जैविक घटकांचे ऑॅक्सिजनविरहित पर्यावरणात विघटन करून मिळविला जाणारा वायू. जैववायूची निर्मिती ही सूक्ष्मजीवांकडून विनॉक्सिश्वसनादवारे होते. ही प्रक्रिया विशिष्ट तापमानाला घडून येते. जैववायू हा जैविक इंधनाचा एक प्रकार आहे. एका विशिष्ट आकाराच्या बंद टाकीमध्ये ३५ – ७० से. तापमानाला जैविक घटकांचे विनॉक्सिश्वसन घडवून आणले जाते. या टाकीत जनावरांचे शेण, मनुष्याची विष्ठा, शेतातील वाळलेला व ओला कचरा, कुक्कुटपालन उदयोगातील टाकाऊ पदार्थ एकत्र करतात. त्यांच्या विघटनामुळे जैववायू निर्माण होतो. याला गोबर गॅस व लँडफिल गॅस अशीही नावे आहेत.
जैववायू

मिथेन हा जैववायूतील मुख्य ज्वलनशील घटक आहे. जैववायूमध्ये मिथेन ५० – ७५%, कार्बन डाय – ऑॅक्साईड २५ – ५०%, नायट्रोजन ० – १०%, हायड्रोजन सल्फाइड ० – ३% आणि हायड्रोजन ० – १%  असतो. प्रति किग्रॅ. जैववायूपासून साधारणपणे ५,००० ते ५,५०० किलोकॅलरी उष्णता मिळू शकते. पारंपरिक इंधनावरील ताण कमी करण्यासाठी जैववायूचा इंधन म्हणून वापर करतात. शिवाय जैविक कचऱ्याची उत्तम प्रकारे विल्हेवाट लावता येते. सुरुवातीच्या काळात, जैववायूच्या निर्मितीसाठी पाळीव जनावरांच्या मलमूत्राचा वापर केला जात असे. मात्र, सुधारित पद्धतीत सर्वच प्रकारच्या टाकाऊ जैविक घटकांचा वापर केला जातो. जैविक कचरा नष्ट झाल्यामुळे स्वच्छता राखली जाते. शेतीतील टाकाऊ कचरा, रद्दीकागद, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, भाज्यांची व फळांची देठ-टरफले, उपयोगी नसलेल्या वनस्पती, प्राण्यांचे सहज विघटन होऊ शकणारे जैविक पदार्थ, मानवी विष्ठा, धान्यावरचे तूस, गिरणीत सांडलेले पीठ हे सारे पदार्थ जैववायूच्या निर्मितीसाठी स्रोत म्हणून वापरता येतात.

जैववायू मंद गतीने जळणारा असून तोे स्वच्छ व प्रदूषणविरहित इंधन आहे. जैववायू पुनर्निर्मितिक्षम असून वेगवेगळ्या पद्धती वापरून जैववायूची गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांत यश आले असून नैसर्गिक वायूएवढी त्याची क्षमता सुधारण्यात आली आहे. महाराष्ट्रात काही साखर कारखान्यांनी जैववायूचे मोठे प्रकल्प उभे करून आजूबाजूच्या वसाहतींना जैववायू घरगुती वापरासाठी पुरविला आहे. काही उद्योगांनी जैववायूचा वापर पाण्याची वाफ करण्यासाठी आणि त्यापासून विदयुतनिर्मिती करण्यासाठी केला आहे. ही वीज स्वत:साठी, आजूबाजूच्या उदयोगांसाठी देऊ करून ते उद्योग विजेवरील ताण कमी करीत आहेत.

इतर इंधनाच्या तुलनेत जैववायूचे अनेक फायदे आहेत; जैववायूच्या आकारमानाच्या तुलनेने त्याचे औष्णिक मूल्य अधिक असते. त्याच्या निर्मितीसाठी अतिशय कमी खर्च येतो. त्याच्या निर्मिती प्रकल्पात कच्च्या मालाचे बंदिस्त जागेत विघटन होत असल्याने दुर्गंधी बाहेर पडत नाही. या इंधनाच्या (जैववायू) ज्वलनामुळे कोणतेही अपायकारक वायू वातावरणात मिसळत नसल्याने प्रदूषण होत नाही. जैविक कचरा त्याचे विघटन न होता पडून राहिला तर त्यापासून नायट्रोजन ऑक्साइड आणि मिथेन हे वायू मुक्त होतात. या वायूंची पर्यावरणाच्या तापमानात भर टाकण्याची क्षमता कार्बन डाय-ऑक्साइडापेक्षा अनेक पटींनी असते. म्हणून जैविक कचऱ्यापासून जैववायू तयार केला, तर त्यापासून इंधनही मिळते आणि तापमानात होऊ शकणारी संभाव्य वाढ टाळता येते.