नाडी या संकल्पनेला हठयोगात महत्त्वाचे स्थान आहे. नाडी शब्द ‘नद्’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘स्पंदन पावणे’ असा या धातूचा अर्थ आहे. प्राण शरीरामधील सर्व नाड्यांमध्ये संचार करतो व स्पंद पावतो. प्राणशक्तीच्या या सूक्ष्म प्रवाहवाहिकांना नाडी अथवा योगनाडी अशी संज्ञा आहे. नाड्या आणि शरीरातील मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञाचक्र या चक्रांचा एकमेकांशी संबंध आहे. गुदद्वारापासून २ अंगुळे वर आणि जननेंद्रियापासून २ अंगुळे खाली देहमध्य म्हणजे सूक्ष्म देहाचे केंद्रस्थान आहे. त्याला मूलाधार चक्र असे म्हणतात. त्या स्थानापासून ९ अंगुळे ऊर्ध्व दिशेला कंदस्थान आहे, ज्यापासून सर्व नाड्यांचा उगम होतो. त्याचा आकार अंड्यासारखा असतो. त्यावर नाजूक त्वचेचे आवरण असते. ज्याठिकाणी सुषुम्ना नाडी कंदाशी जोडलेली असते त्याला संयोगबिंदू अथवा ग्रंथिस्थान म्हणतात. मूलाधार चक्राच्या चार पाकळ्या या कंदाच्या चार बाजूंना असतात. संयोगबिंदूपासून कमळाच्या दांड्याप्रमाणे वर जाणाऱ्या पाठीच्या कण्याला मेरुदण्ड अशी संज्ञा आहे. या दण्डाभोवती सर्व नाड्या गुंफलेल्या असतात. सुषुम्ना नाडीच्या अवतीभोवती ७२,००० नाड्यांचा समूह आहे. नाड्यांच्या शाखा व उपशाखा अश्वत्थ वृक्षाच्या पानांइतक्या अगणित आहेत, असे त्रिशिखि ब्राह्मण उपनिषदात म्हटले आहे (२.७५-७६).

शांडिल्य उपनिषदात इडा, पिंगला, सुषुम्ना, सरस्वती, वारुणी, पूषा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, कुहू, शंखिनी, पयस्विनी, अलम्बुसा व गान्धारी अशा तेरा नाड्यांचा उल्लेख आला आहे. तर जाबालदर्शन उपनिषदात या व्यतिरिक्त विश्वोदरा ह्या नाडीचा उल्लेख आढळतो. सुषुम्ना, पिंगला, इडा, सरस्वती, पूषा, वरुणा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, अलम्बुसा, कुहु, विश्वोदरी, पयस्विनी, शंखिनी आणि गान्धारा ह्या १४ मुख्य नाड्या आहेत (जाबालदर्शन उपनिषद् ४.७-८, श्रीनिवासयोगीरचित हठरत्नावली ४.३३-३९). या सर्व नाड्या मूलाधारातून निघतात आणि जीभ, लिंग, डोळे, पायाचे अंगठे, कान, हाताचे अंगठे, गुदस्थान आणि उदर या ठिकाणापर्यंत पोहोचतात. ह्या १४ नाड्यांमध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्या मुख्य असून त्यातही सुषुम्ना सर्वश्रेष्ठ नाडी आहे. तिलाच ब्रह्मनाडी अथवा महानाडी असे म्हणतात. ही कमळाच्या दांड्याप्रमाणे आतून पोकळ असते. तिचे मुख मूलाधारचक्रामध्ये स्थित असून ती सर्पाकार भासते. कुंभक करताना प्राण सुषुम्नेत प्रवेश करतो व तेवढा काळ साधकाला कोणतीही पीडा होत नाही. सुषुम्नेतून जेव्हा प्राण वाहतो तेव्हा मन स्थिर होते. मनाच्या या स्थिर अवस्थेला उन्मनी अवस्था म्हणतात. ती साधनेतील सर्वोच्च अवस्था होय.

सुषुम्ना नाडी सूर्य, चंद्र आणि अग्निरूप आहे (पूर्णानंद यति लिखित षट्चक्रनिरूपणम्  १.१). ती त्रिगुणात्मक अर्थात् सत्त्व, रज आणि तम ह्या गुणांनी युक्त आहे. सुषुम्नेच्या डावीकडे इडा आणि उजवीकडे पिंगला नाडी असते. इडेला चंद्रनाडी व पिंगलेला सूर्यनाडी म्हणतात. इडा शीतगुणी तर पिंगला उष्ण गुणधर्माची आहे. इडा ही मंद शक्तिरूपा आहे. ती जगाचे पोषण करते. संमोहन तंत्रानुसार पिंगला अग्नीप्रमाणे रुद्ररूपा आहे. तिचा रंग डाळींबाप्रमाणे लाल व तेजस्वी आहे. ती जगताची उत्पत्ती करते (शिवस्वरोदय ५७). तसेच ती अन्नाचे पाचन करते. इडा शक्तिरूप देवी आहे. संमोहन तंत्रानुसार इडा चंद्र-स्वरूपिणी असून अमृत हे तिचे शरीर आहे. योगाभ्यास, नवीन ग्रंथाचे लेखन इत्यादींसाठी इडा नाडी शुभ आहे (शिवस्वरोदय ११२). इडेतून श्वास चालू असताना घरातून अथवा गावातून बाहेर पडावे आणि यात्रेतून परत आल्यावर पिंगलेतून श्वास चालू असताना गृहप्रवेश करावा (शिवस्वरोदय ५९). इडा नाडीतून प्राणाचा प्रवाह चालू असताना कृषि, व्यापार, विहीर खणणे, विवाह, दान-धर्म इत्यादी सौम्य कार्ये करावीत; तर पिंगला नाडीतून प्राणाचा प्रवाह चालू असताना शत्रूंवर आक्रमण इत्यादी रौद्र कर्मे करावीत (शिवस्वरोदय ६०). इडा आणि पिंगला या दोन्ही नाड्या धनुषाकार आहेत.

रुद्रयामल तंत्रानुसार इडा आणि पिंगला अनुक्रमे डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वळत वळत सर्व चक्रांमधून जात नाकपुड्यांपर्यंत पोहोचतात. वळणांमुळे त्या वेणीप्रमाणे भासतात (रुद्रयामल २७.५१). त्या दोघी भुवयांमध्ये पोहोचतात. गंगा, यमुना व सरस्वती या नद्या अनुक्रमे इडा, पिंगला व सुषुम्ना यांच्या ठायी वास करतात असे म्हटले जाते (हठरत्नावली ४.३८-३९). इडा, पिंगला व सुषुम्ना तिन्ही मूलाधार चक्रात एकत्र मिळतात, त्या बिंदूला ‘मुक्त त्रिवेणी’ म्हणतात.

मेरुदण्डामधून प्रवास करीत सुषुम्ना नाडी मस्तकातील मध्यबिंदू म्हणजेच ब्रह्मरंध्रापर्यंत पोहचते. गांधारी किंवा गान्धारा डाव्या डोळ्याकडे जाते, तर हस्तिजिह्वा उजव्या डोळ्याकडे जाते. पूषा आणि यशस्विनी एकाच ग्रंथीतून उगम पावून अनुक्रमे उजव्या व डाव्या कानात जावून पोहोचतात. जाबाल उपनिषदानुसार अलम्बुसा नाडी गुदास्थानापर्यंत, त्रिशिखी उपनिषदानुसार ती लिंगापर्यंत जाते. योगचूडामणि उपनिषदानुसार कुहू लिंग देशात, तर जाबालदर्शन उपनिषदानुसार ती उजव्या नाकपुडीपर्यंत जाते. इडा डाव्या नाकपुडीपर्यंत, यशस्विनी डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत जाते. जाबालदर्शन उपनिषदानुसार पूषा डाव्या डोळ्यापर्यंत, तर त्रिशिखी उपनिषदानुसार ती डाव्या कानापर्यंत जाते. पयस्विनी उजव्या कानापर्यंत, सरस्वती जिभेपर्यंत, तर हस्तिजिह्वा डाव्या पायाच्या अंगठ्यापर्यंत जाते. जाबालदर्शन उपनिषदानुसार शंखिनी डाव्या कानापर्यंत, तर योगचूडामणि उपनिषदानुसार ती मूलस्थानापर्यंत जाते. विश्वोदरा कंदाच्या मध्यभागापर्यंत जाते. विलम्बिनी नाडी नाभिमध्ये प्रतिष्ठित आहे. वारुणी देहात सर्वत्र जाते.

