हेरस्कोव्हिट्‌स, मेलव्हिल जीन (Herskovits, Melville Jean) : (१० सप्टेंबर १८९५ – २५ फेब्रुवारी १९६३). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक ख्यातकीर्त मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बेलफौन्टन (ओहायओ) येथे स्थलांतरित मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी शिकागो विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. ची पदवी मिळविली. त्यांनी प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व भाषाशास्त्रज्ञ फ्रांझ बोआज (Franz Boas) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आफ्रिकेतील आदिम समाज आणि अमेरिकन संस्कृतीतील त्यांचे स्थान’ या विषयावर संशोधन करून कोलंबिया विद्यापीठास प्रबंध सादर केला आणि १९२३ मध्ये पीएच. डी. ही पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी कोलंबिया आणि हार्व्हर्ड विद्यापीठांमध्ये मानवशास्त्र विषयाचे अध्यापन केले. पुढे १९२७ मध्ये ते इव्हनस्टन (इलिनॉय) येथील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे मानवशास्त्र विभाग स्थापन करून त्या विभागाचा ते प्रमुख झाले. याच विद्यापीठात त्यांनी १९५१ मध्ये आफ्रिकेतील आदिवासींच्या अभ्यासाचे अध्यासन निर्माण केले. ते अखेरपर्यंत या विद्यापीठात अध्यापन व संशोधनात व्यस्त होते. १९३९ ते १९५० या काळात अमेरिकन काउन्सिल ऑफ लर्नेड सोसायटीच्या आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समूहाच्या अभ्यासविषयक मंडळाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. शिवाय त्यांनी पश्चिम आफ्रिका, उपसहारा वाळवंटी प्रदेश, हैती, त्रिनिदाद, ब्राझील आणि सुरिनाम या प्रदेशांचा क्षेत्राभ्यास केला. तेथील आदिवासींच्या समस्या आणि त्यांच्या संवर्धनातील गतीकेचा बदल नोंदविला. तसेच दुसऱ्या देशातील संस्कृतीचे मूल्यमापन करण्याचे असे कोणतेही निश्चित निकष नाहीत, हेही मत त्यांनी नोंदविले. ‘सांस्कृतिक सापेक्षतावाद’ या संकल्पनेचे ते उद्गाते होते.

हेरस्कोव्हिट्स यांनी अमेरिका व आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोक, त्यांची लोकविद्या, त्यांचे आदिम अर्थशास्त्र, संगीत, लोककला आदींचा अभ्यास करण्यासाठी पहिला अमेरिकन अभ्यास उपक्रम आयोजित केला. ‘न्यू वर्ल्ड निग्रो’ या संकल्पनेला संशोधनाच्या कक्षेत आणल्यामुळे त्यांची सर्वदूर ख्याती झाली आहे. याशिवाय संस्कृती या विषयावर त्यांनी सापेक्षीय व मानवतावादी दृष्टिकोनातून लेखन केले. ‘निग्रों’चे मूळ आफ्रिकेत शोधले आणि काही गृहीत मिथ्यकांवर १९४१ मध्ये लिहिलेल्या आपल्या द मिथ ऑफ द निग्रो पास्ट या ग्रंथातून टीका केली. आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांनी पाश्चात्त्यांचा आदर्श घ्यावा, ही कल्पना त्यांनी नाकारली.

हेरस्कोव्हिट्स यांनी अनेक ग्रंथांचे लेखन व सहलेखन केले असून त्यांपैकी ग्रंथ पुढीलप्रमाणे : द निग्रो अँड इंटिलिजन्स टेस्ट्स (१९२७); द अमेरिकन निग्रो : अ स्टडी इन रॅशिअल क्रॉसिंग (१९२८); द ॲन्थ्रोपोमेट्री ऑफ द अमेरिकन निग्रो (१९३०); आउटलाईन ऑफ दाहोमीन रिलिजीअस बिलीफ (१९३३); सरीनेम फोक-लॉर (१९३६); लाईफ इन अ हैतीयन व्हॅली (१९३७); अकल्चरेशन : द स्टडी ऑफ कल्चर कॉन्टॅक्ट (१९३८); द इकॉनॉमिक लाइफ ऑफ प्रिमिटिव्ह पीपल्स (१९४०); द मिथ ऑफ द निग्रो पास्ट (१९४१); द बॅकग्राऊंड ऑफ आफ्रिकन आर्ट (१९४५); त्रिनिदाद व्हिलेज (१९४७); मॅन अँड हिज वर्क्स (१९४८); फ्रँट्स बोअॅस : द सायन्स ऑफ मॅन इन द मेकिंग (१९५३), इकॉनॉमिक ॲन्थ्रोपॉलॉजी (१९५४); दाहोमीन नॅरेटीव्ह (१९५८); द ह्यूमन फॅक्टर इन चेन्जिंग आफ्रिका (१९६२). त्यांना सामाजिक शास्त्रासाठीची गुगेनहाईन शिष्यवृत्ती मिळाली होती.

हेरस्कोव्हिट्स यांचे अल्पशा आजाराने इव्हनस्टन येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा