कॅनडास्थित लॅब्रॅडॉर समुद्र आणि हडसन उपसागर यांना जोडणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस हडसन उपसागर, पूर्वेस लॅब्रॅडॉर समुद्र, दक्षिणेस कॅनडाचा क्वीबेक प्रांत, तर उत्तरेस बॅफिन बेट आहे. लॅब्रॅडॉर समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा फाटा असून हडसन उपसागर हा तेथील अंतर्गत सागरी भाग आहे. या सामुद्रधुनीची लांबी ८०० कि.मी., रुंदी ६५ ते २४० कि.मी. आणि कमाल खोली ९४२ मी. आहे. हडसन सामुद्रधुनीच्या लॅब्रॅडॉर सागरास मिळणाऱ्या पूर्व टोकाशी रेझल्यूशन आणि एद्जेल ही बेटे आहेत, तर फॉक्स द्रोणी आणि हडसन उपसागरास मिळणाऱ्या पश्चिम टोकाशी सॅल्झबरी आणि नॉटिंगहॅम ही बेटे आहेत.

समशीतोष्ण आणि शीत कटिबंधांच्या सीमारेषेवर असणारी ही सामुद्रधुनी हिवाळ्यात साधारण ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांमध्ये गोठलेली असते. जागतिक हवामान बदलांच्या परिणामस्वरूप सामुद्रधुनीचा गोठणकालावधी कमी होत असल्याचे आधुनिक संशोधनाद्वारे लक्षात येऊ लागले आहे. या प्रदेशातील धृवीय अस्वले आणि इतर प्राण्यांच्या जीवनावरही जागतिक हवामान बदलांचा खोलवर परिणाम होत आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर, साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत, येथील बर्फ पूर्णतः वितळून जातो. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस आणि शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळातच ही सामुद्रधुनी जलवाहतूक करण्यायोग्य बनते; मात्र आजच्या आधुनिक काळात बर्फभेदक (बर्फफोडी) जहाजांमुळे येथील जलवाहतूक आणि व्यापार वर्षभर सुरू असते.

अटलांटिक महासागरातून आर्क्टिक महासागरामार्गे पॅसिफिक महासागराकडे पोहोचता येईल का, याचा शोध घेत असताना १५७८ मध्ये सर मार्टिन फ्रोबिशर या ब्रिटीश मार्गनिर्देशकांनी हडसन सामुद्रधुनीच्या प्रवेशद्वाराचा शोध लावला. येथूनच नॉर्थवेस्ट पॅसेजचा मार्ग सापडू शकेल, असे त्यांना वाटले; परंतु हा मार्ग चुकीचा आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी या सामुद्रधुनीस ‘चुकलेली सामुद्रधुनी’ (Mistaken Strait) असे नाव दिले. जॉर्ज वेमाउथ या युरोपियन खलाशाने १६०२ मध्ये या सामुद्रधुनीतून प्रवास केला. वेमाउथ यांनी वापरलेल्या ‘डिस्कव्हरी’नामक जहाजातूनच ब्रिटीश समन्वेषक हेन्री हडसन (Henry Hudson) यांनी १६१० मध्ये या सामुद्रधुनीचे समन्वेषण केले. १६१६ मध्ये टॉमस बटन आणि विल्यम बॅफिन यांनी या सामुद्रधुनीचे सविस्तर नकाशे बनविण्यासाठी यशस्वी मोहीम केली आणि त्यायोगे सतराव्या शतकातील खलाशांना हडसन सामुद्रधुनीची माहिती प्राप्त झाली. यामुळे या प्रदेशातील फरच्या व्यापारास चालना मिळाली. ‘हडसन बे कंपनी’सारख्या खलाशी कंपन्यांसाठी हा अंत्यत महत्त्वाचा व्यापारी मार्ग बनला. हडसन सामुद्रधुनीमुळे मॅनिटोबासारखी हडसन उपसागरावरील बंदरे अटलांटिक महासागराशी जोडली गेली आणि तेथील प्रादेशिक व्यापाराला तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली.

समीक्षक – वसंत चौधरी

प्रतिक्रिया व्यक्त करा