एक सागरी सस्तन प्राणी. डॉल्फिनाचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या सीटॅसिया गणात करण्यात येतो. या गणात व्हेल, शिंशुक (पॉरपॉईज) यांचाही समावेश करतात. सीटॅसिया गणात असलेल्या डेल्फिनिडी कुलामध्ये डॉल्फिनाच्या १७ प्रजाती आणि ४० जाती आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत सागरात आढळणाऱ्या डॉल्फिनाचे शास्त्रीय नाव टर्सिओप्स ट्रंकेटस आहे. स्थानिक मराठी भाषेत याला बुलुंग व मामा असेही म्हणतात. जातीनुसार यांच्या आकारमानात विविधता दिसून येते. आकाराने सर्वांत लहान डॉल्फिन १.५-२.५ मी. लांबीचा आणि सु. ४० किग्रॅ. वजनाचा असून मोठा डॉल्फिन सु. ९.५ मी. लांब आणि सु. १० टन वजनाचा असतो. समुद्रकिनाऱ्यालगतच्या उथळ पाण्यात ते आढळतात. मायोसीन कालखंडात (सु. १ कोटी वर्षांपूर्वी) ते उत्क्रांत झाले असावेत, असे मानतात.

डॉल्फिन

डॉल्फिनाचे शरीर पाण्यात वेगाने पोहण्यासाठी अनुकूलित झालेले असून दोन्ही टोके विटीप्रमाणे निमुळती असतात. पुढे सरकण्यासाठी पुच्छ पराचा उपयोग होतो. वक्षीय पर होडीच्या वल्ह्यांसारखे काम करतात. त्यांचा दिशा बदलण्यासाठी वापर होतो. पोहताना पृष्ठ परामुळे शरीर स्थिर राहते. जातींनुसार त्यांच्या रंगामध्ये विविधता आढळते. बहुतेक डॉल्फिन राखाडी रंगाच्या छटांमध्ये असतो. पोटाकडची बाजू अधिक फिकट असते. डोक्यावर एक गोलाकार ध्वनिग्राहक इंद्रिय असते. जबडा लांब असून तो चोचीसारखा वाटतो. तोंड बाटलीसारखे असून त्याची जिवणी वाकडी असल्याने त्याचा हसल्यासारखा भास होतो. जबड्यात २५० पर्यंत दात असतात. डोक्यावर असलेल्या वायुछिद्रातून तो श्वसन करतो. श्वासनलिका मेंदूच्या पुढच्या भागात असते. डॉल्फिनाचा मेंदू आकाराने मोठा असून त्याची संरचना गुंतागुंतीची असते. व्हेलप्रमाणेच डॉल्फिनच्या त्वचेखाली चरबीचा जाड थर असतो. या थराला निमिवसा (ब्लबर) म्हणतात. निमिवसा उष्णतारोधक असून थंड पाण्यातही शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत करते.

इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे डॉल्फिनाच्या त्वचेवर केस नसतात. जन्मापूर्वी तोंडाभोवती असलेले केस नंतर गळून पडतात. डॉल्फिन पाण्यात तसेच पाण्याबाहेर राहू शकतो. त्यांची श्रवणेंद्रिये तीक्ष्ण असतात. मनुष्याला ज्या कंप्रतेचा ध्वनी ऐकू येतो त्याहून दहापट कंप्रतेचा ध्वनी त्याला ऐकू येतो. डोक्याच्या दोन्ही बाजूंना कानांची दोन छिद्रे असतात. त्याच्या खालच्या जबड्यात असलेली एक मेद पोकळी मध्यकर्णाला जुळलेली असते. याचा उपयोग पाण्याखालचे ध्वनितरंग कानापर्यंत वाहून नेण्यासाठी होतो. डोक्यावर असलेल्या फुगीर अवयवाचा उपयोग उच्च कंप्रतेचा ध्वनी निर्माण करण्यासाठी होतो. हा ध्वनी एखाद्या वस्तूवर आपटून निर्माण झालेला प्रतिध्वनी या अवयवामार्फत ऐकला जातो. याला ‘प्रतिध्वनी स्थान निर्धारण’ (इको लोकेशन) म्हणतात. डोळे बांधून त्यांना पाण्यात सोडले तरी ते मार्गातील अडथळे पार करू शकतात. प्रतिध्वनिग्रहण अवयवामुळे भक्ष्य आणि त्यांच्यात किती अंतर आहे, हे त्यांना अचूक समजते. त्यांना गंधचेता आणि गंधपाली नसतात. परंतु, त्यांची स्पर्शशक्ती आणि स्वादक्षमता प्रगत असते. मासे, नळ आणि म्हाकूळ हे डॉल्फिनाचे मुख्य भक्ष्य आहे. भक्ष्य पकडण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. लहान माशांचा कळप हेरून ते सर्व बाजूंनी त्यांना घेरतात. एकदा घेरले गेले म्हणजे मासे चेंडूच्या आकारात गोळा होतात. एकत्र आलेल्या माशांच्या समूहावर एकेक करीत डॉल्फिन हवे तेवढे भक्ष्य गिळतात. एकटे किंवा जोडीने असताना ते उथळ पाण्यात माशांचा पाठलाग करून मासे पकडतात. परस्परांशी संपर्क साधण्यासाठी ते वेगवेगळे आवाज काढतात. म्हाकूळ जवळ आल्यानंतर आवाजाची तीव्रता वाढते.

नदीमधील डॉल्फिन

डॉल्फिनाचा गर्भावधी सु. नऊ महिन्यांचा असतो. हिवाळ्याच्या मध्यापासून ते उन्हाळ्यापर्यंतच्या काळात पिले जन्मतात. मादी दर खेपेला एकाच पिलाला जन्म देते. सामान्यपणे डॉल्फिन कुत्र्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतात. त्याला शिकविले तर तो बऱ्याच गोष्टी शिकतो म्हणून सागरी जलजीवालयांमध्ये डॉल्फिन सर्कस चांगलीच लोकप्रिय आहे. अधूनमधून ते उसळी मारून पाण्याबाहेर येतात, कसरती करतात आणि पुन्हा पाण्यात शिरतात. आवडते खाद्य दिले की ते विशिष्ट कसरती करून दाखवितात.

गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, बियास व सतलज या नद्यांमध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिन सापडतात. प्लॅटिनिस्टा गँजेटिका आणि प्लॅटिनिस्टा गँजेटिका मायनर या त्यांच्या गोड्या पाण्यातील जाती आहेत. शरीरशास्त्रीय दृष्ट्या गंगा नदीतील डॉल्फिन अंध आहेत कारण त्यांच्या डोळ्यात नेत्रभिंग नसते. त्यांना प्रकाशाची दिशा आणि तीव्रतेचे ज्ञान होत असते. हालचाल व शिकारीसाठी ते फक्त प्रतिध्वनी स्थान निर्धारण तंत्राचा वापर करतात. पृष्ठ पराच्या ठिकाणी त्यांना त्रिकोनी उंचवटा असतो. नर आकाराने मादीहून लहान असतो. मादी २.४ – २.६ मी. लांब तर नर २ – २.२ मी. लांब असतो. कटला, मृगळ, रोहू यांसारखे कार्प मासे व बॅगॅदिया, मिस्टस यासारखे मांजरमासे आणि झिंगे इ. डॉल्फिनाचे अन्न आहे. लहान कळप करून ते अन्नाच्या शोधात भटकतात. नद्यांवर बांध आणि धरणे यांमुळे ते विखुरले गेले आहेत. पूर्वी भारतातील नद्यांची खोली अधिक असल्यामुळे डॉल्फिन खोल पाण्यात वावरत असत. मात्र, नद्यांमधील पाणी अडविल्यामुळे त्यांना आता उथळ पाण्यात राहावे लागते. तसेच काही ठिकाणी उथळ पाण्यात बांधलेल्या वाळूच्या बंधाऱ्यामुळे त्यांचे लहान-लहान गट पडले आहेत. लहान गटातील त्यांच्या प्रजननात जनुक मिसळण्यात अडचणी येत आहेत. डॉल्फिनाची चरबी औषधी असल्याच्या समजुतीपोटी त्यांची शिकार केली जाते. गंगा नदीतील डॉल्फिन राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केलेला आहे. डॉल्फिनाच्या संरक्षणासाठी भारत सरकारने चंबळ जल अभयारण्य स्थापन केले आहे.