भारतात सामान्यपणे पांढरे घुबड आढळते. त्याचे शास्त्रीय नाव टायटो आल्बा आहे. त्याचबरोबर शृंगी घुबड आणि मासे खाणारे तपकिरी घुबडही आढळते. साळुंकीएवढे लहान घुबडही भारतात सर्वत्र आढळते. महाराष्ट्रात याला पिंगळा म्हणतात. एल्फ आउल हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळते. त्याची लांबी सु. १५ सेंमी. असते. सर्वांत मोठया घुबडाचे नाव ग्रेट ग्रे आउल असून त्याची लांबी सु. ७२ सेंमी. असते. या जातीची घुबडे यूरोप, आशिया व उत्तर आफ्रिकेत आढळतात.
घुबडांचे शरीर आखूड व भरीव असते. सर्व जातींच्या घुबडांचे डोके मोठे, चेहरा बशीसारखा पसरट आकाराचा असतो. डोळ्यांभोवती पिसांचे वलय असते. कान डोक्याच्या कडेला असून ते वर-खाली (समान पातळीवर नसतात) आणि पिसांखाली झाकलेले असतात. चेहऱ्यावरील विशिष्ट पोताच्या पिसांमुळे कानाकडे आवाज केंद्रित होतो. त्यामुळे आवाज कोठून येतो त्याची केवळ क्षितिजसमांतर दिशा नव्हे ,तर आवाजाचा स्रोत किती वर-खाली आहे याचाही अंदाज त्यांना करता येतो. डोळे इतर पक्ष्यांप्रमाणे कडेला नसून समोरच्या दिशेला आणि विस्फारलेले असतात. म्हणून ती एकाच क्षणी दोन्ही डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहू शकतात. परंतु माणसाचे डोळे जसे खोबणीत फिरतात तसे घुबडांचे डोळे फिरत नाहीत. एखादी हालणारी वस्तू पाहावयाची असल्यास त्यांना डोके फिरवावे लागते. मानेतील मणक्यांच्या विशिष्ट रचनेमुळे घुबडे त्यांचे डोके क्षितिजसमांतर २७०० पर्यंत आणि वर-खाली १८०० पर्यंत फिरवू शकतात. डोळ्यांतील निमेषक पटल पारदर्शी असून ते डोळे ओले व स्वच्छ ठेवते. एखादया भक्ष्यावर घुबड झडप घालते तेव्हा त्याचे डोळे पापण्यांनी झाकले जातात. त्यामुळे डोळ्यांना सहसा इजा होत नाही. चोच मजबूत असून गळासारखी वळलेली असते. पाय मजबूत असून बोटांवर तीक्ष्ण नख्या असतात. काही घुबडांच्या डोक्यावर पिसांचा तुरा असल्यामुळे शिंगे (शृंगे) असल्याचा भास होतो. या पिसांचा वापर करून ते मादीला आकर्षित करीत असावेत किंवा त्यांच्या जातीच्या इतर घुबडांना ओळखण्यासाठी वापर करीत असावेत, असा अंदाज आहे. लांब, मऊ व हलक्या पिसांमुळे हा पक्षी जेवढा असतो त्याहून मोठा वाटतो. त्यांचा पिसारा करड्या किंवा राखाडी रंगाचा असल्यामुळे ते त्यांच्या अधिवासाशी एकरूप होऊन त्यांचे शत्रूपासून संरक्षण होते. घुबडाची मादी नराहून आकाराने मोठी असते.
सर्व घुबडे निशाचर आहेत. रात्रीच्या काळोखात त्यांना चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. परंतु संधिप्रकाशात शिकार करणाऱ्या घुबडांच्या काही जाती आहेत. शिकारीसाठी त्यांचे शरीर अनुकूलित झालेले असते. अन्य भक्षक पक्ष्यांच्या तुलनेने घुबडे कमी वेगाने उडतात; परंतु ती वेगाने देखील उडू शकतात. उडणाऱ्या पिसांच्या कडांची विशिष्ट दातेरी रचना असल्यामुळे त्यांच्या उडण्याचा आवाज कमी होतो. भक्ष्य पकडण्यासाठी घुबडे त्यांच्या अंगी असणाऱ्या केवळ उत्कृष्ट दृष्टिक्षमतेवर अवलंबून राहत नाहीत, तर ऐकण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात. मिट्ट काळोखात जमिनीवर वावरणारे उंदीर आणि इतर लहान प्राण्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या सूक्ष्म आवाजाचा वेध घेऊन ती भक्ष्य पकडतात. बहुधा सर्व घुबडे उंच जागेवरून भक्ष्याचा शोध घेतात. काही जाती शेतावरून किंवा दलदलीवरून उडत असतानादेखील भक्ष्य हेरतात. एकदा भक्ष्य हेरले की घुबडे जलद व आवाज न करता त्याच्याकडे झेप घेतात आणि त्याला पकडतात. क्वचित प्रसंगी, ती जखमी प्राण्यांना देखील उचलून नेऊन खातात.
घुबडे लहान सस्तन प्राणी खातात. तसेच ती पक्षी, सरपटणारे प्राणी, मासे, कीटक आणि कृमीदेखील खातात. कृतक प्राण्यांचा त्यांच्या आहारात प्रमुख समावेश असतो. मोठ्या आकाराची घुबडे काही वेळेला सशासारखे प्राणी उचलून नेतात. काही उथळ पाण्यातील मासे खातात. ससाण्याप्रमाणे घुबडे मोठ्या आकाराचे भक्ष्य तुकडे करून खातात. परंतु भक्ष्य लहान असल्यास ते अखंड गिळतात.
घुबडे स्वत: घरटे बांधत नाहीत. त्याऐवजी ते ससाण्यांच्या किंवा कावळ्यांच्या जुन्या घरटयांचा वापर करतात. घुबडे झाडांच्या ढोलीत, गुहेच्या किंवा उंच कडयांच्या कपारीत, जमिनीत खड्डे करून किंवा जमिनीखाली बिळात तर काही धान्याच्या गोदामांत किंवा चर्चच्या घंटाघरातही राहतात. त्यांच्या बहुतेक मादया दोन किंवा चार अंडी घालतात;परंतु काही एक, तर काही १२ अंडी घालतात; अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात. बहुतेक जातींमध्ये मादी अंडी उबविते. नर मादीसाठी व पिलांसाठी अन्न गोळा करतात.पिले ४ – ५ आठवडे घरटयात राहतात. नर-मादी दोघेही मिळून पिलांचे शत्रूपासून रक्षण करतात. घरटयातून बाहेर पडल्यानंतर पिले काही आठवडे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतात. या काळात पिले उडायला आणि शिकार करायला शिकतात.
घुबड शेतकऱ्यांसाठी उपयोगी पक्षी आहे. पिकांची नासधूस करणारे उंदीर, घुशी, ससे आणि कीटकांना खात असल्यामुळे घुबडे माणसाला उपकारक ठरली आहेत.