पश्चिम आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय मोठा वांशिक समूह. त्यांची वस्ती प्रामुख्याने उत्तर नायजेरिया आणि दक्षिण नायजर या प्रदेशांत आढळते. यांशिवाय सूदान भागात तसेच आजूबाजूच्या देशांत (विशेषतः लिबिया, लागोस) ते अल्पसंख्याक आहेत. पश्चिम आफ्रिका आणि सहारा वाळवंटापासून हजच्या पारंपरिक मार्गावर हौसा समूह विखुरलेला आहे. राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या हा समाज पुढारलेला असून बहुतेक लोक इस्लाम धर्मीय आहेत. हौसा लोकांची वस्ती प्रामुख्याने खेड्यांत आहे; मात्र काही हौसा शहरांतही राहतात. ते ‘हौसा’ ही भाषा बोलतात. २०११ मध्ये त्यांची लोकसंख्या सुमारे ७०,००,००० होती.
उत्तर नायजेरियातील कॅनो परिसर हा हौसांच्या संस्कृतीचे मूळ स्थान होय. बाराव्या शतकात हौसा लोकांची आफ्रिकेमध्ये मोठी सत्ता होती. एक भाषा, रूढी, चालीरीती यांमधील साम्यांमुळे त्यांच्यात वांशिक एकात्मता आढळते. एका दंतकथेनुसार बयाजीद नावाचा एक पुरुष बगदाद या आपल्या मूळ गावातून पळून जाऊन उत्तरेकडील एका लहान नगरात पोहोचला. तेथे त्याने स्थानिक लोकांत दहशत निर्माण करणाऱ्या सापाचा नाश केला आणि तेथील राणीशी विवाह केला. त्यांच्या बाओ या मुलास सहा मुलगे झाले. त्यांनी गोबीर, कास्तिना, कानो, अरिया, बिराम व राणो ही सहा नगरराज्ये स्थापिली; हौसांची विश्वसनीय माहिती कानो बखरीवरून होते. कानोचा पहिला राजा बागौदा हा बयाजीदचा नातू होय. तो इ. स. ९९९ मध्ये गादीवर होता. सुरुवातीला हे राजे कुठल्याही विशिष्ट धर्माचे नव्हते; परंतु चौदाव्या शतकात माली राज्यातून काही मुसलमान धर्म प्रसारकांचे एक शिष्टमंडळ नगरात आले. त्यानंतर तेथे इस्लाम धर्म प्रस्थापित झाला. आफ्रिकेतील साँघहाय साम्राज्याचा १५९१ मध्ये विनाश झाल्यानंतर तेथील सहारा वाळवंटातून होणारा व्यापार या नगरराज्यांकडे वळला आणि कात्सिना व कानो या राज्यांची भरभराट झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ‘फुलानी’ या पशुपालक जमातीने इस्मान-दान फोदिओ याच्या नेतृत्वाखाली हौसांच्या नगरराज्यांचा पवित्र युद्धाद्वारे (जिहाद) पराभव करून त्यांचे साम्राज्य स्थापिले. त्याची राजधानी ‘सोकतो’ येथे होती.
खेड्यांमधील हौसा लोक आजही दगड-मातीच्या घुमटाकार, गवताचे छत असलेल्या पारंपारिक घरांमध्ये राहतात. ते मांसाहारी असून हौसा भाषेत अन्नाला ‘तुवो’ म्हणतात. त्यांच्या मुख्य व्यवसाय शेती आणि मजुरी आहे. ते शेतातून ज्वारी, बाजरी, मका, कापूस इत्यादींचे उत्पादन घेतात. याशिवाय त्यांच्यात सूतकताई, विणकाम, कापडाचे रंगकाम, चामड्यावरील काम, चांदीच्या कलाकृती आणि निळीचा व्यापार हे व्यवसाय पारंपरिक पद्धतीने त्यांच्यामध्ये रूढ आहेत. हौसांनी तयार केलेल्या चामडी वस्तू प्रसिद्ध असून बाजारपेठांमध्ये पर्यटकांकडून त्यांस मोठ्या प्रमाणात मागणी असते.
हौसा ही त्यांची भाषा हॅमिटिक-सेमिटिक भाषासमूहातील असून इस्लामिक प्रभावामुळे तीमध्ये अनेक अरबी शब्द प्रविष्ट झाले आहेत. उत्तर नायजेरियाची ती लोकभाषा असून शासनाची तिला अधिकृत मान्यता आहे. अनेक फुलानींची ती मातृभाषा आहे. अरबी वर्णाक्षरांच्या नियमानुसार तिचे लेखन केले जाते. तिच्यात विपुल गद्य-पद्य वाङ्मय उपलब्ध आहे.
संदर्भ :
- Murdock, G. P., Africa : Its Peoples and Their Culture History, London, 1959.
समीक्षक – संतोष गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.