स्तनी वर्गाच्या समखुरी (आर्टिओडॅक्टिला) गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी उपकुलात मेंढीचा समावेश होतो. तिचे शास्त्रीय नाव ओव्हिस एरिस आहे. शीप ही संज्ञा ओव्हिस प्रजातीतील अनेक जातींसाठी वापरली जाते. भारतात मात्र ओव्हिस एरिस या जातीला मेंढी म्हणतात. इ.स.पू. ९०००-८००० वर्षांपासून लोकर, मांस आणि दूध यांसाठी मेंढी माणसाळली गेली आहे. पाळीव मेंढी ही वन्य मेंढीपेक्षा रंग, आकार, दुधाचे प्रमाण, लोकरीची प्रत, लोकरीचे प्रमाण इ. लक्षणांच्या बाबतीत वेगळी असते. पाळीव मेंढीचे अनेक प्रकार असून त्यांचे वजन, उंची व लोकरीची प्रत यांमध्ये विविधता असते.

मेंढी (ओव्हिस एरिस)

पूर्ण वाढलेल्या मेंढीच्या नराचे वजन ४५–१६० किग्रॅ. व मादीचे वजन ४५–१०० किग्रॅ. असते. शेपूट आखूड असून मेंढीच्या चेहऱ्यावर, तसेच मागच्या पावलांच्या बेचक्यांत गंधग्रंथी असतात. नराला बकऱ्याप्रमाणे दाढी नसते. प्रौढ मेंढीच्या तोंडात ३२ दात असतात. वरच्या जबड्यात पटाशीचे दात नसतात. त्या ठिकाणी कूर्चांचा जाड भाग असतो. खालच्या जबड्यात पुढील बाजूस पटाशीचे आठ दात असतात. खालच्या व वरच्या जबड्यांत प्रत्येक बाजूस सहा-सहा दाढा असतात. दंतसूत्र ०/३, ०/१, ३/३, ३/३ असे लिहितात. पटाशीचे दात आणि दाढा यातील दंतावकाश मोठा असतो. मेंढीचे वय वरच्या जबड्यातील पटाशीच्या दातांनुसार ओळखता येते. वयाच्या चवथ्या वर्षापर्यंत तिचे पटाशीचे दात पडतात. हे दात पडल्यानंतर वरच्या जबड्यातील पटाशीचे दात येत नाहीत. मेंढीची ध्वनिग्रहणक्षमता उत्तम असते. शिकारी प्राण्यांचा लहानसा आवाज ऐकून ती पळण्याची दिशा ठरविते. डोळ्यांची बाहुली आडवी असते. त्यामुळे तिला विस्तृत प्रदेशातील दिसू शकते. दृष्टिविस्तार सरासरी २६० अंशांपर्यंत असतो. डोके न वळविता तिला मागचे दिसू शकते.

मेंढीची त्वचा २ मिमी. जाड असून तिच्यात रंगद्रव्ये, घर्मग्रंथी, वसाग्रंथी, रोम व लोकर उगवणारे तंतुपुटके असतात. जन्माच्या वेळी जे पुटक असतात त्यांना मूलपुटक म्हणतात. मूलपुटक तीनच्या समूहात असतात. प्रत्येक पुटकाशी एकेक वसाग्रंथी, घर्मग्रंथी व मृदू स्नायू एकमेकांना जोडून असतात. दुय्यम पुटक नंतर तयार होतात आणि त्यांना फक्त एक वसाग्रंथी जोडून असते. लोकरीचे तंतू मेंढीच्या जातींनुसार बदलतात व त्यांची संख्या प्रति चौ.सेंमी. ७५० ते ९,००० मध्ये असू शकते. लोकरीचा धागा केराटीनचा बनलेला असून व्यास १०–१७ मायक्रोमीटर असतो. एका वर्षात हे तंतू २·५ – १५ सेंमी. वाढतात. मेंढीची लोकर कापली नाही, तर ती आयुष्यभर वाढत राहते.

मेंढी पूर्णपणे शाकाहारी आहे. ती गवत, शेंगा येणाऱ्या वनस्पतींचा पाला, तसेच खुरट्या वनस्पतींची पाने खाते. मोठ्या डहाळ्या व उंच वनस्पतींचा पाला खाणे मात्र ती टाळते. ओठ आणि दात यांनी मेंढी पचण्यायोग्य भाग निवडून जबड्यात घेते. ती दिवसभर चरताना आणि रवंथ करताना दिसते. रवंथी जनावरांमध्ये सेल्युलोजचे विघटन जठरातील सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने होते (पहा: गाय). मुद्दाम लागवड केलेल्या आणि वेगवेगळ्या वनस्पती असलेल्या कुरणात मेंढ्या पाळल्या तर त्यांची वाढ लवकर होते. चौथ्या वर्षानंतर मेंढीची चरण्याची क्षमता कमीकमी होत जाते. मेंढीचा आयु:काल १०–१२ वर्षे असतो. मात्र, काही मेंढ्या २० वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत.

