पांढरूक हा स्टर्क्युलिएसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव स्टर्क्युलिया यूरेन्स आहे. तो मूळचा भारत, म्यानमार आणि श्रीलंका या देशांतील आहे. हा मोठा वृक्ष भारतात कोकण व उत्तर कारवार येथील समुद्रकिनाऱ्याजवळच्या खडकाळ जमिनीत, दख्खनचे पठार, ‍हिमालयाच्या पायथ्याला गंगेच्या पूर्वेस, राजस्थान, मध्य  प्रदेश, बिहार इ. प्रदेशांतील पानझडी वनांत आढळतो. कांडोळ, कराई, करू व सालढोर अशा नावांनीसुद्धा पांढरूक ओळखला जातो. त्याच्या खोडांना व फांद्यांना असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पांढऱ्या रंगामुळे तो काळोखातदेखील उठून दिसतो.

पांढरूक (स्टर्क्युलिया यूरेन्स) वृक्ष

पांढरूक हा मध्यम आकाराचा, ५–१० मी. उंच व डेरेदार वृक्ष आहे. अनुकूल परिस्थितीत तो सु. २० मी. उंच वाढतो. त्याला अनेक फांद्या व उपफांद्या असून त्या वाकड्यातिकड्या वाढलेल्या असतात. पाने साधी, मोठी, २०–४० सेंमी. लांब व एकाआड एक असतात. पानांना पाच मुख्य शिरा असून खालच्या बाजूला रेशमी लव असते. हिवाळ्यात पाने बदामी रंगाची होऊन गळून पडतात. फुलोरे हिवाळ्यात येतात. फुले लहान, ४-५ मिमी. व पिवळसर असतात. नर-फुलात १० सूक्ष्म पुंकेसर असतात. मादी-फुलात पाच जायांग सुटे असून एकाच फुलात पाच बीजांडकोश तयार होतात. त्यामुळे फलनानंतर पाच भाग असलेले वैशिष्ट्यपूर्ण फळ तयार होते. फळे लाल व केसाळ असून या केसांमुळे त्वचेची आग होते. बिया लहान, ३–६, काळ्या आणि गुळगुळीत असतात. बिया कठीण असल्यामुळे त्या रुजायला वेळ लागतो.

पांढरूक वृक्षापासून जो डिंक मिळतो त्याला गम कराया म्हणतात. तो रेचक असून बद्धकोष्ठतेच्या औषधांमध्ये त्याचा वापर होतो. तसेच काही औषधांच्या गोळ्यांमध्ये आणि मिठायांमध्ये हा डिंक वापरतात. पाने व कोवळ्या फांद्या पाण्यात वाटून मिळणारा द्रव गुरांच्या फुप्फुसरोगामध्ये लेप म्हणून लावतात. पांढरूक वृक्षाच्या लाकडाचा वापर झोपड्या बांधण्यासाठी तसेच होड्या, खेळणी, वाद्ये वगैरे तयार करण्यासाठी होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा