धान्य पिकवणारी देवता. पावरा आदिवासी ख्ळ्यात ज्वारीची मळणी करण्याअगोदर ज्वारीच्या कणसांच्या राशीचा पूजाविधी करतात. पूजाविधी केल्याने करहरण माता प्रसन्न होते, तिच्यामुळे धनधान्याला बरकत येते, असे पावरा मानतात. असा पूजाविधी केल्यानंतर नव्या ज्वारीची भाकरी खाण्यास सुरुवात करतात.
खळ्यात ज्वारीच्या कणसांचा पूजाविधी होण्याअगोदर कणसे पसरवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्यास बोलवून ज्वारीची कणसे पूजनाचा कार्यक्रम होतो. सोबत दोन कोंबड्या आणि तांब्यात दारू असते. पुजारा मंत्र पुटपुटून करहणमातेची प्रार्थना करतो. दारुचे अर्घ्य देतो. एक कोंबडा तो मेंढ्योतारो (ध्रुवतारा) तर दुसरा कोंबडा करहणमातेच्या नावाने बळी देतो. बळी दिलेल्या कोंबड्यांचे रक्त खळ्याच्या चारही बाजूने थेंब-थेंब शिंपीत पूजेच्या जागी पुजारा परत येतो. त्यानंतर तांब्यातील दारु डवकीने जमिनीवर थेंब थेंब शिंपडतो. बेलाच्या पानातील शेंदराचा टिळा बैलांना लावतो. नंतर खळ्यात जमलेल्या माणसांना पुजारा शेंदराचे टिळे लावतो. शेवटी तांब्यात राहिलेली दारु जमलेल्या मंडळींना वाटतो. आणि करहण मातेचा पूजाविधी संपतो.
पूजाविधी आटोपल्यानंतर खळ्यात काम करणारी माणसे ज्वारीची मळणी सुरु करतात. मळणीतील काही ज्वारी बाजूस काढून दळतात. त्याची तव्यावर पहिली भाकर करतात. खळ्यातच खणलेल्या खड्ड्यात वाऱ्याच्या नावे भाकरी ठेवतात आणि संध्याकाळी आपापसात वाटून खातात.
खळ्यात बळी दिलेल्या कोंबड्यांच्या मटणाची पंगत होते. या पंगतीत आमंत्रित लोकही असतात. जेवणाअगोदर दारु वाटली जाते. जेवण झाल्यावर अन्न् उरले असेल तर खळ्यातच जवळच्या खड्ड्यात टाकतात. उरलेले अन्न् घरी आणत नाहीत. या पद्धतीने करहणमातेच्या पूजाविधीचा कार्यक्रम पावरा लोकात होतो. शेतातील नवीन पालेभाज्या, फळे तसेच शेतातून काढलेला तांदूळ, मका, ज्वारी आदि धनधान्याची पूजा केल्यानंतरच आदिवासी समाज ते खाण्यास सुरुवात करतो.
संदर्भ :
- पाटील ,डी. जी. ,पावरा समाज व संस्कृती, ,भाषा संशोधन-प्रकाशन केंद्र, बडोदे.