अॅक्सिपिट्रिडी या कुलातील पक्षी. अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे जगात सर्वत्र आढळतात. यांच्या पाच-सहा जाती भारतात आढळतात. काळे गिधाड समुद्रसपाटीपासून १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी. उंचीपर्यंत आढळते.गिधाडे आकाराने पिसे काढून टाकलेल्या मोराएवढी मोठी आणि ताकदवान असतात. रंग गडद किंवा फिकट काळा, करडा व पांढरा असतो. पाय दणकट आणि चोच बाकदार व टोकदार असते. नखे आत वळलेली आणि टोकदार असतात. बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. नजर तीक्ष्ण असते. ती दिवसा आकाशात खूप उंचावर पंख न हलविता तासनतास घिरट्या घालतात.
गिधाडांची घरटी काटक्या, चिंध्या व केस अशा वस्तूंनी बनविलेली असतात. ती उंच झाडांवर अथवा खडकांच्या कपारी आणि जुन्या पडक्या इमारतीच्या तटबंदीतील कोनाडे अशा दुर्गम ठिकाणी असतात. मादी दर खेपेस एक किंवा दोन अंडी घालते. नर आणि मादी उभयता घरटे बनविण्याचे, अंडी उबविण्याचे आणि पिलांना चारा भरविण्याचे काम करतात.
काळ्या गिधाडाला गृध्रराज असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव टॉरगॉस काल्व्हस असे आहे. त्याचे डोके आणि मान शेंदरी रंगाचे असून त्या भागांवर पिसे नसतात. पाय शेंदरी असतात. मान आणि मांड्यांच्या सुरुवातीला पांढरी पिसे असतात. यांची घरटी झाडांवर असतात. मादी दर खेपेस एकच अंडे घालते. यांच्या विणीचा हंगाम डिसेंबर-एप्रिलमध्ये असतो.
बंगाली गिधाड हे गृध्रराजाएवढे मोठे असते. त्याचे शास्त्रीय नाव जिप्स बेंगॉलेन्सिस आहे. त्याचे डोके आणि मान भुरकट काळ्या रंगाचे असून त्यावर पिसे नसतात. छाती व पोट तपकिरी काळे असून शेपटीच्या बुडाला रुंद पांढरा पट्टा असतो. यांची वीण ऑक्टोबरपासून-मार्चपर्यंत चालते. मादी दर खेपेस एकच पांढरे अंडे घालते.
भारतात आसामखेरीज सगळीकडे आढळणारी गिधाडांची आणखी एक जात म्हणजे ईजिप्शियन किंवा पांढरे गिधाड. याचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन परक्नॉप्टेरस असे आहे. आकाराने हे घारीएवढे असून मळकट पांढरे असते. त्याचे डोके पीसविरहित व पिवळे असते. उड्डाणपिसे काळी असतात, पंख लांबट आणि टोकदार असतात, तर शेपूट पाचरीसारखे असते. मादी दरवेळी दोन अंडी घालते. ती पांढरी किंवा फिकट विटकरी रंगाची असून त्यांवर तांबूस किंवा काळे डाग असतात. याच्या विणीचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल असा असतो. ही गिधाडे दक्षिण यूरोप आणि आफ्रिका येथेही आढळतात.
पाळीव जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना डायक्लोफिनॅक औषध देतात. अशा जनावरांचे मांस खाऊन गिधाडे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात जनावरांसाठी डायक्लोफिनॅक या औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. गिधाडे नामशेष होत असल्याने मृत जनावरांचे मांस उंदीर, रानटी कुत्रे आणि इतर प्राणी खातात. मात्र त्यामुळे आलर्क रोगाच्या जंतूंचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.