पाने व फुलांसहित चहा

केवळ पानांच्या उत्पादनासाठी ज्यांची लागवड केली जाते अशा काही वनस्पतींमध्ये चहाच्या वनस्पतीला विशेष स्थान आहे. ही वनस्पती थीएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सायनेन्सिस आहे. या वनस्पतीच्या पानांपासून जे पेय तयार करतात त्याला देखील चहा म्हणतात. या पेयाला विशिष्ट चव व गंध असून तरतरी आणण्यासाठी त्याचे सेवन केले जाते. ३,००० वर्षांपूर्वी चीनमध्ये चहाचे सेवन केले असल्याचा उल्लेख आहे. ईशान्य भारत, उत्तर म्यानमार, नैऋत्य चीन व तिबेट हे प्रदेश चहाचे मूळ उत्पत्तिस्थान आहे. येथून जगातील सु. ५२ देशांत या वनस्पतीचा प्रसार झाला. चीन, जपान, भारत, बांगला देश, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान इ. देशांत चहाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भारतात १८४० सालापासून हिमालयाचा पायथा, आसाम व दक्षिण भारतात चिनी तसेच देशी चहाच्या झाडांची लागवड केली जात आहे.

चहा ही वनस्पती १०‒१७ मी. पर्यंत वाढू शकते; परंतु छाटणी करून तिची उंची ०.७-१.७ मी. पर्यंत राखतात. त्यामुळे ही झुडपाच्या स्वरूपात दिसते. या झुडपाला पुष्कळ फांद्या असतात. पाने साधी, जाड व एकाआड एक असून भाल्यासारखी, दंतुर काठांची व चकचकीत असतात. कोवळी पाने लवदार असतात. फुले पांढरी व सुवासिक असून पानांच्या बेचक्यात, एकेकटी किंवा दोन ते चारांच्या झुपक्याने येतात. बोंड (फळ) कठीण असून त्यात १-३ बिया असतात.

चहा वनस्पतीच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून चहा हे पेय तयार करतात. चहाची पाने हाताने खुडली जातात. पाने खुडताना शेंड्याकडील अडीच पाने खुडतात. या पानांपासून होणारा चहा सर्वोत्कृष्ट असतो. पानांवर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेनुसार चहाचे ब्लॅक टी, उलाँग टी, ग्रीन टी आणि व्हाइट टी असे प्रकार पडतात. पाश्चिमात्य देशांत ब्लॅक टी तयार करण्यासाठी चहाच्या भुकटीवर उकळते पाणी (तापमान ९५-९९ से.) ओतून चहा तयार करतात. या चहाचा स्वाद तीव्र असतो. भारतात ब्लॅक टी तयार करताना चहाची भुकटी पाण्यात टाकून ३-४ मिनिटे उकळतात. आसाम टी, नेपाळ टी, दार्जिलिंग टी, निलगिरी टी हे ब्लॅक टी तयार करण्यासाठी वापरतात. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याचे तापमान ८०-८५ से. ठेवतात. ब्लॅक टीच्या तुलनेने या चहाचा स्वाद सौम्य असतो. आफ्रिकेतील देशांत ग्रीन टी सेवन करतात. उलाँग टी करण्यासाठी चहाची पाने ८२-८५ से. तापमान असलेल्या गरम पाण्यात ३-४ मिनिटे ठेवतात आणि ती काढून घेतात. वापरलेली पाने पुन्हा ४-५ वेळा

चहाचा मळा

वापरून उलाँग टी तयार करता येतो. २-३ वेळा वापरलेल्या पानांपासून तयार केलेल्या चहाचा स्वाद अधिक चांगला असतो. व्हाइट टी केवळ चीनमध्ये मिळतो. चहाची कोवळी पाने खुडून व ती सुकवून व्हाइट टी तयार करतात. याखेरीज पानांच्या आकारानुसार चहाचे वर्गीकरण करतात : (१) आसाम चहा (मोठी पाने), (२) चिनी चहा (लहान पाने) आणि (३) कंबोड चहा (मध्यम आकाराची पाने). जगभर चीनमधील लहान पानांचा चहा आणि आसाममधील मोठ्या पानांच्या चहापासून मिळविलेली भुकटी यांचा वापर सर्वाधिक केला जातो.चहाव्यतिरिक्त इतर वनस्पतींची पाने, फुले वा फळे यांच्या अर्कापासून हर्बल टी बनवितात. मात्र हर्बल टी हा चहाचा प्रकार नाही.

चहा हे जगातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. शीण व थकवा घालविण्यासाठी लोक आवर्जून चहा पितात. या पेयात कोणतेही प्रथिन, मेद किंवा कर्बोदक नसते. मात्र चहात कॅफीन, कॅटेचीन आणि थिएनीन ही रसायने असतात. यांपैकी कॅफीन उत्तेजक आहे. कॅटेचीन प्रतिऑक्सिडीकारक आहे. सजीवांच्या पेशीत चयापचय क्रियेमध्ये तयार होणाऱ्या ऑक्सिजन मूलकांद्वारे होणाऱ्या ऑक्सिडीकरणामुळे पेशींना इजा होत असते. प्रतिऑक्सिडीकारकामुळे या हानीकारक गोष्टींना आळा बसतो. चहाची पाने कडू, स्तंभक, रुचिवर्धक, पाचक आणि मूत्रल आहेत.

जगातील सर्व थरांतील लोकांच्या दैनंदिन आहारात व आदरातिथ्यात चहाला मानाचे स्थान आहे. बऱ्याच देशांमध्ये चहा कोरा पिण्याची पद्धत आहे. मात्र काही ठिकाणी चहात वेगवेगळे पदार्थ मिसळतात. मंगोलिया व तिबेट या प्रदेशांत कॅलरीज वाढविण्यासाठी चहात याकच्या दुधापासून तयार केलेले लोणी मिसळतात. भारतात बरेचजण कोऱ्या चहात दूध मिसळतात, तर काही जण लिंबाचा रस मिसळतात. मसाला चहा तयार करण्यासाठी बाजारात उपलब्ध होणारा चहाचा मसाला वापरतात.

जगभर चहा निर्यात करणाऱ्या देशांत चीन पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहाच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होते.