कुडमुडे जोशी : भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारी महाराष्ट्रातील भटकी जमात. हातात कडबुडे घेऊन भीक मागणाऱ्या जोशांची (अब्राम्हण) एक जात असा उल्लेख महाराष्ट्र शब्दकोशात या जमातीसंदर्भात केला आहे. महाराष्ट्र शासनाने भटकी जमात म्हणून या समूहाची नोंद घेतली आहे. या भटक्या जमातीत मेंडगी, बुडबुडकी, डमरूवाले, सरोदे, सहदेव जोशी, सरवदे, सरोदा अशा उपजमाती आढळतात. कुडमुडे जोशी महाराष्ट्रातले रहिवाशी असले तरी, त्यांचा कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याशीही संपर्क आलेला आहे. त्यांच्या समाजाला महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर खिवारी (Shivari) या नावाने ओळखले जाते. आंध्रप्रदेश आणि  कर्नाटक या राज्यातही ते राहत असले तरी त्यांचा सर्व व्यवहारसंपर्क महाराष्ट्र राज्याशी आहे. त्यांना तिन्ही राज्यातल्या भाषा चांगल्या अवगत आहेत. त्यांच्या जमातीत इतरांना कळू नये यासाठी सांकेतिक भाषा बोलली जाते. तिला खिवारी किंवा पारसी भाषा असे म्हणतात. कुडमुडे जोशी हे हिंदू आणि मुसलमानांचे रीतीरिवाज पाळत असल्याचे दिसून येते. त्यांचा नागरी समाजाशी खूप कमी संपर्क आहे. ते गावाच्याबाहेर राहणे पसंत करतात. पावसाळ्यात पालं सोडून एखाद्या सार्वजनिक इमारतीत, धर्मशाळेत अथवा एखाद्याच्यात निवाऱ्याला राहिल्यास आपल्यावर मोठे संकट कोसळेल अशी समजूत त्यांच्यात प्रचलित आहे. कुडमुडे जोशी समाजात लग्न जमवताना पंचमंडळीला मान दिला जातो. मुला-मुलींची पसंती झाल्यानंतर पंच मंडळी आणि भावकीतील माणसे लग्न लावतात. अश्या प्रसंगी दारूसारखे मादक द्रव्य पाहुण्यांना देण्याची प्रथा प्रचलित होती. अशा पद्धतीला लग्नघडा म्हणतात. लग्नामध्ये हुंडा घेण्याची अगर देण्याची पद्धत समाजात नाही. मुलाच्या वडिलाने, मुलीच्या वडिलाला पैसे द्यावे लागतात. त्याला दहेज असे म्हणतात. तसे लग्नाचा खर्च वधू-वरांच्या आई-वडिलांनी निम्मा-निम्मा करण्याची रीत आहे. लग्नसोहळा तीन दिवस असतो. लग्नकार्यात भावकीतले लोक काम करतात. काम करणार्‍या व्यक्तीला देवका कुंभार असे म्हणतात. कुडमुडे जोशी भिक्षा मागतात. काहीजण भल्या पहाटे उठतात, हातात कंदील घेतात. त्याचा उपयोग उजेडासाठी होतो. त्यांच्याबरोबर एक छोटंसं डमरुसारखं वाद्य असतं. भिक्षा मागताना कपडा-लत्ता, पैसा-अ‍डका, धन-धान्य मागून घेतात. भीक मागताना बडबड करण्याची प्रत्येकाची रीत वेगळी असल्याचे दिसून येते. भिक्षा मागताना देवीचे चित्र, मुखवटे गळ्यात अडकवितात. पिंगळा देवीची हळद-कुंकू लावून पूजा करतात. याच देवीच्या कृपेने पिंगळ्याची भाषा कळते, असा त्यांचा समाज आहे. बहुतेक लोक भविष्य सांगणायचा व्यवसाय करतात. कुडमुडे जमातीतील स्त्रिया जुन्या कपड्यांचा व्यवसाय करतात.

कुडमुडे जोशी हा समाज हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समाजाचे रीतीरीवाज, रूढी, परंपरा पाळणारा असल्यामुळे हिंदूचे बाराही सण ते साजरे करतात आणि मुसलमानाप्रमाणे सवारी बसवतात. रोझा पाळतात. मोहरमचा सण साजरा करतात. पीराची यात्रा करतात. जसे शिवाजीला मानतात तसेच ते पैगंबरालाही मानतात. मरिआई त्यांची प्रमुख देवी मानली जाते. तिचे देव्हारे त्यांच्या प्रत्येक कुटुंबात पाहावयास मिळतात. देवदैवतांचा पगडा त्यांच्या सर्वांच्या मनीमानसी बिंबलेला दिसून येतो. कुडमुडे जोशींच्यात जातपंचायतीला महत्त्व होते. पंचायतीची घटना लेखी नव्हती . अलिखित नियम होते. पंचायतीत येणारे तंटे, भावकीतले झगडे, लग्नकार्यातील भांडणं, जातीतील रीतीरिवाज, मानपान तसेच अनैतिक वर्तन, आंतरजातीय विवाह, परस्परातील देवाण-घेवाण, सोईरसंबंधातील कलागती अशा स्वरूपाचे तंटे या जात पंचायतीत सोडविले जात असत. वाढते आधुनिकीकरण आणि शिक्षण प्रसार यामुळे या समाजात बदल व्हायला सुरुवात झाली आहे.

संदर्भ :

  • Ghatage, B. S., A study of the impact of social welfare measures on the development of the nomadic tribes in Kolhapur district, Shodhganga, 2001.