गंध म्हणजे वास. प्राणी आणि मनुष्यातील महत्त्वाच्या आणि मूलभूत संवेदांपैकी एक संवेद. काही प्राणी त्यांचा वावर असलेला प्रदेश आणि त्यांच्या जातीतील व इतर जातीतील प्राणी ओळखण्यासाठी गंध-संवेदाचा उपयोग करतात. याखेरीज ते अन्न आणि जोडीदार प्राणी गंधावरून शोधतात. सामान्य भाषेत या प्रक्रियेला ‘वास घेणे’ असे म्हणतात. अशा प्रकारे गंध संवेदाचा उपयोग भक्ष्यशोधन, शत्रूपासून संरक्षण, प्रियाराधन वगैरे कामांसाठी केला जातो.मनुष्य आणि (जमिनीवर वावरणारे) इतर पृष्ठवंशी प्राणी यांना हवेतील गंधाचे ज्ञान श्वासाद्वारे होते. अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून हवेत विखुरलेल्या (मुक्त झालेल्या) वायू अवस्थेतील रेणूंमुळे गंध येतो. अशा रेणूंमुळे नाकातील ग्राही पेशी उत्तेजित होतात. ग्राही पेशी या गंधचेतांचा एक भाग असून त्या श्लेष्म्याने आच्छादलेल्या ऊतींच्या स्तरावर असतात. नाकातील हाडे (शंखास्थी) ही याच ऊतींनी झाकलेली असतात. ग्राही पेशी गंधाद्वारे निर्माण झालेले आवेग गंधचेतांमधून मेंदूकडे पाठवितात.

गंधचेता हे आवेग मेंदूच्या एका विशिष्ट भागाकडे पोहोचवितात. या भागाला गंध-कंद (घ्राण-कंद) असे म्हणतात. कुत्रा आणि काही इतर प्राण्यांमध्ये हा गंध-कंद आकाराने मोठा असतो, परंतु मनुष्यात त्यामानाने लहान असतो. प्राण्यांमधील गंध-कंदाच्या आकारानुसार प्राण्यांसाठी गंधाचे ज्ञान किती महत्त्वाचे आहे, हे समजते. गंध-कंदापासून चेता आवेग मेंदूच्या भागाकडे पोहोचल्यानंतर आवेगाचे गंधाच्या माहितीत संस्करण होते.

वेगवेगळ्या गंधांमधील फरक कसे ओळखले जातात याची शास्त्रज्ञांना अजून निश्चित माहिती नाही. विशिष्ट गंधाचे रेणू हे इतर रेणूंहून नाकाच्या हाडावरील विशिष्ट भागातील श्लेष्म्याला चटकन आणि बळकटीने जोडले जात असावेत, असे एक मत आहे. म्हणून गंधाचे ठराविक प्रकारचे रेणू शंखास्थीवरील ठराविक ग्राही पेशीच नेहमी उत्तेजित करीत असाव्यात. या सिद्धांतानुसार गंधाचे रेणू ग्राही पेशींना नेमके कोठे आणि किती वेगाने चिकटलेले आहेत, यावरून गंधांतील फरक निश्चित होतो.

याबाबतीतील दुसर्‍या वेगळ्या सिद्धांतानुसार गंधाचे रेणू कोणत्याही एका किंवा संयुक्त रीत्या अनेक ग्राही पेशींना वेगवेगळ्या प्रकारे उत्तेजित करतात. प्रत्येक ग्राही पेशींचे जनुक त्यानुसार विशिष्ट प्रथिननिर्मिती करतात. हे प्रथिन विशिष्ट गंधाच्या रेणूंनाच चिकटते. अशा प्रथिने आणि रेणू यांच्या जोडणीमुळे ग्राही पेशींपासून आवेग मेंदूपर्य़ंत पोहोचतात.

चव आणि गंध

सामान्यपणे आपण अन्नपदार्थाची चव (रुची) आणि गंध एकाच वेळी घेत असतो. अशा प्रकारे हे दोन्ही संवेद एकमेकांशी जोडलेले असतात. परंतु वस्तुतः हे दोन्ही संवेद वेगवेगळे आहेत. मेंदूत फक्त काही ठिकाणी हे संवेद एकत्र येतात. चव आणि गंध या दोन्ही एकमेकींस साहाय्यक व पूरक असून त्यांच्यापासून ‘स्वाद’ हे ज्ञान उत्पन्न होऊ शकते.

अन्नातील गंधउत्तेजित भाग हा चव-उत्तेजित भागापासून वेगळा करता येतो. जेव्हा अन्न तोंडात घेतले जाते तेव्हा नाकात स्वच्छ हवा सोडून हे विलगीकरण करता येते किंवा अन्न हवेच्या संपर्कात न आणता फक्त रुचि-कलिकेच्या संपर्कात आणून हे साधता येते. जेव्हा गंध उत्तेजना या चव उत्तेजनेपासून वेगळ्या होतात, तेव्हा काही अन्नपदार्थ आणि पेये ओळखता येत नाहीत (उदा., चेरी, चॉकलेट आणि कॉफी).

प्रतिक्रिया व्यक्त करा