पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना आहे. जैवविविधता तीन स्तरांवर दिसून येते : (१) जनुकीय विविधता, (२) जाती विविधता आणि (३) परिसंस्था विविधता.

जनुकीय विविधता : सजीवांच्या एखादया जातीच्या जनुकांतील विविधतेचा अभ्यास या स्तरावर केला जातो. उदा., ओरायझा सटायव्हा शास्त्रीय नाव असलेल्या भाताच्या जगभरात दोन ओ.स.इंडिका आणि ओ.स.जेपोनिका अशा दोन उपजाती आहेत त्यांचे ४०,००० हून अधिक प्रकार पिकविले जातात. त्यांमध्ये रोपांची उंची, लोंब्यांची लांबी, एकेका लोंब्यातील दाण्यांची संख्या, दाण्यांचा आकार, वास, चव, उत्पादन हाती येण्यासाठी लागणारा कालावधी, त्या पिकाची नैसर्गिक कीडप्रतिकारक्षमता अशा बाबींमध्ये विविधता असते. ओरायझा या तृणधान्यांत सर्वांत लहान म्हणजे ३४० एम. बी. इतकाच जीनोम आहे. त्यात बारा गुणसूत्रे असतात. आनुवंशिक बदल करण्यासाठी ही जाती अतिशय सोयीची आहे.

जाती विविधता : एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा सजीवांच्या विशिष्ट गटात आढळणारी जैवविविधता यांचा अभ्यास यात केला जातो. बहुतकरून उष्ण प्रदेशात सजीवांच्या जातीतील विविधता ही थंड प्रदेशाच्या तुलनेत अधिक असते. उदा., कोस्टा रीकासारख्या लहान व उष्ण हवामान असलेल्या देशात पक्ष्यांच्या जातींची संख्या सु. ८३० आहे. ही संख्या कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या क्षेत्रफळाने मोठया आणि थंड असलेल्या देशांच्या तुलनेने अधिक आहे.

परिसंस्था विविधता : पृथ्वीवरील विविध परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पतींचा यात समावेश होतो. कोणत्याही परिसंस्थेत त्या विशिष्ट अधिवासातील सजीव आणि त्या सजीवांना आवश्यक असलेल्या अजैविक घटक यांचा समावेश होतो. परिसंस्थेच्या प्रत्येक प्रकारात सजीवांच्या जातींचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असते आणि ते इतर परिसंस्थेहून निराळे असते. उदा., समान अक्षवृत्तीय विस्तार असूनही महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पश्चिम भागात जैवविविधता अधिक तर पूर्व भागात जैवविविधता कमी आढळते.

परिसंस्थांतील विविधतेमुळे पृथ्वीवर जगण्यालायक परिस्थिती टिकून आहे. उदा., पर्यावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड (CO2) वनस्पतींदवारे शोषला जातो. जर वनस्पती नष्ट झाल्या तर वातावरणात CO2 चे प्रमाण वाढते आणि हरितगृह परिणामात भर पडू शकते. हरितगृह परिणामात वाढ झाली तर जगाच्या तापमानात कायमची वाढ होईल आणि त्यामुळे सजीव कायमचे नष्ट होतील अशी वैज्ञानिकांना भीती वाटते. सजीवांच्या जातीचा प्रत्येक प्रकार आणि परिसंस्था वेगवेगळी असते आणि ती निसर्गात भर घालीत असते.

पृथ्वीवर जैवविविधता असमान आढळते. त्यावर स्थान, हवामान, मृदा, जलस्रोत, सजीव इत्यादी घटकांचा परिणाम होतो. साधारणपणे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे जैवविविधता वाढत जाते. निम्न अक्षवृत्तीय प्रदेशात जैवविविधता कमी प्रमाणात आढळते. जैवविविधता असलेली समृद्ध स्थळे (हॉट-स्पॉट) जगभरात विखुरलेली असली तरी उष्ण प्रदेशातील वनक्षेत्रात ती जास्त आढळून येतात

जैवविविधता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणात बदल झाले तरी जनुकीय विविधता टिकून राहते. एका कोणत्याही क्षणी किंवा स्थानी, विशिष्ट सजीवांतील जनुके त्या सजीवाला बदललेल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करतात. सजीवांच्या ज्या जातीत जनुकीय लक्षणांमधील विविधता अधिक असते, असे सजीव पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यात अधिक सक्षम असतात.

भारतातील जैवविविधता पश्चिम घाट, ईशान्य भारतातील वने आणि केरळमधील सायलेंट व्हॅली यांमध्ये टिकून आहे. पारिस्थितिकीच्या दृष्टीने, पश्चिम घाटाला विशेष महत्त्व असून अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती तेथे आढळतात. भारतात उच्च दर्जाच्या सु. २७% वनस्पती (४,००० – १५,००० जाती) आढळतात. त्यांपैकी १,८०० जातींच्या वनस्पती पश्चिम घाटात पाहायला मिळतात. सु. ५,००० फुलझाडांच्या जाती पश्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सु. १,६०० फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत.

२०१० हे साल जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करणे, हा त्यामागील उद्देश होता. हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे. परिसंस्थेतील बाह्यजातींचे उच्चाटन करणे, कीटकनाशकांच्या वापरात घट करणे, जैवविविधता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे करणे, जनुक पेढी तयार करणे इत्यादी उपायांमुळे जैवविविधता राखता येऊ शकते.