हेअरदाल, थॉर (Heyerdahl, Thor) : (६ ऑक्टोबर १९१४ – १८ एप्रिल २००२). नॉर्वेजीयन मानवशास्त्रज्ञ आणि एक साहसी समन्वेषक. त्यांचा जन्म नॉर्वेमधील लार्व्हिक येथे झाला. नॉर्वेतील ऑस्लो विद्यापीठात प्राणिशास्त्र आणि भूगोल या विषयांच्या पदवीचे शिक्षण घेत असतानाच ते अर्धवट सोडून १९३७-३८ मध्ये दक्षिण पॅसिफिकमधील पॉलिनीशियातील मार्केसझ द्वीपसमूहावर प्राणिविषयक क्षेत्राभ्यास व संशोधन करण्यासाठी ते गेले. त्यानंतर त्यांनी १९३९-४० मध्ये ब्रिटिश कोलंबियातील इंडियन जमातींचा अभ्यास केला. आपल्या अभ्यासावरून तसेच पॉलिनीशियातील दंतकथा, भाषा आणि पाषाणशिल्पांवरून पॉलिनिशियामध्ये इंका संस्कृतीच्या (१२०० – १६००) आधी दक्षिण अमेरिका खंडातील दक्षिण अमेरिकी इंडियनांनी पहिली वसाहत केली असावी, असा सिद्धांत त्यांनी मांडला.  या सिद्धांताच्या समर्थनार्थ जगातील महासागरपार भिन्न-भिन्न प्राचीन संस्कृतींमध्ये असलेले संबंध आणि त्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक घटकांत असलेल्या साधर्म्यांचे दाखले त्यांनी दिले. प्राचीन काळातील लोकसंख्येच्या स्थलांतरात सागरी प्रवासाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आपला सिद्धांत सिद्ध करून दाखविण्यासाठी त्यांनी १९४७ मध्ये कॉन-टिकी आणि १९६९-७० मध्ये रा या दोन महासागरपार वैज्ञानिक सफरींचे आयोजन आणि नेतृत्व केले होते.

हेअरदाल यांनी आपल्या पाच सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्वीच्या काळी दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोक वापरत असलेल्या तराफ्यांसारखा आकार असलेला बालसा लाकडाचा वापर करून कोन-टिकी तराफा तयार केला. आपल्या सिद्धांताची व्यावहारिकता तपासण्यासाठी २९ एप्रिल १९४७ रोजी दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील पेरूपासून नाविकगणांसह कोन-टिकी तराफ्याने हेअरदाल पॉलिनीशियाकडे निघाले. पेरू ते पूर्व पॉलिनीशियातील टूआमोटी बेटापर्यंतचा सुमारे ६,६०० किमी. चा प्रवास त्यांनी आपला तराफा एका प्रवाळखडकावर आदळून फुटेपर्यंत त्याच तराफ्यातून केला. कोन-टिकी तराफ्यातून पेरू ते पॉलिनीशिया हा प्रवास करणे त्यांना सहज शक्य झाले. त्यावरून पॉलिनीशियनांचे मूळ स्थान दक्षिण अमेरिका असावे, या मताला पुष्टी मिळते. त्यांच्या मते, दक्षिण अमेरिकी इंडियनांनी पॉलिनीशियातील मार्केसझ द्वीपसमूहातील फॅटू हीवा या बेटावर वसाहती केल्या असाव्यात. दक्षिण अमेरिकी इंडियन पॉलिनीशियापर्यंत कसे पोहोचले असावेत, या नवलाईचा शोध घेणे हाच त्यांच्या या सफरीचा मुख्य उद्देश होता; परंतु मानवशास्त्रज्ञांनी हेअरदाल यांच्या या सिद्धांतास मान्यता दिली नाही. कोन-टिकी (इं. भा. १९५०) या पुस्तकात तसेच याच नावाच्या त्यांच्या चलचित्र माहितीपटात त्यांच्या सफरीचा वृत्तांत आहे.

रा -२ बोट

हेअरदाल यांनी १९६९-७० मध्ये वेस्ट इंडीजची दुसरी सफर केली. प्राचीन ईजिप्शियन लोक वापरत असलेल्या वेताच्या बोटीचे प्रतिरूप असलेल्या रा-२ या बोटीतून त्यांनी सात सहकाऱ्यांसह आफ्रिकेतील मोरोक्को ते वेस्ट इंडीजमधील बार्बाडोसपर्यंतचा अटलांटिक महासागर पार केला. त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, कोलंबसपूर्व काळात पश्चिम गोलार्धातील संस्कृतीवर इजिप्शियन संस्कृतीचा प्रभाव पडला असावा. म्हणजे, रॉ-२ सारख्या बोटीतून प्राचीन इजिप्शियन संस्कृतीतील लोकांनी नव्या जगाकडील प्रवास केलेला असावा. प्राचीन काळात अशा सफरींची शक्यता असल्याचे त्यांना दाखवायचे होते. रा-२ बोटीच्या नादुरुस्तीमुळे त्यांना पुढचा प्रवास त्या बोटीतून करणे थांबवावे लागले. या प्रवासाचे वर्णन द रा एक्स्पिडीशन्स (१९७१) या पुस्तकात आणि त्याच नावाच्या माहितीपटातही  दिलेले आहे.

सन १९७७ च्या अखेरीस हेअरदाल आणि आंतरराष्ट्रीय नाविकगणांचा गट मिळून टायग्रीस सफरीवर गेले. वेतापासून बनविलेल्या गलबताने त्यांनी चार महिन्यांत सुमारे ६,४०० किमी. चा प्रवास केला. इराकमधील टायग्रीस नदीपासून सुरू झालेली सफर पुढे इराणच्या (पर्शियन) आखातमार्गे अरबी समुद्रातून पाकिस्तानपर्यंत आणि त्यानंतर तांबड्या समुद्रात प्रवासाचा शेवट केला. प्राचीन सुमेरियन संस्कृतीने अशाच प्रकारच्या वाहतूक साधनांचा वापर करून आपल्या संस्कृतीचा प्रसार नैर्ऋत्य आशियात आणि अरेबियन द्वीपकल्पावर केलेला असावा. या शक्यतेची पडताळणी करणे, हा या सफरीचा उद्देश होता. त्यांनी या प्रवासाचे वर्णन द टायग्रीस एक्स्पिडीशन (१९७९) या पुस्तकात आणि त्याच नावाच्या माहितीपटात केले आहे. हेअरदाल यांनी नंतर मालदीव बेटे, ईस्टर बेटे आणि पेरूमधील पुरातत्त्वीय ठिकाणांच्या संशोधन सफरी केल्या.

अकू-अकू : द सिक्रेट ऑफ ईस्टर आयलंड (१९५८); फॅटू-हिवा : बॅक टू नेचर (१९७४); अर्ली मॅन ॲण्ड द ओशन : ए सर्च फॉर द बिगिनिंग्ज ऑफ नेव्हिगेशन ॲण्ड सीबोर्न सिव्हिलिझेशन (१९७९) ही हेअरदाल यांनी लिहिलेली इतर पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमधून त्यांनी आधीच्या सफरींच्या माध्यमातून काढलेल्या निष्कर्षांचे संश्लेषण तसेच त्यांच्या संस्कृती प्रसाराविषयीच्या सिद्धांताच्या पुष्टीसाठी अधिकचे पुरावे दिले आहेत.

हेअरदाल यांचे इटलीतील कोला मिचारी येथे निधन झाले.

 

समीक्षक : ना. स. गाडे