शेतजमिनीच्या बांधावर लागवड केली जाणारी घायपात वनस्पती घायाळ म्हणूनही ओळखली जाते. ही अगेव्हसी कुलातील अगेव्ह प्रजाती असून तिच्या अनेक जाती आढळून येतात. ही वनस्पती मूळची मेक्सिकोतील तसेच अमेरिकेच्या दक्षिणेकडील संयुक्त संस्थानांतील असून तिचा प्रसार दक्षिण यूरोप, आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत, श्रीलंका या देशांत झाला आहे. पंधराव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी ही वनस्पती भारतात आणली. भारतात हिची लागवड कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर केली जाते.
फुलोरा आलेला घायपात

घायपात या एकदलिकित बहुवर्षायू वनस्पतीचे खोड लघुस्तंभीय, अर्धकाष्ठमय असून जमिनीवरील खोडाचा भाग पानांच्या वर्तुळाकार गुच्छाने वेढलेला असतो. पाने साधी, लांब, मांसल, टोकदार, बिनदेठाची, चिवट व मेणचट असतात. त्यांचा रंग करडा हिरवा असून दोन्ही कडांवर व टोकांवर तीक्ष्ण व लहान काटे असतात. या वनस्पतीला प्रादेशिक हवामानानुसार दहा ते साठ वर्षांदरम्यान एकदाच फुलोरा येतो. फुलोऱ्याचा दांडा तळाशी सु.१५ सेंमी. जाड असून ६ – १० मी. उंच असतो. तो खोडाच्या मध्यातून येतो.

फुले पांढरी, झुपक्या-झुपक्यांनी येतात. फळात अनेक बिया असतात. बिया चपट्या, काळ्या व पातळ असतात. फुलोरा येऊन गेल्यावर झाड मरते. फुलोऱ्यातील लहान कंदिकांपासून तसेच मूलक्षोडापासून येणाऱ्या अधश्चरांपासून नवीन वनस्पती तयार होतात.

घायपाताची मोठी पाने पोटिसासाठी वापरतात. पानांचा रस सारक, आर्तवजनक व रक्तपित्तनाशक आहे. मुळे स्वेदकारी व गरमीनाशक आहेत. दांड्यातील रसापासून साखर व शिर्का तयार करतात. रस्त्याच्या व लोहमार्गाच्या दुतर्फा, कुंपणासाठी तसेच उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी ही वनस्पती लावतात. तिच्या पानांपासून उपयुक्त धागा (वाख) मिळतो. तो लांब, मजबूत व भरभरीत असून दोर व दोरखंड करण्यासाठी वापरतात. याखेरीज चटया, पायपुसणे, गालिचे, जाडेभरडे कापड, स्वस्त प्रतीचे ब्रश व खुर्चांच्या गाद्या तयार करण्यासाठी वाख वापरला जातो.

भारतात घायपाताच्या पाच प्रमुख जाती आढळतात : (१) अगेव्ह अंगुस्तिफोलिया (ड्वार्फ ॲलो; छोटा घायाळ) ही मूळची उ. अमेरिकेतील असून भारतात हिमालयाच्या खालच्या भागात आढळते.

(२) अगेव्ह कॅटाला (बाँबेरेला) ही जात भारतात सर्वात आधी आली आहे असे मानतात. ही मूळची मध्य-अमेरिकेतील असून भारतात सर्वत्र वाढते.

(३) अगेव्ह सिसालाना (सिसाल; वनकेवडा) ही मूळची मध्य-अमेरिकेतील असून भारतात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांत लागवडीखाली आहे.

(४) अगेव्ह व्हेराक्रुझ (ब्लू एलिफ़ंट ॲलो; ललि घायाळ) ही मूळची मेक्सिकोतील असून भारतात सर्वत्र कुंपणासाठी लावलेली आढळते.

(५) अगेव्ह अमेरिकना (अमेरिकन ॲलो) या जातीची भारतात फक्त बागांमध्ये शोभेचे झाड म्हणून लागवड करतात.

घायपात ही कॅक्टेसी वनस्पती आहे, असा एक समज आहे. मात्र, घायपात आणि कॅक्टेसी यांचा कसलाही संबंध नाही. हिचा लिली आणि ॲमारिलिडेसी कुलांशी जवळचा संबंध आहे.