मेंढी हा प्राणी काहीसा बुजरा व भित्रा असून तो कळपाने वावरतो. चारपेक्षा अधिक मेंढ्या एकत्र आल्यास त्या कळप करतात. कळपात त्या म्होरक्याच्या पाठोपाठ चालत राहतात. कळपात कोकरे व माद्या मध्यभागी, तर नर कळपाच्या कडेला असतात. मेंढ्यांचे मोठे कळप पाळताना सु. २० माद्यांमागे एक नर असे प्रमाण ठेवल्यास त्यांची संख्या लवकर वाढू शकते. ज्या ठिकाणी त्यांचा कळप रात्री वस्ती करतो तेथे त्यांनी टाकलेल्या लेंड्यांमुळे जमिनीची प्रत सुधारते. कुत्रा व घोडा यांच्यामार्फत मेंढ्यांना एकत्र ठेवता येते. म्हणून मेंढ्यांचे मोठे समूह पाळणे शक्य होते. त्या मुळांपासून गवत उपटत असल्यामुळे गवत जमिनीतून उखडले जाते. त्यामुळे मेंढपाळ कुरणे बदलत राहतात. अतिवृष्टी, थंडी व संसर्गजन्य रोग यांमुळे मेंढ्या मरतात. लांडगा, बिबट्या व तरस यांसारखे प्राणी मेंढ्यांच्या कळपांवर हल्ला करतात. त्यामुळे चारा-पाण्यासाठी त्यांचे कळप सतत फिरवत ठेवले जातात.

देशी मेंढा १८–२० महिन्यांत, तर मेंढी २४ महिन्यांत वयात येते. त्यांचे प्रजनन मोसमी असते. नेहमीच्या खाण्याबरोबर पौष्टिक खुराक दिला आणि नर कळपात सोडला, तर मेंढ्या लवकर माजावर येतात. भारतात मेंढ्या माजावर येण्याचे तीन मोसम आहेत : मार्च-एप्रिल (१५–२०%), जून-जुलै (६०–८०%) आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर (सु. २५%). गर्भावधी १४२–१५२ दिवसांचा असतो. मादी एका खेपेला एकाच पिलाला जन्म देते; परंतु काही वेळा जुळी किंवा तिळी होऊ शकतात. पहिले चार-पाच महिने कोकरू मादीचे दूध पिते. त्यानंतर ते चरून अन्न मिळविते. जून-जुलै  महिन्यांत गाभण राहिलेल्या मेंढ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पिले होतात. या काळात भरपूर चारा उपलब्ध असल्याने माद्यांना दूध भरपूर येऊन कोकरांचे पोषण चांगले होते.

भारतीय मेंढ्यांपैकी काही उत्तम लोकरीसाठी, काही मांसासाठी, तर काही कातड्यासाठी व हलक्या लोकरीसाठी पाळण्यात येतात. उत्तर भारतातील हिमालयालगतच्या प्रदेशातील पूंछ, करनाह, भाकरवाल, भादरवाह आणि रामपूर-बशीर अशा प्रकारच्या मेंढ्या तलम, मऊ व लांब धाग्याच्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील मैदानी व वाळवंटी प्रदेशांत मारवाडी, कच्छी, काठेवाडी, लोही व बिकानेरी अशा जाती आढळतात. भारतातील सु. ६०% लोकरीचे उत्पादन या भागांत होते. या मेंढ्या काटक असून प्रतिकूल हवामानाला तोंड देतात. त्यांचा उपयोग गालिच्यांची लोकर, मांस आणि दूध यांसाठी होतो. दक्षिण भारतात दख्खनी, नेल्लोर, मद्रास रेड, माडग्याळ, मेंचेरी इत्यादी मेंढ्यांचे प्रकार आढळतात. महाराष्ट्रात दख्खनी व माडग्याळ प्रकारच्या मेंढ्या मोठ्या संख्येने पाळतात. उष्ण हवामान व कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात त्या पाळायला उपयुक्त असून त्यांच्यापासून मांस व लोकर यांचे उत्पादन चांगले होते. माडग्याळ मेंढ्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागांत जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच त्यांना हे नाव पडले आहे.

भारतात राजस्थान या राज्यात सेंट्रल शीप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेत मेंढ्यांवर अवलंबून असलेल्या कारागिरांना मेंढीनिर्मिती, त्यांचे आरोग्य, त्यांचा उपयोग आणि मेंढी व लोकर यांचे उत्पादन यांविषयी माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा