कर्वे, इरावती दिनकर (Karve, Iravati Dinkar) : (१५ डिसेंबर १९०५ — ११ ऑगस्ट १९७०). प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा व लेखिका. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील म्यिंजान येथे गणेश करमरकर यांच्या मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. इरावती यांनी १९२२ मध्ये हुजुरपागा, पुणे येथून मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर १९२६ मध्ये फर्ग्यूसन महाविद्यालय, पुणे येथून तत्त्वज्ञान विषयात बी. ए.ची पदवी मिळविली. त्या वेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘परशुरामाविषयी दंतकथा आणि चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ या विषयावर प्रबंध लिहून १९२८ मध्ये मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची एम. ए. ही पदवी मिळविली आणि पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. त्यांनी १९२८ ते १९३० या दरम्यान जर्मन मानवशास्त्रज्ञ यूजिन फीशर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमानता’ या मानवशास्त्र विषयावर प्रबंध लिहून १९३० मध्ये बर्लिन विद्यापीठाच्या ‘विल्यम कैसर इन्स्टिट्यूट ऑफ ॲन्थ्रॉपोलॉजी’ या संस्थेतून डॉक्टरेट ही पदवी घेतली. त्यांचा विवाह महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा शिक्षणतज्ज्ञ दि. धों. कर्वे यांच्याशी झाला. काही वर्षे इरावती यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम केले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या विभागाच्या त्या सेवानिवृत्तीपर्यंत विभागप्रमुख होत्या.
इरावती आणि प्रसिद्ध संस्कृत विशारद व पुरातत्त्वज्ञ हसमुख सांकलिया यांनी १९४९ मध्ये गुजरातमधील लांघणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननांत त्यांना मिळालेल्या मानवी अवशेषांमुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले. जगातील कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आधी तिचा इतिहास अभ्यासणे महत्त्वाचे असून समाजाची रचना, परंपरा समजून घेतली पाहिजे, ही त्यांची सैद्धांतिक भूमिका होती. इरावती यांनी मानवांमधील सांस्कृतिक, जैविक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी संख्याशास्त्रातील ‘मल्टी व्हेरीएट’ (बहुवस्तुनिष्ठता)पद्धतींचा वापर केला. तसेच त्यांनी प्राचिन भारतीय इतिहास या विषयाचा अभ्यासही केला. मानवांमधील जैविक विविधतेचा अभ्यास करताना कोणते एकक वापरावे, यासंदर्भात यांनी जातीची व सामाजिक एककाची केलेली व्याख्या आजही समर्पक आहे.
इरावती यांनी १९४७ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय सायन्स काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांच्या मानवशास्त्रातील संशोधनामुळे त्यांची १९५५ मध्ये लंडन विद्यापीठ, इंग्लंड येथे व्याख्यात्या म्हणून एक वर्षाकरिता नियुक्ती झाली. त्याच वर्षी प्रागैतिहासाच्या सकल आफ्रिकी काँग्रेसमध्ये त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले. त्याचबरोबर त्यांना अमेरिकेतील रॉकफेलर फौंडेशनच्या मानवशास्त्र विभागाकडून आमंत्रित केले गेले. त्यांनी तेथेही जाऊन मानवशास्त्राबद्दल आपले मत मांडले.
इरावती या स्वतंत्र विचारवंत आणि स्वत:च्या विश्वासावर ठाम असणारी व्यक्ती होत्या. त्यांची राहणी अत्यंत साधी व वृत्ती पुरोगामी होती. आपले कोणतेही संशोधनात्मक कार्य त्या स्वतंत्रपणे करीत. त्यांची महिलांबद्दलची कल्पना ही आधुनिकवादी होती. पुरूषप्रधान संस्कृतीशी लढणाऱ्या स्त्रीयांना त्या संबोधित असत. त्यांच्या मते, ‘स्त्रीयांनी पुरूषांसोबत लढताना केवळ समान हक्कांसाठी न लढता नेहमी अधिक हक्कांसाढी लढावे.’ त्यांनी १९५२ मध्ये पुण्यातील पहिली महिला दुचाकी चालक म्हणून प्रतिष्ठा मिळविली.
इरावती यांनी १९५३ मध्ये लिहिलेल्या आपल्या किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया या ग्रंथात भारतीय समाजरचनेसंदर्भात अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि मुद्द्यांना पकडून मांडणी केली. तसेच १९६१ मधील आपल्या हिंदू सोसायटी : ॲन इंटरप्रिटेशन या ग्रंथात महाराष्ट्रातील समाजरचनेच्या प्रारूपाबद्दल महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या मानवशास्त्रावरील संशोधनपर आणि ललित लेखनांतून समाजशास्त्रात मूलभूत बदल घडवणाऱ्या स्त्रीवाद व उत्तरआधुनिकतावाद या संकल्पना दिसून येतात.
इरावती यांच्या बहुतेक इंग्रजी ग्रंथांस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून युगान्त या महाभारतावरील चिकित्सक ग्रंथास १९६८ मध्ये साहित्य अकादेमी व महाराष्ट्र शासन यांचा पुरस्कार लाभला. यांशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले. शिकागो विद्यापीठ प्रेसमधून प्रसिद्ध होणाऱ्या करंट ॲन्थ्रॉपोलॉजी या मानवशास्त्रातील मानांकित जर्नलमध्ये इरावती यांच्याविषयी एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला होता. एक मानवशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी पार पडलेला ‘नंदीवाला संशोधन प्रकल्प’ महत्त्वाचा आहे. भारतीय मानवशास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नावलौकिक आहे.
इरावती यांनी मानवशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत विपुल लेखन व संशोधन केले आहे. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांपैकी हिंदू सोसायटी : ॲन इंटरप्रिटेशन (१९६१), किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३), द भिल्ल ऑफ वेस्ट खानदेश (१९५८), गृप रिलेशन्स इन व्हिलेज कम्युनिटी (१९६३), द सोशल डायनॅमिक्स ऑफ अ ग्रोवींग टाऊन अँड इट्स सराऊंडींग एरिया (१९६५) महाराष्ट्र लँड अँड पीपल (१९६८), अन्थ्रोपोमेट्रिक मेजरमेंट्स ऑफ मराठा हे इंग्रजी व परिपूर्ती (१९४९), भोवरा, मराठी लोकांची संस्कृति(१९५१), हिंदूंची समाजरचना(१९६४), युगान्त (१९६७), गंगाजल (१९७२), आमची संसकृती हे मराठी ग्रंथ महत्त्वाचे आहेत.
इरावती यांचा हृदयविकाराच्या आघाताने पुण्यात निधन झाले.
समीक्षक – शौनक कुलकर्णी