अंतर्ज्वलन ( Internal combustion) एंजिनाच्या  ज्वलन कक्षातील( combustion chamber) दट्ट्या ( piston) सतत वर खाली  होत  असतो . जेव्हा दट्ट्या ज्वलन कक्षातील उच्चतम  स्थानापासून (Top Dead Centre, T.D.C.), ज्वलन कक्षातील नीचतम स्थानापर्यंत (Bottom Dead Centre, B.D.C.)  प्रवास करतो तेव्हा एक धाव (stroke) पूर्ण होते . तसेच जेव्हा दट्ट्या नीचतम स्थानापासून, उच्चतम स्थानापर्यंत प्रवास करतो तेव्हा दुसरी धाव पूर्ण होते. एंजिनामधील  दट्ट्या दोन वेळा उच्चतम  स्थानाकडून नीचतम स्थानाकडे व  दोन वेळा नीचतम स्थानाकडून उच्चतम स्थानाकडे प्रवास करतो, अशा एंजिनाला चार धावी (Four stroke) एंजिन म्हणतात. जर ह्या एंजिनात इंधन म्हणून पेट्रोलचा वापर केला असेल तर त्यास चार धावी पेट्रोल एंजिन म्हणतात. चार धावी पेट्रोल एंजिनामधील चार धावींना अनुक्रमे शोषण (Suction), संपीडन(Compression), प्रसरण (Expansion) आणि उत्सर्जन (Exhaust) धाव असे म्हणतात.

  • शोषण धाव : पेट्रोल एंजिनामध्ये कारब्युरेटरच्या द्वारे हवा व पेट्रोलकण ह्यांचे योग्य त्या प्रमाणात मिश्रण तयार होते. तयार झालेले हे मिश्रण कारब्युरेटर आणि एंजिनाला जोडणाऱ्या नलिकेतून आगमन झडपेपर्यंत पोचते. आगमन झडप उघडली जाऊन हे मिश्रण पेट्रोल एंजिनाच्या ज्वलन कक्षात घेतले जाते. त्याच वेळी, ज्वलन कक्षातील दट्ट्या उच्चतम स्थानापासून नीचतम स्थानाकडे जाऊ लागतो . दट्ट्या नीचतम स्थानी पोचतो तेव्हा सर्व मिश्रण ज्वलन कक्षात ओढले जाते. त्यानंतर आगमन झडप बंद केली जाते . ह्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान निर्गमन झडप बंद असते व जडचक्र (Fly wheel) १८० अंशामध्ये फिरते. दट्ट्याच्या उच्चतम स्थानाकडून नीचतम स्थानापर्यंतच्या धावेस  शोषण धाव  असे म्हणतात व ह्या प्रक्रियेस शोषण प्रक्रिया असे म्हणतात.

  • संपीडन धाव : संपूर्ण ज्वलन कक्षामध्ये हवा आणि पेट्रोलकण ह्यांचे मिश्रण असते व दट्ट्या नीचतम स्थानी असतो. दोन्ही झडपा तेव्हा बंद असतात. दट्ट्या हळूहळू पुन्हा उच्चतम स्थानाकडे  जाऊ लागतो तसा ह्या मिश्रणावरील दाब वाढत जातो. यावेळी हवेचा दाब ३० ते ३५ बार झालेला असतो व दाबलेल्या हवेचे तापमान ४२५ ते ५४० से. पर्यंत असते. दट्ट्या जेव्हा उच्चतम स्थानी पोचतो तेव्हा मिश्रणावरील दाब अधिकतम असतो. त्याच क्षणी, ठिणगी गुडदीद्वारे (Spark Plug) ठिणगी पाडली जाते व त्यामुळे अधिकतम दाब असलेले हे मिश्रण पेट घेते. दट्ट्याच्या नीचतम स्थानाकडून उच्चतम स्थानापर्यंतच्या धावेस संपीडन धाव असे म्हणतात व ह्या प्रक्रियेस संपीडन प्रक्रिया असे म्हणतात.

  • प्रसरण धाव :  पेट घेतलेल्या ह्या मिश्रणाचे वायुमध्ये रूपांतर होऊन तो प्रसरण पावतो. ह्या प्रसरण पावलेल्या वायूच्या दाबामुळे दट्ट्या खाली ढकलला जातो. आगमन व निर्गमन झडपा बंद असतात. दट्ट्या उच्चतम स्थानाकडून नीचतम स्थानापर्यंत पोहोचतो. दट्ट्याच्या ह्या धावेस प्रसरण धाव म्हणतात  व ह्या प्रक्रियेस प्रसरण  प्रक्रिया असे म्हणतात.

  • उत्सर्जन धाव : जेव्हा दट्ट्या नीचतम स्थानी पोचतो तेव्हा ज्वलनकक्ष  जळालेल्या मिश्रणाच्या वायूने पूर्णपणे भरलेला असतो . हा जळालेला वायू ज्वलन कक्षामधून बाहेर फेकणे गरजेचे असते. आगमन झडप बंद असते. दट्ट्या नीचतम स्थानापासून उच्चतम स्थानी जाऊ लागतो. दरम्यान, निर्गमन झडप उघडली जाते. जसजसा दट्ट्या वर जाऊ लागतो तसा तसा तो ज्वलन कक्षातील जळालेला वायू  ढकलतो. ढकललेला हा वायू उघड्या असलेल्या निर्गमन झडपेतून वातावरणात फेकला जातो. दट्ट्या जेव्हा उच्चतम स्थानी पोचतो तेव्हा जळालेला सर्व वायू ज्वलन कक्षातून वातावरणात पूर्णपणे फेकला जातो. ह्या स्ट्रोकच्या अखेरीस दट्ट्या उच्चतम स्थानी पोचलेला असतो. दट्ट्याच्या नीचतम स्थानाकडून उच्चतम स्थानापर्यंतच्या धावेस उत्सर्जन धाव असे म्हणतात व ह्या प्रक्रियेस उत्सर्जन  प्रक्रिया असे म्हणतात.

संदर्भ :

  • ऑटोमोबाईल मेकॅनिक, राजेन्द्र भागवत महाजन.

समीक्षक – एन. एम. गायकवाड

This Post Has One Comment

  1. अतुल गजानन महल्ले

    धन्यवाद ….सुंदर माहिती …..कार्यप्रणाली कळली ….

प्रतिक्रिया व्यक्त करा