खैरे ,विश्वनाथ : (२९ मार्च १९३०).  लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) प्रतिभावंत अभ्यासक . जन्म पुणे जिल्ह्यातील, भिमथडी तालुक्यातल्या सुपे या गावात, एका शेतकरी कुटुंबात झाला. प्रामाथिक शिक्षण सुपे व दौंड या गावांमध्ये झाले. पुणे येथील भावे स्कूलमधून १९४६ साली मुंबई विद्यापीठात चौथा क्रमांक मिळवून ते मॅट्रिक झाले.

विश्वनाथ खैरे

त्यानंतर पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९५१ साली त्यांनी बी.ई. (सिव्हिल) ही पदवी पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. त्यानंतर १९५४ साली ते केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागात प्रथम वर्ग अभियंता म्हणून रुजू झाले. आपल्या तीस वर्षाच्या स्थापत्याच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडल्या. त्यामध्ये काश्र्मिरमधील बनिहाल खिंडीतला जवाहर बोगदा आणि भारत-नेपाळ सीमेवरचा सिद्धार्थ राजमार्ग यांचा समावेश होतो. केंद्रीय आयकर विभागासाठी मालमत्तांचे मूल्यनिर्धारण या विभागाचे मुख्य अभियंता म्हणून १९७६ साली त्यांची चैन्नई  येथे नियुक्ती झाली. तसेच आफ्रिकेतल्या येमेन या देशात प्रतिनियुक्तीवर असतानाही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. खैरे यांचा विवाह १९६० साली झाला. त्यांच्या पत्नी उमादेवी (जन्म २ ऑगस्ट १९३६) ह्यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (तत्त्वज्ञान) ही पदवी संपादन केलेली असून या जोडप्याला तीन मुली आहेत.

खैरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे बालपणापासूनच ते भाषाप्रेमी होते. लहानपणी त्यांच्या मनावर मराठमोळ्या ग्रामीण कृषक भाषेचा संस्कार झाला. विद्यार्थीदशेत ते संस्कृत शिकले आणि त्यात त्यांनी इतके प्राविण्य मिळवले की ते संस्कृत बोलू-लिहू तर शकतातच शिवाय काव्यनिर्मितीही करू शकतात. महाविद्यालयीन काळात त्यांनी इंग्रजी व जर्मन या भाषांचा अभ्यास केला. नेपाळच्या सान्निध्यात ते नेपाळी शिकले. तमिळनाडूमध्ये नोकरीवर असताना ते तमिळ भाषेत पारंगत झाले तर येमेन देशात असताना अरेबिक भाषा त्यांनी शिकून घेतली. अशा प्रकारे भाषाकोविद असल्याने भाषेच्या मूळ स्वरूपाविषयीची त्यांची समज तर पक्की झालीच शिवाय भाषांमधला परस्पर संबंध काय असतो या संदर्भातही नवी जाण निर्माण झाली.

खैरे यांचे भाषाविषयक प्रमुख योगदान म्हणजे मराठी व तमिळ भाषा या एकमेकींशी जोडलेल्या आहेत असे मानीव (हायपोथेसिस) त्यांनी मांडले आणि आपल्या द्रविड महाराष्ट्र (१९७७), अडगुलंमडगुलं (२००१) आणि मराठी भाषेचे मूळ (२००२) या पुस्तकांतून त्याची सिद्धता केली. मराठीचे मूळ तमिळमध्ये आहे किंवा पूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये तमिळ प्रचलित होती या प्रतिपादनाचे मह्त्व अनेक अंगांनी आहे. संस्कृत ही उत्तर हिंदुस्थानी भाषांची जननी असून तीमधून मराठीसारख्या भाषा निघाल्या अशी पारंपरिक भाषाशास्त्रज्ञांची मांडणी होती. त्यांनी दक्षिण भारतीय भाषांचे वेगळे भाषाकूळ मानून त्या भाषा आणि पर्यायाने ते जनसमूह हे उत्तर हिंदुस्थानी भाषा आणि लोकसमूहांपेक्षा वेगळे आहेत असे प्रतिपादन केलेले होते. खैरे यांचे मत असे आहे की संस्कृत व तमिळ या पूर्णपणे भिन्न कुळांतल्या भाषा आहेत असे मानण्याऐवजी भारतातल्या लोकजीवनातूनच त्या निर्माण झाल्या आहेत असे मानणे योग्य होईल. संस्कृतपासून अपभ्रंश होऊन स्थानिक भाषा निघालेल्या नाहीत तर त्या भाषांपासून उदभ्रंश होऊन म्हणजे त्यांच्यावर संस्कार करून पूजाविधींसाठी, देवधर्मासाठी संस्कृत तयार झाली. देवांशी बोलायची भाषा सामान्य जनांपासून गुप्त राहिली पाहिजे म्हणून देवांच्या पुरोहितांनी ती आपल्यापाशीच ठेवली. याचा अर्थ ती परकीय किंवा दक्षिण भारताशी संबंध नसलेली होती; असा होत नाही. खैरे यांनी तमिळ व मराठी यांचा तौलनिक अभ्यास करून मराठी व तमिळ या परस्परविरुद्ध कुळांतील भाषा नसून त्यांच्यामध्ये ऐतिहासिक जोडलेपण आहे हे सिद्ध केले आहे. त्यातूनच ‘संस्कृत-मराठी-तमिळ’ असा एक ‘संमत’ मार्ग किंवा वैचारिक दृष्टिकोण कल्पिलेला आहे आणि त्या माध्यमातून भाषांची आणि ती बोलणाऱ्या जनसमूहांची परस्पर जोडणी कशी असते याचे अभिनव दिग्दर्शन केलेले आहे. या प्रतिपादनातून भारतीय जनसमूहांमधली एकात्मता जशी सिद्ध होते तसेच संस्कृत बोलणारे लोक आणि तमिळ-तेलगू बोलणारे लोक कुणी वेगवेगळे नाहीत हेही लक्षात येते. अशा रीतीने भारतातल्या भाषाविषयक संशोधनाचा सगळा मोहरा खैरे यांनी  ‘‘संस्कृतकडून लोकभाषांकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, उच्चवर्गाकडून बहुजनवर्गाकडे आणि मुख्य म्हणजे संकुचितपणाकडून मोकळेपणाकडे फिरवला आहे’’ .खैरे यांच्या विचारदर्शनाची उत्तम ओळख स. ह. देशपांडे यांनी विश्र्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या या पुस्तकाद्वारे करून दिलेली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘‘(खैरे) जे काय म्हणत आहेत ते सर्वस्वी नवीन आहे. त्यामागे कणखर युक्तिवाद आहे आणि आपल्या म्हणण्याला बळकटी देणारे पुराव्यांचे डोंगर ते उभे करतात. त्यांचा संबद्ध विद्याशाखांचा प्रचंड अभ्यास आहे, त्यांची बुद्धी चपल आहे आणि त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप मोठी आहे.’’ .

या सोबतच खैरे यांनी मिथ्यविचारालाही आपले योगदान दिलेले आहे. आपल्या ‘भारतीय मिथ्यांचा मागोवा’ या ग्रंथामध्ये त्यांनी ‘मिथ्यकथा’ आणि ‘मिथ्य’ या दोन वेगळ्या संकल्पना मानलेल्या आहेत. विश्र्वातील ‘‘गोचराचे शब्दरूप त्याच्या उपमानाने केले तर मिथ्य जन्माला येते. मिथ्याचे विशेष कथारूपात आले की मिथ्यकथा’’ असे त्यांचे प्रतिपादन आहे. ‘वेद हे आद्य भारतीय लोकसाहित्य आहे’ असे मत मांडून त्यांनी वेदसूक्तांवर मराठी भाषेत गाणी रचलेली आहेत आणि हे पुस्तक ‘वेदांच्या आधी गाणी गाणाऱ्या बाया-बापयांना’ अर्पण केलेले आहे. महाभारतातील एकलव्याच्या कथेचा नवा अन्वयार्थ मांडणारे त्यांचे ‘एकलव्य’ हे नाटक ‘‘विद्रोहाचे अध्यात्म सांगते’’ या शब्दांत समीक्षकांनी  गौरवलेले आहे. त्यांच्या ‘वंशाचा व्यास’ या नाटकात ‘‘वंश एकच आहे – तो माणसाचा. त्यात बरावाईट, लहानमोठा कुणी नाही. वंशानं नाही मोठा होत कुणी; धर्मानं वागतो तो मोठा’’ हा संदेश दिलेला आहे .

खैऱ्यांनी ऐतिहासिक भाषाशास्त्रात जसे काम केलेले आहे त्याच प्रमाणे प्रचलित मराठी भाषा आणि तिचे लेखन याचाही विचार केलेला आहे. त्यांच्या अभ्यासात ग्रामीण भाषा (बोली) ही केंद्रस्थानी आहे. शहरवासी लोक ग्रामीण, शेतकरी भाषेकडे तुच्छतेने बघतात व तिला अशुद्ध समजतात हे त्यांना आक्षेपार्ह वाटते. भाषेच्या बाबतीत शुद्धाशुद्धतेचा विचार त्यांना गैरलागू वाटतो. आपल्या भाषेत अनावश्यक संस्कृत शब्द टाळण्याकडे त्यांचा कटाक्ष राहिलेला आहे. मात्र आधुनिक युगाला उपयुक्त होतील अशी इंग्रजी बाळगाण्यांवर आधारलेली इमराठी गाणी त्यांनी रचलेली आहेत आणि त्यातून संस्कृती संगम साधण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे.

खैरे यांनी ग्रंथ, पुस्तिका, नियतकालिकातील व वर्तमानपत्रांतील लेख, प्रकाशित निबंध, परिषदांमध्ये वाचलेले निबंध असे विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केलेले आहे. त्यांचे अप्रकाशित साहित्यही मोठ्या प्रमाणावर आहे. स. ह. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे खैरे यांच्या मर्मदृष्टीत भारताच्या सांस्कृतिक इतिहासाविषयीच्या एका क्रांतीचं बीज आहे. भारताची संस्कृती ही परदेशी लोक, त्यांचं आक्रमण, स्थानिकांशी संघर्ष यातून निर्माण न होता भारतातल्याच अनेक लोकसमूहांच्या परस्पर विनिमयातून, देवघेवीतून, सहकार्यानं (आणि कधी आपसात संघर्ष होऊनही) निर्माण झाली असे खैरे यांच्या प्रतिपादनातून समजणे योग्य होईल.

बोकील यांनी दाखवल्याप्रमाणे खैरे यांच्या विचाराचं क्रांतिकारकत्व तीन कारणांमुळे आहे. पहिले म्हणजे ‘भाषा ही अडाण्याचीच’ असे खैरे ठासून सांगताहेत. भाषेच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यायचा असेल तर ग्रामीण आणि तथाकथित अडाणी किंवा अशिक्षित लोकांकडेच बघायला पाहिजे असे त्यांचे मत आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे खैरे यांचा विचार हा कृषिकेंद्री आहे. अन्न पिकवणारी जी संस्कृती तीच भाषा पिकवणारी पहिली संस्कृती असते हे त्यांचे प्रतिपादन फार महत्त्वाचे आहे. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे खैरे यांचा विचार स्त्रीकेंद्री आहे. ते ज्या लोकभाषांना आणि लोकसंस्कृतीला महत्त्व देतात ती स्त्रियांनी जपलेली आहे. खैरे यांचा लोकभाषांचा आग्रह हा अशा प्रकारे स्त्रीवादाचा आग्रह आहे. भारतीय स्त्रीवादाची उभारणी करायला जसा तो उपयुक्त आहे तसाच भारतीय विद्याशास्त्राला स्त्रीवादाचे भान आणून द्यायलाही उपयुक्त आहे.

खैरे यांच्या कार्याचे श्रेय जाणून साहित्य अकादमीने त्यांना २००८ सालचा ‘भाषा सन्मान’ पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळालेले आहेत.

संदर्भ :

  • देशपांडे, स.ह. २००५. विश्र्वनाथ खैरे यांचा संमतविचार आणि नवी भारतविद्या. मौज प्रकाशन, मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा