जगभर सर्वत्र आढळणारी बहुपयोगी, सदाहरित व प्रसर्पी (सरपटत वाढणारी) वेल. गारवेल ही बहुवर्षायू वनस्पती कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव आयापोमिया पामेटा आहे. बागेत कुंपणावर व कमानीवर, गावांमध्ये आणि विशेषकरून बहुतेक रेल्वे स्थानकांच्या इमारतींवर व आसपास ही वनस्पती लावलेली आढळते. या वनस्पतीचे शेकडो प्रकार उष्ण कटिबंधात पहावयास मिळतात.
गारवेलीचे खोड लहान असून सालीवर सूक्ष्म छिद्रे असतात. पाने लहान व हस्ताकृती असून वेगवेगळ्या आकाराच्या पाच ते सात खंडांत विभागलेली असतात. ती मऊ, गोल व हिरव्या खोडांवर आखूड देठांनी जोडलेली असतात. खोडांचे रूपांतर टोकाला प्रतानांमध्ये झालेले असते. फुले नरसाळ्यासारखी, मध्यम आकाराची, फिकट जांभळट, नाजूक व आकर्षक असतात. सदाफुलीप्रमाणे गारवेलीला वर्षभर फुले येतात. बोंडे लंबगोल व लहान असतात. गारवेलीचे परागण वारा, पाणी आणि माणसांद्वारे होते. तिची वाढही सहज आणि जलद घडून येते.
गारवेलीचे खोड व मुळ्या जरी कडवट असल्या तरी हवाई बेटांत ती खाण्याकरिता वापरतात. मुळ्यांत व पानांत सायनोजेन हे विषारी द्रव्य किंचित प्रमाणात असते. पानांचा रस त्वचेवर पुरळ उठल्यास लावतात. बियांमुळे जुलाब होतात. वेलीची खोडे दोरखंडाप्रमाणे वापरतात. सुपीक जमीन, भरपूर पाणी आणि भरपूर ऊन मिळाल्यास गारवेलीची चांगली वाढ होते. तथापि ती प्रतिकूल परिस्थितीतही वाढण्याइतकी काटक असते.