मानवी स्त्री प्रजनन संस्था

ज्या ग्रंथीमध्ये स्त्रीबीजे (अंड) उत्पन्न होतात तिला अंडाशय म्हणतात. ते अंडकोश, बीजांडकोश व बीजांडाशय या नावांनीही ओळखले जाते. स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये असतात. पुरुषातील वृषणाशी ते स्थान, रचना आणि कार्य या दृष्टीने समकक्ष असतात. या ग्रंथींचा रंग भुरकट गुलाबी असून बाह्यभाग आरंभी गुळगुळीत असतो. पुढे अंडनिर्मिती होऊ लागल्यानंतर तो सुरकुतलेला, खडबडीत व पुटकुळ्या असल्यासारखा होतो. अंडाशयाचा आकार बदामासारखा फुगीर व लांबटगोल असतो. प्रत्येक अंडाशयाची लांबी ३ सेंमी., रुंदी १.५ सेंमी. आणि जाडी १ सेंमी. असते. भ्रूणावस्थेत अंडाशय कटिभागात वृक्काजवळ असतात, पण पुढे ते हळूहळू खाली सरकत जाऊन उदरगुहेत स्थिर होतात. अंडाशयांच्या खाली दोन अंडवाहिन्या व एक गर्भाशय असते. प्रत्येक अंडवाहिनीचे टोक झालरीसारखे व नरसाळ्याच्या आकाराचे असते. अंडाशयाला निलंबी बंध नावाची पर्युदराची एक दुहेरी घडी चिकटलेली असते. या बंधाच्या दोन थरांमधूनच रक्तवाहिन्या, लसीकावाहिन्या व चेतातंतू अंडाशयात जातात आणि बाहेर येतात. अंडाशयाचे दुसरे टोक अरुंद असते आणि ते गर्भाशयाच्या बाह्यकोनास अंडाशय बंधाने जोडलेले असते.अंडाशयाचे बाह्यक व मध्यक असे दोन भाग असतात. बाह्यकातील घनाकार पेशींपासून अंडपुटकांची निर्मिती होते. ही अंडपुटके विकसित होत जातात व मध्यकात येतात. तेथे अंडपुटकातील अंड परिपक्व होते. हे अंड अंडाशयाच्या बाह्यस्तराचा भेद करून बाहेर पडते याला अंडमोचन म्हणतात. ते अंडवाहिनीच्या फॅलोपी नलिकेच्या झालरयुक्त टोकातून गर्भाशयाकडे जाते. अंडपुटकाच्या उरलेल्या भागाचा पीतपिंड तयार होतो. अंड फलित न झाल्यास ते मासिक ऋतुचक्राच्या ऋतुस्रावाबरोबर विसर्जित होते. रजाेनिवृत्तीनंतर अंडाशयाचा आकार लहान होतो.

अंडाशयात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन अशी संप्रेरके निर्माण होतात. त्यांच्यामुळे जननेंद्रियांची वाढ व नियंत्रण, ऋतुचक्रनियंत्रण, लैंगिक गौणलक्षणे, स्तनांची वाढ, गर्भाचे पोषण आणि गर्भावस्थेत होणारे शारीरिक बदल ही कार्ये होतात. खुद्द अंडाशयाचे नियंत्रण पीयुषिका ग्रंथीत उत्पन्न होणार्‍या अनेक संप्रेरकांमुळे होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा