योगदर्शनानुसार निद्रा ही चित्ताच्या पाच वृत्तींपैकी एक वृत्ती आहे. झोपल्यानंतर ज्यावेळी स्वप्ने पडतात तिला स्वप्नावस्था व ज्यावेळी स्वप्नविरहित शांत झोप लागते, तिला सुषुप्ती अवस्था (गाढ निद्रा) असे म्हणतात. ‘निद्रा’ या शब्दाचा अर्थ सामान्यपणे ‘झोप’ असा होत असला तरी योगशास्त्रात निद्रा शब्द विशेषत्वाने सुषुप्ती अवस्थेतील चित्ताच्या वृत्तीचा निदर्शक आहे. ‘अभाव-प्रत्यय-आलम्बना वृत्तिर्निद्रा’ (पातंजलयोगसूत्र १.१०) या सूत्राद्वारे पतंजलींनी निद्रावृत्तीचे स्वरूप सांगितले आहे. सामान्यपणे असा समज होऊ शकतो की, सुषुप्ती अवस्थेमध्ये कोणतेही विचार/वृत्ती नसतात, चित्त निष्क्रिय असते, परंतु तसे नसून निद्रा हीसुद्धा चित्ताची एक वृत्तीच आहे, हे अधोरेखित करण्यासाठी सूत्रामध्ये ‘वृत्ति:’ हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. निद्रा म्हणजे वृत्तीचा अभाव असे मानले तर निद्रा आणि असंप्रज्ञात (निर्विकल्प) समाधी यात कोणताच भेद राहणार नाही. कारण असंप्रज्ञात समाधीत कोणतीही वृत्ती अस्तित्वात नसते. जरी सुषुप्ती अवस्थेमध्ये बाह्येंद्रिये कार्यरत नसल्यामुळे बाह्य विषयांचे ज्ञान करवून देणाऱ्या चित्ताच्या वृत्ती नसतात, तरी सर्व वस्तूंच्या अभावाचे ज्ञान करवून देणारी निद्रा वृत्ती असते. झोपेतून उठल्यानंतर ‘मी झोपलो होतो’ अशा स्वरूपाचे स्मरणात्मक ज्ञान होते. कोणत्याही गोष्टीचा चित्तवृत्तीद्वारे अनुभव केल्याशिवाय तिचे स्मरण होऊ शकत नाही म्हणून उठल्यानंतर निद्रेचे स्मरण होते म्हणजे निद्रा हीसुद्धा वृत्तीच आहे, हे सिद्ध होते.

निद्रा ही चित्ताची वृत्ती त्रिगुणात्मक असल्याने झोपेतून उठल्यानंतर जे निद्राविषयक स्मरणरूप ज्ञान होते, तेही तीन प्रकारचे असते. जर निद्रा वृत्तीमध्ये सत्त्व गुणाचा प्रभाव असेल, तर उठल्यानंतर ‘माझी झोप चांगली झाली, मला प्रसन्न वाटत आहे’ असा अनुभव येतो. जर निद्रा वृत्तीमध्ये रजोगुणाचा प्रभाव असेल तर उठल्यावर ‘मला स्वस्थ अशी झोप लागली नाही, माझे मन चंचल होऊन इतस्तत: भरकटत होते’ असा अनुभव येतो आणि जर निद्रा वृत्तीमध्ये तमोगुणाचा प्रभाव असेल तर उठल्यानंतर ‘मी अत्यंत गाढ, मेल्यासारखा झोपलो होतो, माझे अंग जड पडले आहे, थकल्यासारखे वाटत आहे’ अशा प्रकारचा अनुभव येतो.

सुषुप्ती अवस्थेविषयी असणारे योगशास्त्राचे मत इतर दर्शनांपेक्षा वेगळे आहे. न्याय-वैशेषिक दर्शनांप्रमाणे सुषुप्ती अवस्थेत मन प्राणवाहक नाड्यांपैकी पुरीतत् नावाच्या नाडीमध्ये प्रवेश करते, त्यामुळे या अवस्थेत कोणत्याही प्रकारचे ज्ञान होत नाही. वेदान्त दर्शनानुसार सुषुप्ती अवस्थेत चित्ताच्या कोणत्याही वृत्ती नसतात, कारण त्या अवस्थेत केवळ अज्ञानरूपी शरीर अस्तित्वात असते. त्या अज्ञानाच्या वृत्तीमुळे आत्म्याच्या आनंदस्वरूपाचा काही अंशी अनुभव येतो. याउलट योगदर्शनानुसार सुषुप्ती अवस्थेमध्ये चित्ताची निद्रा ही वृत्ती मानलेली आहे.

पहा : चित्त, चित्तवृत्ति.

संदर्भ :

  • आगाशे काशिनाथशास्त्री (संपा.), पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
  • निखिलानंद स्वामी (अनु.), वेदान्तसार ऑफ सदानन्द, अल्मोडा, १९३१.

समीक्षक : मधुसूदन पेन्ना