स्तनी वर्गातील कृतक गणाच्या म्युरिडी कुलातील एक उपद्रवी प्राणी. घुशींच्या पाच वेगवेगळ्या जाती आहेत. त्यांच्या लेसर बँडिकूट (लहान) आणि ग्रेटर बँडिकूट (मोठा) अशा दोन जाती भारतात आढळतात. बँडिकूट हा शब्द पंडी कोक्कू या तेलुगू शब्दाचा इंग्रजीत झालेला अपभ्रंश आहे. मोठया घुशीचे शास्त्रीय नाव बँडिकोटा इंडिका असे आहे. बँडिकोटा इंडिका या मोठया घुशीची लांबी २० – ३५ सेंमी. असून शेपूट शरीराच्या मानाने किंचित लहान असते. वजन सु. १ किग्रॅ. हून जास्त असते.

घुशी उत्तम पोहतात आणि चांगल्या प्रकारे पाण्यात सूर मारतात. वेळप्रसंगी त्या हिंस्र बनतात. रागावल्या असता शेपटीजवळचे केस फुलवून त्या शेपूट ताठ करतात व फिसकारून गुरगुरतात. त्यांच्या शरीराला घाणेरडा वास असतो. त्या उपद्रवी असून पिकांनी बहरलेल्या शेतांमध्ये राहतात. बिळांकरिता शेतजमीन पोखरली गेल्याने पिकांची मोठया प्रमाणात हानी होते. तसेच पिके आणि साठविलेल्या अन्नधान्यांची त्या मोठया प्रमाणावर नासाडी करतात.
घुशी सर्वभक्षी असल्याने अन्नधान्य, भाजीपाला, केरकचरा व घाण जे मिळेल ते खातात. कोंबडीचे लहान पिलूदेखील पळवितात. त्यांची घरे म्हणजे शेतात, नदीच्या काठाला, घरात किंवा घराभोवती खोदलेली बिळे असतात. बिळाजवळ उकरलेल्या मातीचे ढिगारे दिसतात. बिळाची लांबी ३० – ६० सेंमी. असते. त्यात कप्पेवजा खोल्या असतात. अन्न साठविण्यासाठी, झोपण्यासाठी व पिलांकरिता अशा प्रकारच्या खोल्या असतात. एका बिळात एकच घूस राहते. गर्भावधी २४ दिवसांचा असतो. मादी एका वेळेस १०-१२ पिलांना जन्म देते. पिलांची खोली गवत व कडब्याने मढविलेली असते. मादी पिलांबरोबर एकाच बिळात राहते. जन्मतः पिलांचे डोळे बंद असतात. त्यांच्या अंगावर केस नसतात. जन्मानंतर तीन महिन्यांनी पिले प्रजननक्षम होतात म्हणून त्यांची संख्या झपाटयाने वाढते. घुशींच्या काही जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या काही भागांत त्यांना संरक्षण दिले जात आहे.
स्तनी वर्गाच्या शिशुधानी उपवर्गातील काही प्राण्यांनाही बँडिकूट म्हणतात. हे प्राणी ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी या देशांतील वनात किंवा शेतात दाट झाडीच्या भागामध्ये राहतात. १७९९ मध्ये जॉर्ज बास या संशोधकाने हे प्राणी भारतीय बँडिकूट (घूस) यासारखे दिसत असल्यामुळे त्यांनाही बँडिकूट नाव दिले. आता या शिशुधानी बँडिकूटपासून घूस वेगळी असल्याचे दाखविण्यासाठी काही वेळा तिचा ‘बँडिकूट रॅट’ असा उल्लेख केला जातो.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.