रेशमाच्या धाग्यांसाठी खासकरून ज्या कीटकांची वाढ केली जाते त्यांपैकी एक कीटक. संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील लेपिडोप्टेरा गणाच्या बॉम्बिसिडी कुलात रेशीम कीटकाचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव बॉम्बिक्स मोरी आहे. जगात सर्वत्र मुख्यत: या कीटकापासून रेशीम मिळत असल्याने तो आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. रेशीम कीटकाचे जीवनचक्र पूर्ण रूपांतरण प्रकारचे असून अंडी, अळी (सुरवंट), कोश आणि प्रौढ (पतंग) अशा त्याच्या वाढीच्या अवस्था असतात. यांपैकी अळी स्वसंरक्षणासाठी स्वत:भोवती जे कोशावरण तयार करून कोशावस्थेत जाते त्या कोशावरणापासून रेशीम मिळविले जाते. रेशीमनिर्मिती केंद्रात या कीटकांचे संवर्धन करतात. चीनमध्ये किमान ५,००० वर्षांपासून रेशीम मिळविण्यासाठी रेशीम कीटकांचे संवर्धन होत असावे. बॉम्बिक्स मँडरिना  या वन्य जातीपासून पाळीव रेशीम कीटक मिळविले गेले आहेत.

रेशीम कीटक (बॉम्बिक्स मोरी) : (१) पतंग, (२) पूर्ण वाढलेली अळी , (३) कोश

रेशीम कीटकाचे (पतंगाचे) शरीर डोके, वक्ष आणि उदर (पोट) अशा तीन भागांचे असते. बॉ. मोरी जातीचा पतंग राखाडी, पांढऱ्या रंगाचा व जाड शरीराचा असून त्याचे पाय बळकट असतात. शरीर रोमक (केसाळ) असते. नराची लांबी सु. १·२५ सेंमी. असून मादी नरापेक्षा अधिक लांब व जाड असते. पंख आखूड व दुबळे असून पसरल्यावर पंखांचा विस्तार सु. ५ सेंमी. होतो. पंख रुंद व पांढरट असून त्यावर शिरा असतात. पंखांची पुढची जोडी किंचित वाकडी असते, तर मागची जोडी शरीराच्या मागील टोकापर्यंत गेलेली नसते.

प्रत्येक निरोगी अंडे उबविल्यावर त्यातून सु. ३ मिमी. लांबीची काळी अळी (सुरवंट) बाहेर पडते. या अळीची २०–२२ दिवस काळजी घेऊन वाढ करतात. अळी सतत खात राहते आणि तिला दिवसातून चार-पाच वेळा तुतीच्या पानांचे तुकडे खायला घालतात. त्यामुळे ती झपाट्याने वाढते. २५ – ३० दिवसांत चार वेळा कात टाकून अळीची वाढ पूर्ण होते (निर्मोचन); पहिली कात ३-४ दिवसांनी, त्यानंतर दुसरी कात २-३ दिवसांनी, तिसरी कात आणखी ३-४ दिवसांनी आणि चौथी कात आणखी ५-६ दिवसांनी टाकते. पूर्ण वाढलेली अळी लांबी सु. ९ सेंमी.पर्यंत वाढते. तिची त्वचा मऊ व पिवळसर असून काहीशी पारदर्शक असते. नंतर तिचे आकारमान कमी होत जाऊन ती जवळजवळ पारदर्शक दिसू लागते. उदर भागावरील पायांच्या आधारे ती उभे राहण्याची धडपड करू लागते. ही वेळ कोशावरण तयार करण्याची असते, असे मानतात. मग तिला कोशावरण तयार करण्यासाठी काटकी किंवा पेंढा देतात.

बॉ. मोरी अळीची लांबी ७–९ सेंमी. असते. अळीचे दुसरे वक्षीय वलय उंचवट्यासारखे असते आणि उदराच्या आठव्या वलयावर शिंगासारखी रचना असते. तिला पुच्छश्रृंग म्हणतात. रेशीमनिर्मिती करणाऱ्या रेशीमग्रंथी तिच्या सर्व शरीरभर असतात. त्यांपैकी पश्च रेशीमग्रंथी दोन लांबट नलिकेसारख्या कोशाची बनलेली असते. तिच्यात फायब्रोइन नावाचे प्रथिन निर्माण होते. तेथून ते दोन मध्य रेशीमग्रंथींमध्ये येते. या ग्रंथी इंग्रजी S आकारासारख्या असतात. त्यात फायब्रोइन मुरते (पक्व होते). दोन अग्र रेशीमग्रंथी डोक्याजवळ एकत्र आलेल्या असतात. या ग्रंथीच्या जबड्याखालील छिद्रयुक्त असलेल्या अवयवामधून (ज्याला तनित्र म्हणतात) फायब्रोइन स्राव बाहेर पडून रेशमाचे दोन तंतू कातले जातात. पुढच्या टोकाशी असलेल्या दुसऱ्या ग्रंथीतून चिकट स्राव स्रवतो. या स्रावात मेणासारखा चिकट पदार्थ असतो. रेशमात साधारणपणे ७५% फायब्रोइन, २०% सेरिसीन, ३% मेण आणि १-२% इतर द्रव्ये असतात. तनित्रातून फायब्रोइनाचा दाट तसेच नितळ स्राव बाहेर पडत असताना त्यात सेरिसिनाचा स्राव मिसळला जातो. हवेच्या संपर्कात येताच फायब्रोइन घट्ट व कठीण होते आणि सेरिसिनाने दोन्ही तंतू चिकटले जाऊन रेशमाचा दुहेरी धागा तयार होतो. अळी शरीराची सतत हालचाल करीत राहिल्याने हा धागा तिच्या शरीराभोवती इंग्रजी 8 आकाराप्रमाणे लपेटला जातो. साधारणपणे २४ तासांत अळीभोवती जाळे तयार झाल्याने ती झाकली जाते. ३–५ दिवसांत कोशावरण पूर्ण तयार होते. यादरम्यान अळीचे शरीर बारीक होत जाते आणि कोशावरणाची लांबी अळीपेक्षा कमी होते. कोशावरण अंडाकार असून टणक असते. कोशाची लांबी १५–२५ मिमी., व्यास १०–२० मिमी., वजन २·२ ग्रॅ. असते. कधीकधी मधला भाग संकोचल्यामुळे ते वाटाण्याच्या शेंगेप्रमाणे दिसते. कोशावरणावर साधारणपणे ६००–६५० मी. धागा असून धाग्याचा व्यास १० मायक्रोमीटर असतो.

पूर्ण वाढलेली अळी कोशावरण करण्यास योग्य झाल्यापासून दहाव्या दिवशी त्यातून पतंग बाहेर येतो. कोशातून बाहेर येताना कोशाला छिद्र पडावे म्हणून पतंग एक प्रथिन अपघटक विकर स्रवते. मात्र या विकरामुळे कोशावरणातील धाग्यावर परिणाम होतो. धागा सलग व सहज काढता येत नसल्यामुळे कोश गरम पाण्यात उकळून त्याचे जीवनचक्र संपवितात.

रेशीम उद्योगात पतंगाच्या चारही अवस्था महत्त्वाच्या असतात. त्यामुळे चांगली कोशावरणे निवडून वेगळी करतात आणि त्यांची पूर्ण वाढ होऊ देतात. अशा प्रकारे वाढविलेल्या पतंगांमध्ये नरांची संख्या माद्यांच्या तुलनेत कमी असते. हे नर दोन-तीन वेळा मीलनासाठी वापरता येतात. रेशीम उद्योगात नर कमी पडू नयेत म्हणून ते सुप्तावस्थेत ठेवण्यासाठी त्यांना शीतकपाटात ठेवतात. कोशातून बाहेर पडलेल्या नर-मादीचे तीन तासांच्या आत मीलन होते. त्यांचे मीलन दोन दिवस चालते. मीलनानंतर मादी अंडी घालते आणि लवकरच मरते. मादी एका वेळी २००–५०० अंडी घालते. अंडी टाचणीच्या माथ्याएवढी असून २०,००० अंड्यांचे वजन केवळ सु. १७ ग्रॅ. भरते. दर्जेदार अंड्यांचे वजन जास्तीत जास्त २० ग्रॅ. भरते. म्हणजे एका अंड्याचे सरासरी वजन १ मिग्रॅ. एवढे इष्ट मानतात. ०·६२५ मिग्रॅ.पेक्षा कमी वजनाची अंडी दर्जेदार मानीत नाहीत.

रेशमाची अळी तुतीची पाने (मोरस अल्बा) मोठ्या प्रमाणावर खाते. तुतीच्या पानांतील सिस-जास्मीन गंधामुळे अळ्या तुतीकडे आकर्षित होतात. तुतीवर वाढणाऱ्या रेशीम कीटकांचे अंडी घालण्यानुसार तीन गट केले जातात; वर्षातून एकदा अंडी घालणारे एकबार, वर्षातून दोनदा अंडी घालणारे दुबार आणि वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घालणारे बहुबार. रेशीम कीटक जसे तुतीच्या पानावर वाढविले जातात तसेच ते इतर वनस्पतींच्या पानांवर वाढविले जातात. साल, अर्जुन, ओक यांच्या पानांवर वाढणाऱ्या रेशीम कीटकांपासून टसर रेशीम, सोम वृक्षाच्या पानांवर वाढणाऱ्या रेशीम कीटकांपासून मुगा रेशीम, तर एरंडावर वाढलेल्या रेशीम कीटकांपासून इरी रेशीम मिळते.

जगात चीन, भारत, उझबेकिस्तान, ब्राझील आणि इराण हे देश रेशीम उत्पादनात आघाडीवर आहेत. भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू व काश्मीर, तमिळनाडू आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांत रेशमाचे व्यापारी उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांत रेशीम कीटक संशोधन केंद्रे आहेत. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, वाई व पाचगणी या ठिकाणी रेशीम कीटकांची पैदास केली जाते.

रेशीम कीटक सहज वाढविता येतात. बॉ. मोरी या कीटकाची मादी बॉम्बीकोल नावाचे संप्रेरक स्रवते. मात्र ती फारशी हालचाल करीत नाही. फलनाच्या वेळी जेव्हा नरांची गरज असते तेव्हा बॉम्बीकोल कामगंध सापळे वापरून नरांना पकडतात आणि माद्यांजवळ आणून सोडतात. या कीटकाच्या लहान आकारामुळे त्याचे कामगंध, संप्रेरके, मेंदूची रचना आणि कार्य इत्यादींच्या संशोधनात नमुना प्रारूप म्हणून त्याचा वापर केला जातो. २००८ साली कीटकांच्या जीनोमचा क्रम प्रसिद्ध झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा