(मायरोबलान). एक औषधी वनस्पती. हिरडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलीया चेब्युला आहे. हा वृक्ष दक्षिण आशियातील असून भारत, पाकिस्तान, नेपाळ, नैर्ऋत्य चीन, मलेशिया, व्हिएटनाम, कंबोडिया येथे वाढलेला दिसून येतो. भारतात तो हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिण भारतापर्यंत आढळतो. महाराष्ट्रात तो कोकण, पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असा सर्वत्र वाढतो.

हिरडा (टर्मिनॅलीया चेब्युला ) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे.

हिरडा हा बहुवर्षायू वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो. खोडाचा व्यास सु. १ मी. पर्यंत असून साल जाडसर असते. जुनी साल भेगाळलेली, फिकट किंवा गडद तपकिरी रंगाची असते. पर्णसंभार झुपकेदार व पसरट असतो. पाने साधी, एकाआड एक, लंबगोल किंवा अंडाकृती असून कोवळी पाने लवदार असतात. पाने पूर्ण वाढल्यावर लव नाहीशी होते. पानांमध्ये शिरा ६ ते ८ असतात. पानगळ साधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होते. फुले पानांच्या बगलेत, तसेच फांद्यांच्या टोकाला येतात. फुले उभयलिंगी, पांढरी किंवा पिवळट हिरवी, ५-६ मिमी. व्यासाची असून पाचही निदलपुंज एकत्र आल्याने पेल्यासारखा आकार दिसतो; दलपुंज नसतात. फुलात पुंकेसर १० असतात. फळ कठीण, ३–५ सेंमी. लांब असून फळावर पाच कडा किंवा कंगोरे दिसतात. कच्ची फळे हिरवी असून पिकल्यावर ती पिवळसर हिरवी होतात. फळात एकच बी असून ती फळापासून वेगळी होत नाही.

हिरडा वृक्षाची फळे औषधी असून ती त्रिफळा चूर्णात एक मुख्य घटक म्हणून वापरली जातात. ती शुष्क, उष्ण असून शक्त‍िवर्धक, कफोत्सर्जक, कृमिनाशक असतात. त्यांचा उपयोग घसा, दमा, वांती, उचकी, अपचन व मूत्राशय यांच्या विकारांवर करतात. उन्हाळे लागणे, मुतखडा, रक्ती मूळव्याध, विषमज्वर यांवर फळे उपयोगी पडतात. हिरडा, बेहडा (टर्मिनॅलीया बेलेरिका ) आणि आवळी (एंब्लिका ऑफिसिनॅलिस ) यांच्या फळांचे ‘त्रिफळा चूर्ण’ रेचक, दीपक व अजीर्णनाशक असते. चूर्ण आमांश, अतिसार व रक्ती मूळव्याध यांवर देतात. हिरड्याच्या कोवळ्या फळांना ‘बाळहिरडा’ म्हणतात. ती आपोआप गळून पडलेली किंवा खुडलेली असतात आणि वाळल्यावर सुरकुतलेली दिसतात. हिरड्याच्या फळापासून व फळाच्या सालीपासून टॅनीन व रंग मिळवतात. टॅनिनांचा उपयोग कातडी कमावण्याच्या उद्योगात, तर रंगाचा वापर कापड रंगविण्यासाठी करतात. हिरड्याचे लाकूड कठीण व टिकाऊ असून घरबांधणी, फर्निचर, वल्ही, बैलगाड्या, शेतीची अवजारे यांकरिता वापरतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा