सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ऐतिहासिक,पौराणिक महत्वाचे स्थान. तारळी नदीच्या दोन्ही तिरावर वसलेले आहे.याचे मूळ नाव राजापूर असुन येथील खंडोबाचे पुरातन मंदिर प्रसिद्ध आहे. यास खंडोबाची पाल म्हणून ही ओळखतात. एका आख्यायिकेनुसार या गावात पालाई नावाची गवळण खंडोबाची भक्त होती. तिच्या नावावरून गावास पाल हे नाव पडले असावे. पालचा शब्दकोशात राजा, गुराखी, पालनकर्ता असाही उल्लेख आढळतो. पाली हे त्याचे स्त्रीलिंगी रुप होय. पालाई गवळण ही पालासारखी पांढरी व सडपातळ होती, यावरूर पाली नाव मिळाल्याची उत्पत्ती सांगितली जाते. गाभाऱ्यात प्रवेश करताना पालाईची समाधी आहे. मंदिरात असलेल्या ओवरीवरील शिलालेखाद्वारे खंडोबा मंदिर शके १६१४ मध्ये बांधण्यात आल्याचे आढळते. गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंग दोन शाळुंका असणारे आहे. त्यांपैकी एकावर खंडोबाचा, तर दुसऱ्यावर म्हाळसाचा पितळी मुखवटा आहे.

त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला खंडोबाची दुसरी पत्नी बाणाई हिची मूर्ती आहे. शिवकालीन सेनापती धनाजी जाधवाने मुख्य मंदिरासमोरील सभामंडप बांधल्याचा उल्लेख सापडतो. मंदिर बांधकाम कोरीव दगडीकामाचे असुन काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढवलेले आहेत. खंडोबाच्या म्हाळसाकांत अवताराचे शिल्प पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असुन मंदिर परिसरात सात दीपमाळा आहेत.

मंदिरासमोरील दगडी हाताखाली पितळी पत्र्याचे आवरण असलेला नंदी आणि हत्ती आहेत. प्रांगणाला तीन प्रवेशद्वारे असुन दीपमाळेवर १२ कोरीव दिवे आहेत.प्रागंणाबाहेरील जागा दगडी फरसबंदीची असुन त्यात ५० कासवांची कोरीव शिल्प संयम आणि यशाचे मार्गदर्शक असल्याचे दिसुन येते. गाभा्ऱ्यात मारुती,म्हसोबा,सटवाई तर मुख्यमंदिराबाहेर जोतिबा,विठ्ठल आणि यमाई यांची मंदिरे आहेत. दगडी गुंडा (गोटी), चाक, नदी, हत्ती, घोडा मेंढराची शिल्प असा पुरातन ठेवा भक्कम दगडी तटबंदीत आहे. शिखरावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या असून आकर्षक रंगरंगोटी केलेल्या आहेत.

यात्रा दृश्य

पाली येथे भरणाऱ्या खंडोबा यात्रेचे आकर्षक म्हणजे खंडोबा-म्हाळसा लग्न सोहळा. दरवर्षी मोठ्या आनंदाने व भक्तिमय वातावरणात भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा यळकोट घे…. ! खंडोबाचा यळकोट,यळकोट येळकोट घे…..!! जय मल्हार!!! या जयघोषाने विवाह सोहळा संपन्न होतो.

खंडोबा म्हाळसा विवाह हा दैवी शक्तीचा यात्वात्मक विधी असल्याचे मानले जाते. म्हाळसा ही आदिशक्ती आहे. खंडोबा व म्हाळसाच्या लग्नविधी मध्ये तत्कालीन सांस्कृतिक व सामाजिक संदर्भ आलेले दिसतात. पाल येथे खंडोबा मंदिरात शिवपूजा लिंग (पिंड) रुपात होत असून ते पती आणि पत्नी यांच्यातील अद्वैत शिवशक्ती स्वरुपाचे प्रतीक आहे. श्री खंडोबा हे अनेक भक्तांचे कुलदैवत असून खेड्यातील जनसमूहावर,त्यांच्या धार्मिक समजुतीवर पगडा असलेला ही देवता माणसावरील संकट निवारण्याचे काम करते अशी लोकसमजूत आहे. पाल येथील खंडोबा हे जागृत देवस्थान म्हणून बरेच उत्सव व यात्रा भरतात.

संदर्भ :

  • ढेरे, रा. चि., दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा