रस्त्याच्या कडेने शोभेसाठी व सावलीसाठी वाढविण्यात येणारा शोभिवंत वृक्ष. हा फॅबेसी कुलातील पानझडी वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डेलोनिक्स रेजिया आहे. गुलमोहर मूळचा मादागास्करमधील असून आता तो जगभर आढळतो. भारतातही तो सर्वत्र आढळतो. बागेत किंवा रस्त्याच्या कडेने दुतर्फा तो लावतात. शुष्क जागीही तो वाढतो. वेस्ट इंडीज बेटे, तैवान, हाँगकाँग व चीन या देशांतसुध्दा तो वाढतो.

गुलमोहर वृक्षाची उंची ५-१२ मी.पर्यंत असते. फांद्या पसरट असतात. पाने पिसासारखी संयुक्त व हिरवी असतात. पाने सु. ०.५ मी. लांब असून त्यावर १०-२० फिकट हिरव्या पर्णिकांच्या जोड्या असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाने गळून पडतात. साधारण मे महिन्यात नवीन पालवी फुटते. फुले मोठी असून शेंदरी रंगाची असतात. फुलाला पाच पाकळ्या असून त्या सु. ८ सेंमी. लांब वाढतात. पाचवी पाकळी इतरांपेक्षा मोठी असून त्यावर पांढरे व पिवळे डाग असतात. अशा पांढर्‍या पिवळ्या डागांचे किंवा पट्ट्यांचे प्रयोजन परागण करणार्‍या कीटकांना आकर्षित करण्याकरिता असते. वेगवेगळ्या देशांत ही फुले वेगवेगळ्या महिन्यांत येतात. भारतात एप्रिल-मे-जून दरम्यान फुले येतात. मंजिर्‍या फांद्यांच्या टोकांस उगवतात. या वृक्षाची शेंग चपटी व २०-३० सेंमी. लांब असून ५ सेंमी. रुंद असते. आत छोट्या लांबट बिया असतात.