एक सुवासिक वनस्पती. सुगंध येण्यासाठी या वनस्पतींची पाने चहामध्ये मिसळतात. गहू, ही वनस्पती पोएसी (गॅमिनी) कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सिंबोपोगॉन सिट्रेटस आहे. ही मूळची भारतातील असून समशीतोष्ण तसेच उष्ण प्रदेशांत वाढते. भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड इ. देशांत ही प्रामुख्याने आढळते. या देशांत ती कोचीन ग्रास या नावाने ओळखली जाते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये गवती चहाची लागवड केली जाते.

गवतासारखी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती १.५-२ मी. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात.

ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो. पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात.