ट असते. या उद्देश्याने विश्लेषकांसाठी पुढील मार्गदर्शक तत्व ठरवून देण्यात आली आहेत : १) भंगाचे कारण शोधणे, २) भंग झालेले तुकडे एकमेकांना जोडून बघण्याचा प्रयत्न करू नये. कारण भंग पावलेले पृष्ठभाग अत्यंत नाजूक असल्यामुळे असा प्रयत्न करताना अतिशय महत्त्वाचे पुरावे मिटू शकतात किंवा खराब होऊ शकतात उदाहरणार्थ,गंजाचे डाग.,३) विनाशी चाचणी अतिशय विचारपूर्वक करावी : वेधन (Drilling ), कर्तन (cutting), शाणन (grinding) इत्यादी जर वेळे आधी केले, तर विश्लेषणाचा पूर्णतः बोजवारा उडू शकतो, ४)अभियांत्रिकी निरुपयोगिता विश्लेषण करतांना विश्लेषकाव्यतिरिक्त भंग झालेल्या घटकाला इतर कोणीही हाताळू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण अशा हाताळण्याने महत्त्वाचे पुरावे मिटले जाऊ शकतात किंवा बिघडू शकतात.

विश्लेषणाची पद्धत: १) संबंधित भागाच्या पार्श्वभूमीबाबत माहिती गोळा करणे : यामध्ये भंगलेल्या भागाची संपूर्ण माहिती, उदाहरणार्थ, तुटलेल्या भागाचे नाव, त्याचा क्रमांक, जेव्हा तुटला तेव्हा त्याचा वापरलेला गेलेला काळ इत्यादी गोष्टी विचारात घ्यावी; तुटलेला भाग ज्या पद्धतीने बनविला त्याबद्दल माहिती गोळा करावी. उदाहरणार्थ, तो भाग जर ओतकामाने बनला असेल,तर त्याच्यात कोणत्या  उणिवा राहू शकतात याचा अंदाज घ्यावा; ज्या वेळेला तो भाग भंग पावला त्या वेळेला असलेली परिस्थिती, भंग झाला त्या वेळेस असलेली परस्थिती, तापमान, इत्यादी माहिती गोळा करावी; घडलेल्या घटनेचा क्रम, झालेले नुकसान याबद्दल माहिती घ्यावी. याव्यतिरिक्त संबंधित यंत्रावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे  मत आणि माहिती गोळा करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

२)  तुटलेल्या भागाची प्रारंभिक तपासणी करणे आणि नोंदी तयार करणे : तडा जाण्याची प्रक्रिया कुठे सुरू झाली ती जागा शोधावी; जोर उत्पन्न करणाऱ्या उदाहरणार्थ,तुटलेल्या भागावर खाच असलेल्या जागा आहेत का, ज्यामुळे जोर एका जागेवर एकवटला गेला, हे शोधावे, तसेच संबंधित भागावर असलेल्या जोराचा आवाका आणि त्याची दिशा लक्षात घ्यावी.

३) अविनाशी परीक्षण : या चाचणीचा उद्देश संबंधित भागाची अंतर्गत तपासणी करता येते, उदाहरणार्थ, कठीण थराची जाडी किती आहे ? विलग्नता (Segregation) झालेले कुठे आढळून येत आहे का ?,

४) यांत्रिकी परीक्षण ( कठीण परीक्षण अथवा चिवटपणा परीक्षण ) : भंग झालेल्या भागाचे कठिनता  हे गुणवत्तेनुसार आहे अथवा नाही, तसेच कठिनता  सर्व जागांवर समान आहे की वेगवेगळे आहे, हे तपासून पाहावे.

५) नमुना निवड,त्याची ओळख आणि त्याचे जतन करणे : तुटलेल्या भागाचा नमुना; ज्याची तुलना न तुटलेल्या भागाशी करता येईल असा निवडावा; संबंधित नमुना तुटलेल्या भागातून कुठून घेतला आहे, तडयापासून किती अंतरावरचा आहे इत्यादी गोष्टींची नोंद करावी; त्या नमुन्याची योग्य प्रकारे साफसफाई करावी. तो व्यवस्थित रीत्या जतन करावा जेणेकरून तो गंजणार वा हरवणार नाही अथवा त्यावर कोणतीही नवीन प्रक्रिया होणार नाही; न तुटलेल्या भागाशी त्याची तुलना करणे.

६) दृष्टिगोचर परीक्षण व विश्लेषण : भंग पावलेल्या पृष्ठभागाचे परीक्षण करताना तडा किंवा भेगांची संख्या मोजावी,दुय्यम भेगा इत्यादी असल्यास त्याची नोंद करावी; भंगाचा शेवट तुटलेल्या भागाच्या मधोमध आहे की एका बाजूला त्याची नोंद करावी.

७) धातुसंरचनेच्या अभ्यासासाठी योग्य भागाची निवड करणे : धातुसंरचनेच्या अभ्यासासाठी निवड केलेली जागा शक्यतो जेथे भंग झाला त्याजवळील असावी.

८) धातुसंरचना परीक्षण आणि विश्लेषण : भंग झालेल्या जागेजवळील धातूसंरचना दूर असलेल्या धातुसंरचनेसारखीच आहे की,वेगळी हे तपासून बघावे आणि वेगळी असल्यास फरकाची नोंद करावी.

९) संबंधित निरुपयोगितेच्या कार्यतंत्राबद्दल / यंत्रणेबद्दल ढोबळ अंदाज करणे : गोळा केलेल्या सर्व माहितीच्या आधारे संबंधित भंग कोणत्या कारणांनी झाला असेल याबाबत ढोबळ अंदाज करावा, उदाहरणार्थ,अतिताण,श्रांती (Fatigue),अपघात इत्यादी.

१०) रासायनिक विश्लेषण : तुटलेल्या भागाचे स्थानिक व ढोबळ विश्लेषण करावे. त्यातून तुटलेलल्या भागाची गुणवत्ता आवश्यक तेवढी आहे किंवा नाही ही माहिती मिळू शकते.तसेच पृष्ठभागावरील संक्षारण उत्पाद आढळल्यास त्याचीसुद्धा रासायनिक चाचणी करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन यांची रासायनिक विश्लेषणात नोंद केली नसल्यास त्याबाबत तपासणी करणे.

११) भंगशास्त्राच्या आधारवर संबंधित भंग तपासून बघणे : भंगशास्त्राच्या आधारवर,संबंधित भंग गृहीत धरलेल्या परिस्थितीत होऊ शकतो का ते तपासून बघणे.जर का त्या आधारवर ही सांगड बसत नसेल, तर कुठली तरी माहिती किंवा दुवा सुटलेला आहे असे समजावे.उदाहरणार्थ,वाढलेली भेगेची लांबी जर त्या भागाच्या भंगासाठी पुरेशी नसेल आणि तरीही भंग झाला असल्यास,त्या भेगेशिवाय कुठलातरी दुवा लक्षात घेतला गेलेला नाही असे समजावे.

१२) अनुकरणीय परिस्थितीत संबंधित निरुपयोगिता पुनर्निर्मित करता येते का ते तपासणे : अनुकरणीय परिस्थितीत तुटलेल्या भागासारखी धातुसंरचना निर्माण होते का ते पाहावे.तसेच भेग अथवा तडा जाण्याची प्रक्रिया तशीच होत आहे का ते तपासावे.

१३) पुरावे आणि निष्कर्ष यांची सांगड बसविणे आणि अहवाल तयार करणे : गोळा केलेले पुरावे उदाहरणार्थ, छायाचित्र, नोंदी, मुलाखती इत्यादी व विश्लेषण या सर्वांची तर्कशुद्ध सांगड बसवावी आणि त्या आधारे आपला अहवाल तयार करावा.

एखादे उपकरण वा यंत्र खंडित होणे अथवा निकामी होणे या घटना जरी यांत्रिक स्वरूपाच्या असल्या तरी विश्लेषकाला याबाबत कुठलाही निष्कर्ष काढताना सर्व शक्यता आणि कारणे विचारात घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा अनेक घटक,ज्यांचा परस्परांशी काही संबंध असेल असे दिसत नाही, तेसुध्दा विचारात घेणे गरजेचे असते. विश्लेषक जर निरुपयोगिता,नियंत्रित स्थितीत प्रयोगशाळेत किंवा अनुकरणीय परिस्थितीत पुनर्निर्मित करू शकला, तर झालेल्या निरुपयोगिताबाबत त्याला भरपूर माहिती मिळू शकते. तसेच हे विश्लेषण व्यक्तिविशिष्ट असू नये, त्याचा उद्देश प्रक्रियेत असलेल्या उणिवा माहीत करून घेणे आणि त्या दूर करणे यासाठी असावा.

समीक्षक बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा