विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या खालील भागात असलेल्या लाळग्रंथी सुजून खूप वेदना होतात. या रोगाला लाळ पिंडशोथ असेही म्हणतात. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर जरी एकाच बाजूला सूज दिसत असली तरी बहुतांशी प्रमाणात दोन्ही बाजूंच्या ग्रंथी बाधित होतात. गालगुंड झाल्यास त्याचा संसर्ग शरीराच्या इतर भागालाही होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुसरी लाळग्रंथी, वृषण व अंडाशय, स्वादुपिंड आणि मध्यवर्ती चेतासंस्था इ. बाधित होऊ शकतात.

गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या लाळेत असलेल्या विषाणूंद्वारे या रोगाचा प्रसार होतो. बाधित व्यक्ती खोकल्यास अथवा शिंकल्यास हे विषाणू हवेत पसरतात आणि इतर (आजूबाजूच्या) व्यक्तीच्या श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतात. बाधित व्यक्तीचे उष्टे पेय किंवा अन्न सेवन केल्यास या रोगाचा प्रसार होतो. १६ ते २१ दिवसांच्या परिपाक कालानंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. सर्दी होणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही प्राथमिक लक्षणे असून ताप आल्यानंतर लाळग्रंथी बाधित होतात. प्रौढ पुरुषांमध्ये प्रथम वृषणांमध्ये दाह निर्माण होऊन त्यांना सूज येते. ज्या पुरुषांना गालगुंड होतो त्यांपैकी बहुधा २० % पुरुषांना वृषणाचा दाह होतो आणि हा दाह अतिशय वेदनादायी असतो. स्त्रियांना गालगुंड झाल्यास त्यांच्या अंडाशयांना संसर्ग होऊ शकतो. याखेरीज स्त्रियांमध्ये खूप ताप येणे, सर्दी होणे आणि कंबर दुखणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. विषाणूंचा संसर्ग मध्यवर्ती चेतासंस्थेला झाल्यास मस्तिष्कावरण शोथ होऊ शकतो. स्वादुपिंड बाधित होण्याची शक्यता १० % हून कमी असते. गालगुंड हा रोग जरी गोवराहून सौम्य असला व त्याने मृत्यू येत नसला, तरी हा संसर्गजन्य रोग आहे. दाट वस्ती असलेल्या भागात हा रोग सहज पसरू शकतो. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा रोग होत असला तरी ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा रोग होण्याचे प्रमाण अधिक असते.

एकदा गालगुंड झाल्यानंतर शरीरात निर्माण झालेली प्रतिकार शक्ती कायम राहिल्याने पुन्हा तो होत नाही. लशीकरणामुळेही अशी प्रतिकारशक्ती निर्माण होते. बालकांना १५ व्या महिन्यात व पाचव्या वर्षी गोवर, गालगुंड आणि वारफोड्या यांची एकत्रित लस (एम्. एम्. आर्) दिली जाते. गालगुंडावर कोणेतेही खास औषध नाही. पूर्णपणे विश्रांती आणि वेदनांपासून सुटका यांमुळे  आराम मिळतो. तरीही दोन-तीन आठवडे या रोगाचा प्रभाव टिकून राहतो.