हटन, जॉन हेन्री (Hutton, John Henry) : (२७ जून १८८५ – २३ मे १९६८ ). ब्रिटिश भारतातील एक सनदी अधिकारी व प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. हटन यांचा जन्म यॉर्कशर (इंग्लंड) येथे मध्यमवर्गीय सुस्थितीतील कुटुंबात झाला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील इसेक्स व वर्सेस्टर या महाविद्यालयांत शिक्षण घेऊन १९०७ मध्ये आधुनिक इतिहास या विषयाची पदवी मिळविली. त्यानंतर १९०९ मध्ये भारतीय नागरी प्रशासकीय सेवेत सनदी अधिकाऱ्याची नोकरी पतकरली. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेतील बहुतांश कालावधी आसाममध्ये-प्रामुख्याने नागा टेकड्यांत-व्यतीत केला. त्या भागात त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि उपायुक्त म्हणून काम केले. पुढे १९२० मध्ये आसामच्या मानवजातिवर्णन विभागाच्या सामान्य संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. तत्पूर्वी त्यांनी कामाच्या निमित्ताने ज्या नागा भागाला पूर्वी कुणीही भेट दिली नव्हती, अशा दुर्गम, अपरिचित भागाला भेट दिली. त्यांच्यातील काही वाद मिटविले आणि त्यांच्या समस्या शासनाला कळविल्या. तत्संबंधीची माहिती पीट रिव्हर्स संग्रहालयात (ऑक्सफर्ड) जतन केलेल्या त्यांच्या दैनंदिनीवरून मिळते. त्यावरून त्यांच्या खडतर परिश्रमाची कल्पना येते.

हटन यांनी नागा टेकड्यांत प्रदीर्घ काळ वास्तव्य करून सेमा नागा, अंगामी नागा इत्यादी नागांच्या उपजमातींच्या धार्मिक चालीरीती, विवाहपद्धती व शिकार यांचा अभ्यास केला. नागा टेकड्यांतील मोकोकचुंग व कोहिमा येथील सेमा नागांची भाषा ते शिकले. त्यामुळे त्यांना नागांच्या सर्वांगीण जीवनाची ओळख झाली. नागांनाही ते आपल्यापैकीच एक वाटू लागले. नागा (Naga) यांची संस्कृती, चालीरीती, जीवनपद्धती इत्यादींबद्दल त्यांना जवळून अभ्यास करता आला. या संशोधनातून त्यांनी त्यांच्या समाजजीवनावर विस्तृत लेखन केले. त्यांनी १९२१ मध्ये लिहिलेले द सेमा नागाज आणि द अंगामी नागाज हे दोन साक्षेपी ग्रंथ होत. त्यांच्या संशोधनात्मक लेखनामुळे त्यांस ऑक्सफर्ड विद्यापीठाने डी. एससी. ही पदवी दिली.

हटन यांची १९२९ मध्ये भारतीय जनगणनेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी भारतातील आदिवासींच्या संदर्भातली प्रश्नावली बनवून जनगणनेद्वारे त्यांची माहिती गोळा करण्यास अन्य सहकाऱ्यांना साहाय्य केले आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्संबंधीचे वृत्तान्त लिहिण्यास उत्तेजित केले. त्यांनी १९३६ मध्ये आपल्या आयुक्तपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि १९५० मध्ये सेवानिवृत्त झाला. निवृत्तीनंतरही त्यांचे लेखन-वाचन चालूच होते. आग्नेय आशिया व ओशिॲनियातील पूर्वाश्म-संस्कृतीबद्दल त्यांना कुतूहल होते. त्यावर त्यांनी स्फुटलेख लिहिले. त्यांनी जॉन फिलिप मिल्स व फ्यूरर–हायमेनडॉर्फ या तरुण मानवशास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. या तिघांनी मिळून अंगामी, सेमा, लोथा, आओ, रेंगमा व कोन्याक या नागा जमातींवर विस्तृत संशोधन केले. तसेच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू गोळा केल्या. हटन यांच्या वस्तू पीट रिव्हर्स संग्रहालयामध्ये ठेवल्या आहेत.

हटन यांनी आदिवासींवर लिहिलेले ग्रंथ महत्त्वपूर्ण असून ते पुढील प्रमाणे आहेत : द सेमा नागाज (१९२१); द अंगामी नागाज (१९२१); द लोथा नागाज (१९२२); चंग लँग्वेज, ग्रामर अँड व्होकॅबुलरी ऑफ द लँग्वेज ऑफ द चंग नागा ट्राइब (१९२९); द आओ नागाज (१९२६); सेन्सस ऑफ इंडिया (१९३३); कास्ट इन इंडिया (१९६३); नागा मॅनर्स अँड कस्टम्स; डायरीज ऑफ टू टुअर्स इन अनॲडमिनिस्टरेड एरिया इत्यादी.

हटन यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी १९२९ मधील रॉयल ॲन्थ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे रिव्हर्स मेमोरिअल मेडल व १९३२ मधील रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे रजत पदक हे महत्त्वाचे होत. यांशिवाय त्यांनी १९३८ मध्ये फ्रेझरच्या स्मरणार्थ केलेले भाषण आणि रॉयल ॲन्थ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्षपद (१९४४-४५) हे प्रतिष्ठेचे होत.

हटन यांचे ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा