निसर्गातील घटकांद्वारे आजार बरा करण्याच्या पद्धतीला निसर्गोपचार किंवा निसर्गोपचार पद्धती म्हणतात. निसर्गाशी सुसंवादी व निसर्गानुकूल, औषधविरहित उपचार पद्धती अशीही निसर्गोपचाराची व्याख्या करतात. निसर्गोपचार पद्धती ही एक पर्यायी उपचार पद्धती आहे. प्रत्येक व्यक्तीला झालेल्या किंवा होणाऱ्या आजारावरील उपचार शरीरांतर्गत असून, त्या व्यक्तीच्या शरीरात निसर्गत: आजार वा रोग बरा करण्याची क्षमता तसेच रोगप्रतिकारकशक्ती असते. त्यामुळेच झालेला आजार वा रोग निसर्गत: बरा करणे आणि आरोग्य कायम राखणे त्या व्यक्तीला शक्य असते, असे या उपचार पद्धतीमागील तत्त्व आहे.

निसर्गोपचार ही एक पारंपरिक उपचार पद्धती असून ती शरीराला कमीत कमी त्रास देऊन अवलंबिली जाते. या पद्धतीत कमीत कमी शल्यक्रिया आणि औषधांचा उपयोग केला जातो. ताण नियंत्रण, आरोग्यदायी आहाराचे योग्य नियमन, मानसिक संतुलन आणि पंचमहाभूतांचा ‘योग्य’ वापर यांचा अवलंब करतात. यामुळे रोग होणे मुळातच टाळता येईल आणि रोग झालाच तर अंतर्गत ‘चैतन्य’ तो पूर्ण बरा करेल, अशी या उपचार पद्धतीची धारणा असते. आजार पूर्णपणे बरा नाही झाला तर माती, पाणी, सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांच्या मदतीने उपचार करून रोगाची तीव्रता कमी करता येते.

निसर्गोपचार पद्धतीत खालील प्रमाणे सहा मूलतत्त्वे आहेत. निसर्गोपचाराचे उपाय करणाऱ्यांनी ही तत्त्वे पाळावयाची असतात.

(१) रुग्णाला कोणतीही इजा होणार नाही याची खबरदारी घेऊन त्याच्यावर उपचार केले जावेत. (२) व्यक्तीच्या शरीरातील अंगभूत प्रतिकारक्षमता ओळखून त्याच्या अंगी असलेल्या आजार बरा करणाऱ्या शक्तीचा आदर करावा आणि स्वत:हून आजार बरा करण्याचे चैतन्य त्याच्यात निर्माण करावे. (३) आजारामागील कारणे ओळखावीत आणि त्यांचे निराकरण करावे. दिसणारी लक्षणे दाबू नयेत किंवा दुर्लक्षित करू नयेत. (४) स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शिक्षित करावे. त्याला निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच स्वत:च्या शारीरिक क्षमतेबद्दलची जबाबदारी स्वत:ची आहे हे पटवून द्यावे. (५) उपचार करताना प्रत्येक व्यक्तीच्या सवयी, आहार व अनारोग्य यांचा विचार करून उपचार करावा. (६) प्रत्येक व्यक्तीने आपल्या अवतीभवतीचे लोक आणि समाज यांना आरोग्याचे महत्त्व सांगावे. तसेच आजार कसा टाळावा व स्वास्थ्य कसे राखावे, हेही सांगावे.