फुलांचा राजा म्हणून सर्वांना माहीत असलेले सदापर्णी झुडूप. रोझेसी कुलातील रोझा प्रजातीमधील ही वनस्पती आहे. जगभर गुलाबाच्या १५० हून अधिक जाती असून फुले विविध रंगांत आढळतात. गुलाबाच्या काही जाती वेलींच्या स्वरूपात आढळतात. बहुतेक जाती मूळच्या आशियातील असून कमी संख्येने जाती यूरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिका येथील आहेत.

रानटी गुलाबाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात. या गुलाबापासून सध्याचे अनेक पाकळ्या असलेले व विविध रंगांचे गुलाब तयार करण्यात आले आहेत. सौंदर्य आणि सुगंधासाठी जगभर त्यांची लागवड केली जाते. आतापर्यंत २०,००० हून अधिक गुलाबांचे प्रकार संकर व कलम करून निर्माण केले आहेत.

गुलाबाचे झुडूप आकाराने लहान व उंचीने १-२ मी. वाढते. खोडावर व फांद्यांवर तीक्ष्ण व मागे वाकलेली शूके असतात (सामान्यपणे यांना ‘काटे’ म्हणतात, मात्र ते काटे नसतात. काटे म्हणजे रूपांतरित खोड, तर शूक म्हणजे बाह्यत्वचेची वाढ होय). याच शूकांच्या मदतीने गुलाबांच्या काही जाती आधारावर चढतात. पाने संयुक्त, एकाआड एक व पिसांसारखी असतात. पर्णिका ३-७, अंडाकार व दातेरी असतात. फुलांच्या रंगांत विविधता आढळते. स्वच्छ पांढर्‍या रंगापासून गुलाबी छटा, नारिंगी, फिकट ते गडद लाल, किरमिजी, शेंदरी, गडद निळ्यापर्यंत फुलांचे रंग असतात. फुलांचे आकारमान २-८ सेंमी. असते. अर्धवट उमललेल्या कळ्या आकर्षक दिसतात. ज्या फांदीवर फुले येतात ती फांदी फुलांचा भार पेलण्याएवढी मजबूत असते. रानटी गुलाबाला तयार होणारी फळे लाल आणि बोरांसारखी गोल व फुगीर असतात. त्यांत बिया असतात.

गुलाबाची लागवड करताना माती, खत, पाणी व सूर्यप्रकाश आणि त्याचप्रमाणे कलमे, छाटणी इ. बाबी काळजीपूर्वक निवडाव्या लागतात. गुलाबाला अतिथंड हवा मानवत नाही. लागवडीनुसार गुलाबाचे दोन वर्ग करता येतात. पहिल्या वर्गात उन्हाळी गुलाब येत असून ते वर्षातून फक्त एकदाच फुलतात. दमास्क, वेली गुलाब इ. याचे प्रकार आहेत. दुसर्‍या वर्गात बारमाही गुलाब येत असून ते नाजूक असतात. कस्तुरी, चिनी व संकरित टी हे याचे काही प्रकार आहेत. संकरित टी गुलाबाच्या कळ्या टोकदार असून फुलांना नुकत्याच उघडलेल्या खोक्यातील चहासारखा वास येतो, म्हणून त्यांना टी रोझेस म्हणतात.

गुलाब ही वनस्पती तिच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. बागांची शोभा वाढविण्यासाठी आणि फुलदाणी, पुष्पगुच्छ व हार तयार करण्यासाठी याची लागवड केली जाते. गुलाबाच्या पाकळ्यांत बाष्पनशील तेल असते. त्यापासून अत्तर तयार करतात. या तेलात फिनिल एथिल अल्कोहॉल, जिरॅनिऑल, नेरॉल आणि सिट्रोनेलॉल हे प्रमुख घटक असतात. तेल मिळविण्यासाठी पाकळ्यांमधून वाफ सोडतात. तेल काढून घेऊन मागे उरलेले पाणी गुलाबपाणी म्हणून वापरतात. गुलाबाचे अत्तर मुख्यत: बसरा, एडवर्ड व दमास्क या प्रकारांच्या पाकळ्यांपासून मिळवितात. गुलाबाची कळी, फुले आणि पाकळ्या यांपासून आयुर्वेदिक व युनानी औषधे तयार करतात. तसेच पाकळ्या साखरेच्या पाकात मुरवून गुलकंदाच्या स्वरूपात खाल्ल्या जातात.

यूरोप आणि अमेरिकेत शोभिवंत गुलाबांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तेथे गुलाबाच्या फार मोठ्या बागा आहेत. यासाठी संकर पद्धतीने गुलाबांचे अनेक प्रकार निर्माण केले आहेत. भारतात जगभरातील गुलाबांच्या विविध जाती व त्यांचे प्रकार उपलब्ध करून त्यांची लागवड करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. बंगलोर, मुंबई, कोलकाता, इंदूर, चंडीगढ, दिल्ली, पुणे, कुलू व सिमला या ठिकाणी गुलाबाच्या बागा आहेत.