मिराशी, वासुदेव विष्णु : (१३ मार्च १८९३ – ३ एप्रिल १९८५).

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ज्ञ. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कुवळे (सध्या जि. सिंधुदुर्ग) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात विष्णु व राधाबाई या दाम्पत्यापोटी झाला. त्यांचे शिक्षण राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे, तसेच पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी मॅट्रिक (१९१०), बी. ए. (१९१४) आणि एम. ए. (१९१६) या परीक्षांत प्रथमवर्ग पटकाविला. त्यांनी सुरुवातीस मुंबईतील शासकीय एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले (१९१७–२२). या काळात त्यांनी एलएल. बी. पदवी प्राप्त केली. तसेच मुंबई विद्यापीठात ‘A Relation between the Dharmasutras and the Metrical Smritis and the Evolution of Hindu Law as seen in themʼ या शीर्षकार्थाचा प्रबंध सादर केला (१९२२).

पुढे नागपूरच्या मॉरिस कॉलेजात (१९४२–४७; विद्यमान नागपूर महाविद्यालय) व नंतर अमरावती येथील किंग एडवर्ड कॉलेज (१९४७-५०; विद्यमान विदर्भ महाविद्यालय) येथे संस्कृत या विषयाचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत काम केले. नागपूर विद्यापीठात (आताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर) त्यांनी सन्मान्य व गुणश्री प्राध्यापक म्हणून काम केले (१९५८–६६). काही काळ तेथील पदव्युत्तर मानव्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळʼ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या संस्थेचे ते कार्याध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या नियतकालिकातून प्रकाशित केले.

प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. त्यांनी वाकाटकांच्या ताम्रपटांचा आणि शिलालेखांचा मागोवा घेऊन सध्याचे रामटेक म्हणजेच मेघदूतातील रामगिरी होय, असा सिद्धांत मांडला (१९३४). हा सिद्धांत त्यांनी मेघदूतातील रामगिरी अर्थात रामटेक या नावाने प्रकाशित केला (१९५८). खुद्द रामटेकला रामगिरीस्वामींचा उल्लेख असलेला वाकाटक राणी प्रभावती गुप्ता हिचा शिलालेख एका वाकाटककालीन मंदिरात १९८०च्या दशकात सापडला, तो या सिद्धांताला पूरक ठरला. त्याचप्रमाणे अजिंठ्याच्या लेणे क्रमांक १६ येथील वाकाटक लेखाचे वाचन करून नंदिवर्धन (विद्यमान रामटेकजवळील नगरधन) व वत्सगुल्म (विद्यमान वाशिम जिल्ह्याचे ठिकाण) या ठिकाणी वाकाटक राजवंशाच्या दोन शाखा होत्या, हे सिद्ध करून त्यांनी वाकाटक वंशावळ निश्चित केली. अजिंठ्याच्या लेखातील ‘सुवीथिʼ या शब्दाचे योग्य वाचन करून अजिंठ्याच्या लेणी क्रमांक १६, १७, १९ व २१ मधील भित्तिचित्रे वाकाटकांच्या कारकिर्दीत काढली गेली, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रदीर्घ व सखोल संशोधनाचा गुणगौरव ‘वाकाटकांच्या इतिहासाचे अधिकारीʼ अशा शब्दांत केलेला आढळतो.

शिलालेख व ताम्रपट यांच्या अचूक वाचनाबरोबरच नाणकशास्त्रातही त्यांनी अजोड कामगिरी केली. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील तऱ्हाळा येथे सातवाहनकालीन नाणेनिधी सापडला; त्याचा सखोल अभ्यास करून पुराणांत तसेच इतर प्राचीन साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. यातून सातवाहन नाण्यांच्या अभ्यासकांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ठेवला. भारतीय नाणकशास्त्रातील पुराव्याला वाङ्मयीन पुराव्याची जोडही त्यांनी दिली. संस्कृत साहित्यातील त्यांचे विशेष योगदान त्यांच्या कालिदास (१९३४), भवभूती (१९६८), हर्षचरितसार आणि लघुकौमुदी या पुस्तकांतून दिसून होते. याशिवाय त्यांनी संशोधन मुक्तावलिमधून अनेक संशोधनात्मक लेख लिहिले (सर १-९ : १९५४–५९, मराठी).

कॉर्पस् इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम् या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होत. या नियतकालिकेतील परंपरेतूनच त्यांनी कलचुरी नृपति आणि त्यांचा काल (१९५६), वाकाटक नृपति आणि त्यांचा काल (१९५७), शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख (१९७४), सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख (१९७९) इत्यादी प्राचीन राजवंशांवरील ग्रंथ लिहिले.

मिराशींनी प्रामुख्याने इंग्रजीतून लेखन केले; तथापि प्रारंभीचे त्यांचे ग्रंथलेखन मराठीत आहे. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांपैकी इन्स्क्रिप्शन्स ऑफ द कलचुरी चेदी-इरा (१९५५), इन्स्क्रिप्शन्स ऑफ द वाकाटकज (१९६३), स्टडीज इन इंडॉलॉजी (खंड १ ते ४; १९६०, १९६२-६६), कालिदास, हिज लाईफ अँड वर्क्स (१९६९), भवभूती, हिज डेट, लाईफ अँड वर्क्स (१९७२), इन्स्क्रिप्शन्स ऑफ द शिलाहारज (१९७४), लिटररी अँड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडॉलॉजी (१९७५) इत्यादी प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांचे सुमारे ३८ ग्रंथ आणि चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांच्या मान्यवर ग्रंथांची प्रादेशिक भाषांतून – विशेषत: हिंदी, ओडिया, कन्नड – भाषांतरे झाली आहेत.

मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. तसेच सागर, नागपूर, मुंबई व वाराणसी या विद्यापीठांची सन्माननीय डी. लिट्. पदवी; तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्यायʼ ही उपाधी (१९४१); १९५६ मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते व १९६१ मध्ये राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या हस्ते ताम्रपट; भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९७५) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.

नागपूर येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  •  Deshpande, G. T. & Others, Ed. Dr. Mirashi Felicitation Volume, Nagpur, 1965.
  •  Deo, S. B., ‘Obituary Notices : MM. Professor Vasudeo Vishnu Mirashi,ʼ  Annals of Bhandarkar Oriental Research Institute, Pune, 1985.
  • गोखले, शोभना, ‘श्रेष्ठ संशोधकाचा अस्त,ʼ दै. केसरी, पुणे, १९८५.
  • डोळके, राजेंद्र, संपा. भावे, श्री. मा. ‘म. म. डॉ. वा. वि. ऊर्फ नानासाहेब मिराशीʼ नवभारत, वाई, नोव्हेंबर-२०१७.
  • पंचधारा (मिराशी विशेषांक), महाराष्ट्र साहित्य परिषद, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, १९८५.

समीक्षक – अंबरीश खरे

प्रतिक्रिया व्यक्त करा