जपानने १९८० मध्ये स्वघनीकरण होणाऱ्या काँक्रीटची निर्मिती केली व अक्षरशः प्रगतीचे शिखर गाठले.  त्या काळात जपानमध्ये कुशल कामगारांची कमतरता होती. जास्त पोलाद असणाऱ्या अरुंद आकाराच्या रचनेमधील काँक्रीट करताना अडचण निर्माण होत होती. टोकिओ विद्यापीठाच्या डॉ. ओकामुरा यांनी अशा अडचणींवर मात करून स्वघनीकरण होणाऱ्या काँक्रीटची (एससीसीची) यशस्वी निर्मिती केली. बहुपयोगी एससीसीचा वापर साऱ्या जगभर सध्या मोठ्या प्रमाणावर होत आहे.

वैशिष्ट्ये : हे काँक्रीट स्वतःहून एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून जाऊ शकते. अशा वेळी त्यामधील घटक विलग न होता एकजीव राहतात. कोणत्याही आकाराच्या रचनेमध्ये जवळजवळ असणाऱ्या पोलादामधून अडथळा निर्माण न होता काँक्रीट नियोजित जागी पोहोचते. या काँक्रीटच्या घनीकरणासाठी कंपित्राची (Vibrator) आवश्यकता नसते. कंपित्रासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची व मनुष्यबळाची त्यामुळे बचत होते. नेहमीचे काँक्रीट करताना होणारा कंपित्राचा आवाज एससीसी करताना होत नाही. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही.  कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण करता येते. कमी कालावधीत काँक्रीटमध्ये जास्त ताकद निर्माण होऊ शकते.  एम २० पासून एम १०० दर्जाचे काँक्रीट बनविणे शक्य होते.

स्वघनीकरण होणारे काँक्रीट बनविण्याची प्रक्रिया : एससीसीमध्ये खडी, वाळू, सिमेंट, पाणी या व्यतिरिक्त हवेत उडणारी राख, सूक्ष्मसिलिका, विशिष्ट रासायनिक अधिमिश्रण यांचा वापर केला जातो.  खडीचे प्रमाण वाळू व इतर बारीक घटकांपेक्षा कमी ठेवावे लागते.  खडीचा आकार सर्वसाधारणतः १२ – २० मिमी. असतो.  फॉर्मवर्कमधील पोलाद जवळ-जवळ नसेल, तर ४० मिमी. आकारमानाची खडीसुद्धा वापरली जाते. पाणी व सिमेंट यांचे प्रमाण (W/C Ratio ) शक्यतो ०.४ पेक्षा कमी ठेवले जाते. सिमेंट, उडणारी राख, वाळू, सूक्ष्मसिलिका यांमधील ०.१२५ मिमी. आकारमानापेक्षा कमी असणाऱ्या घटकांचे स्वतंत्र मोजमाप  केले जाते. त्यांना पावडर असे संबोधले जाते.

एससीसीमध्ये पावडर व पाणी यांचे प्रमाण महत्त्वपूर्ण मानले जाते.  असे प्रमाण ०.८:०.१ एवढे योग्य ठरते. उडणाऱ्या राखेच्या वापराने काँक्रीटमधील निर्माण होणारी उष्णता कमी होते, तर सूक्ष्मसिलिका  अतिसूक्ष्म पोकळी भरून काढण्यास मदत करते.  एससीसीमध्ये गोलाकार आकाराची खडी वापरली जाते. त्यामुळे काँक्रीटमधील अंतर्गत घर्षण कमी होऊन त्याच्या प्रवाहाची गती वाढते. चिकटपणा हा काँक्रीटचा प्रमुख गुणधर्म मानला जातो. एससीसी बनविताना यावर नियंत्रण ठेवण्यासाठी श्यानता परिवर्तनकारकाचा (Viscosity Modifying Agent; VMA) वापर केला जातो. पाणी व सिमेंट यांचे प्रमाण कमी ठेवून काँक्रीट जास्त कार्यक्षम करण्यासाठी  अतिसुघट्टकारी (Superfine) पदार्थ वापरला जातो.

स्वघनीकरण होणारे काँक्रीट करताना घ्यावयाची काळजी : जागेवरील स्वघनीकरण होणारे काँक्रीट अखंडितपणे होत राहणे आवश्यक असते. यासाठी RMC (Ready-mix concrete) प्रकल्पाची कार्यक्षमता, चलमिश्रण कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी, काँक्रीट पंपाची रचना यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते.  एससीसीसाठी बाहेरून पाणी  मारण्याची  प्रक्रिया  (curing) लवकर चालू करावी लागते.  कोणत्याही   काँक्रीटचा टिकाऊपणा हा त्यामध्ये वापरलेले घटक, त्याचे प्रमाण, बनविण्याची प्रक्रिया, कामावरील गुणवत्ता नियंत्रण, पाणी मारण्याची क्रिया यांवर अवलंबून असतो.

एससीसी करताना वरील गोष्टी काळजीपूर्वक करण्यासाठी अभियंत्यांना विशेष पूर्वप्रशिक्षणाची आवश्यकता असते. कामाच्या ठिकाणी एससीसी करताना त्याच्या आधी शटरिंगच्या उभ्या व आडव्या आधारांची तपासणी करणे योग्य ठरते. पोलाद अथवा रेझिनाचा पृष्ठभाग असणाऱ्या प्लायवूडचा वापर एससीसीसाठी करण्यात येतो, असे प्लायवूड काँक्रीटमधील पाणी शोषून घेत नाही. शटरिंग विलग केल्यानंतर काँक्रीटचा पृष्ठभाग आरशासारखा चकचकीत दिसतो. उंच इमारती, पूल, कमानी, पाण्याची टाकी, गर्डर, धरणे, बोगदे, पूर्वप्रतिबल काँक्रीटचे विविध भाग अशा सर्वच ठिकाणी एससीसीचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरते. विशिष्ट प्रकारच्या अधिमिश्रणाचा वापर करण्यामुळे एससीसीसाठी नेहमीच्या काँक्रीटपेक्षा जास्त खर्च येतो. भविष्यात सर्वत्र याचा वापर होईल याची खात्री वाटते.

समीक्षक – विनायक  सूर्यवंशी

प्रतिक्रिया व्यक्त करा