सुषुम्ना नाडीमध्ये वज्रिणी किंवा वज्रनाडी आणि वज्रनाडीमध्ये चित्रिणी किंवा चित्रा या दोन नाड्या आहेत (षट्चक्रनिरूपण १.३). सुषुम्ना हे बाह्य आवरण, चित्रिणी हे तिच्या आतले आवरण असून चित्रिणीच्या आत ब्रह्मनाडी आहे. चित्रिणी सत्त्वगुणयुक्त, वज्रा रजोगुणयुक्त आणि सुषुम्ना तमोगुणयुक्त आहे. त्यामुळे सुषुम्ना तिन्ही गुणांनी युक्त आहे. चंद्ररूपा असल्यामुळे चित्रिणी शुभ्र वर्णाची आहे. षट्चक्रे चित्रिणीशी संबंधित असतात.

शिवसंहितेनुसार चित्रिणी नाडी हीच ब्रह्मनाडी आहे आणि तिलाच ब्रह्मरंध्र असे म्हणतात (शिवसंहिता २.५.१८). वैष्णवी, सरस्वती आणि चित्रिणी ही सुषुम्नेची नावे आहेत असेही मानले जाते. शंखिनी नाडीला देखील सुषुम्नेचे रूप मानले आहे.  चित्रिणी नाडी कोळ्याच्या जाळ्याच्या तंतूप्रमाणे सूक्ष्म असते. या नाडीतील चक्रांवर ध्यान केल्याने योग्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला परमशांती, अमृतत्व अर्थात् मोक्ष प्राप्त होतो. ही नाडी आत्मसाक्षात्काराला कारणीभूत ठरते म्हणून शिवदेवतेला अर्थात् योग्यांना प्रिय आहे (शिवसंहिता २.१८).

प्रत्येक नाडीला तिची अधिष्ठात्री देवता असते. सुषुम्ना नाडीची देवता शिव, इडेची विष्णु, पिंगलेची ब्रह्मा, सरस्वतीची देवता विराट् (साकार ब्रह्म) आहे. पूषा नाडीची पूषा (सूर्य), वरुणा नाडीची वायु, हस्तिजिह्वा नाडीची वरुण, यशस्विनी नाडीची भास्कर तसेच अलम्बुसा नाडीची जलरूप वरुण, कुहु नाडीची क्षुधा, गान्धारा तसेच शंखिनी या दोन नाड्यांची देवता चंद्रमा, पयस्विनी नाडीची प्रजापति, विश्वोदरा नाडीची देवता भगवान् अग्नि आहे.

पतंजलींनी फक्त कूर्म नाडीचा उल्लेख केला असून तिच्यावरील ध्यानामुळे शरीर अचल आणि स्थिर होते असे म्हटले आहे (पातंजल योगसूत्र ३.३१). हठयोगावरील तसेच तंत्रावरील ग्रंथांमध्ये इडा, पिंगला व सुषुम्ना या नाड्यांवरच भर दिलेला आहे. हठयोग व तंत्रामध्ये ध्यान व सिद्धींच्या संदर्भात नाड्यांना अपरंपार महत्त्व आहे.

समीक्षक : प्राची पाठक